उगवतीचे रंग
लाल छटा विरताना…
पहाट उगवते तेव्हा ती केवळ प्रकाश घेऊन येत नाही; ती एक जाणीव घेऊन येते. ती सांगते की अंधार कायमचा नसतो. काळोख कितीही दाट असला तरी त्याच्या कडांना सोनेरी किनार लागू लागतेच. आज भारताच्या ‘रेड कॉरिडॉर’मध्ये अशीच एक पहाट आकार घेताना दिसते हळूहळू, पण निश्चयाने.
गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील एका चिमुकल्या पाड्यावर त्या दिवशी काहीतरी वेगळं घडत होतं. जिथे कधी संध्याकाळ झाली की भीतीचा पडदा पसरायचा, तिथे एका पडक्या शाळेच्या छतावर तिरंगा डौलाने फडकत होता. एका म्हाताऱ्या आदिवासी आजीने आपल्या नातवाचा हात धरला होता. त्या मुलाच्या हातात बंदूक नव्हती, तर ‘अक्षरओळख’ करून देणारी पाटी होती. तिच्या डोळ्यांतलं पाणी दहशतीचं नव्हतं; ते होतं नव्या भविष्याचं समाधान.
कधीकाळी पश्चिम बंगाल ते आंध्र प्रदेश असा पसरलेला ‘लाल पट्टा’ हा केवळ भौगोलिक नव्हता; तो उपेक्षेचा, असंतोषाचा आणि हिंसेच्या चक्रव्यूहाचा पट्टा होता. झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, गडचिरोली या भागांत अनेक वर्षे विकासाची पावले पोहोचली नाहीत. परिणामी, स्थानिक समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना वाढत गेली आणि त्याचा फायदा घेऊन माओवादी विचारसरणीने आपली पाळेमुळे रोवली.
या संघर्षात अनेक निरपराधांचे जीव गेले, तर अनेक तरुण हिंसेच्या मार्गाला लागले. कित्येक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा इतिहास वेदनादायी आहे आणि तो विसरून चालणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माओवाद्यांनी आदिवासींचा वापर फक्त आपला स्वार्थ साधून घेण्यासाठीच केला आहे. माओवादी आणि सुरक्षा दले यांच्यात जेव्हा जेव्हा संघर्षाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा त्यांनी निरपराध अशा आदिवासींना पुढे केले आहे आणि त्यांचे हकनाक बळी गेले आहेत. आजपर्यंत माओवाद्यांनी हजारो निष्पाप नागरीक, सुरक्षा रक्षक, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची हत्या केली आहे.
या भागातील सधन जमीनदारांचे अन्याय या प्रदेशातील लोकांनी वर्षानुवर्षे सहन केले. गरीब शेतमजुरांची प्रचंड पिळवणूक करण्यात आली. त्यांना शिक्षणापासून आणि सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. शेवटी या शेतमजुरांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी जमीनदारांच्या घरांवर हल्ले करून अनेक जमीनदारांना ठार मारले त्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि अशा पार्श्वभूमीवरच तेलंगणातील पोचमपल्ली येथून आचार्य विनोबा भावे यांनी आपली भूदान चळवळ सुरू केली होती. अनेक वर्षांपासून या भागातील जनता दहशतीखाली जगत होती. आता ते लोक मोकळा श्वास घेऊ शकतील.
माओवादाची समस्या संपली आहे असे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी अगदी अशक्य वाटणारी ही गोष्ट प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आणि अतुलनीय साहस यामुळेच साध्य झाली आहे असे म्हणता येईल. नक्षलवादाचा प्रभाव अनेक भागांत कमी झाल्याचे चित्र समोर येत आहे. बस्तरसारख्या अनेक ठिकाणी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकांनी निर्भयतेने तिरंगा फडकवला आहे. होळीसारखे पारंपरिक सण उत्साहात साजरे केले आहेत. बदल केवळ सुरक्षा कारवायांमुळे नाही, तर विकासाच्या वाढत्या सोयीसुविधांमुळेही घडले आहेत.
दुर्गम भागांत रस्त्यांचे जाळे विस्तारले, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या, मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारली. शाळा, निवासी विद्यालये, आरोग्य केंद्रे यामुळे स्थानिकांना पर्याय उपलब्ध होऊ लागले. ‘मुख्य प्रवाहात या’ या आवाहनाला प्रतिसाद देत काही तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून नवे आयुष्य स्वीकारले. बंदुका टाकून देऊन समाज विकासाचे कार्य हाती घेतले आहे. हा बदल केवळ भौतिक नाही; तो मानसिक आणि सामाजिकही आहे.
संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे
“जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले " उपेक्षितांना आपले मानण्याची ही वृत्ती प्रत्यक्ष कृतीत उतरली, तेव्हा हा बदल शक्य झाला.
सरकारने माओवाद्यांच्या ताब्यातील रेड कॉरिडॉर जवळपास नष्ट केला आहे. माओवाद्यांच्या लष्करामुळे लोकांना भीतीच्या छायेत जगावे लागत होते ते लष्कर नेस्तनाबूत झाले आहे. त्यांचे बरेच वरिष्ठ नेते ठार झाले आहेत असे असले तरी माओवाद संपला असे पूर्णपणे समजता येणार नाही. कारण ही वेळ अत्यंत सावध राहण्याची आहे.
जंगलातील युद्ध संपलेले असले तरी येत्या काळात शहरांमध्ये एका वेगळ्या प्रकारचे संघर्षाची सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माओवादी समाजातील सर्वच घटकात फ्रंट संघटना स्थापन करून लक्षावधी जनतेला अप्रत्यक्षपणे माओवाद्याला मदत करण्याचे षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संघर्ष जंगलातून काँक्रीटच्या जंगलात स्थलांतरित होऊ शकतो. समाजातील लोकांचा बुद्धिभेद करण्याचे काम समाजातीलच काही बुद्धिजीवी लोक करू शकतात आणि अप्रत्यक्षपणे या माओवाद्यांना साथ देऊ शकतात.
म्हणून सावध राहावे लागणार आहे. या उगवत्या प्रकाशासोबत सजगतेची सावलीही तितकीच आवश्यक आहे. हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या प्रवृत्ती ओळखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हिंसेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पातळीवर समर्थन मिळू नये, याची खबरदारी घेणेही गरजेचे आहे. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य महत्त्वाचे असले, तरी ते माणुसकी, शांतता आणि राष्ट्रीय हित यांच्या चौकटीतच फुलले पाहिजे.
म्हणूनच पुढील काळात विकासासोबत विवेक, अधिकारांसोबत जबाबदारी आणि स्वातंत्र्यासोबत सजगता ही मूल्ये जपणे आवश्यक ठरणार आहे.
त्यासाठी माओवाद्यांचे आणि आदिवासींचे विचार परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे. संवाद, विश्वास आणि सहअस्तित्व हेच या नव्या पहाटेचे खरे अधिष्ठान आहे.
आणि तरीही, या मोठ्या परिवर्तनाचं खरं चित्र कुठे दिसतं?
ते दिसतं गडचिरोलीच्या त्या दुर्गम खेड्यातील एका आजीच्या घराच्या उंबऱ्यावर…
तिचे तीन मुलगे. एक जंगलात, एक सुरक्षा दलात, आणि एक शेतात. ती मात्र रोज पहाटे दिवा लावणारी कोणासाठी प्रार्थना करावी हेही न ठरवू शकणारी.
वर्षानुवर्षे गेली.
एक दिवस जंगलातून आलेल्या मुलाने शस्त्र खाली ठेवले. आत्मसमर्पण केले.
त्या दिवशी त्या आजीने दिवा लावला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या थरथरत्या हातांनी लावलेला तो दिवा—तोच खरा ‘उगवतीचा रंग’ होता.
लाल रंगावर चढणारा—सोनेरी, सजगतेचा आणि माणुसकीचा रंग.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
११/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा