उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५१
मदें मछरे सांडिला स्वार्थबुद्धी|
प्रपंचिक नाही जयाते उपाधि|
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|५१|
अर्थ : जो अहंकार आणि द्वेषरहित आहे, ज्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे, जो संसारात राहूनही विरक्त वृत्तीने वागतो, नेहमी नम्र आणि मधुर वाणीनेच बोलतो, असा मनुष्य सर्वोत्तम अशा भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
( मद - अहंकार, मछरे -मत्सर/द्वेष, सांडिला - सोडून दिले आहे, स्वार्थ बुद्धी - केवळ स्वतःचा फायदा पाहणे, उपाधि - बाह्य पाश /बंधन, सुवाचा - गोड /मधुर बोलणे )
विवेचन
हा फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. खऱ्या भक्ताची लक्षणे आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. खरा भक्त अहंकार आणि द्वेष रहित असतो. त्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केलेला असतो. काही ठिकाणी या श्लोकामध्ये पाठभेद आढळतात. काही पुस्तकांमध्ये सांडली असा शब्द आहे तर काही पुस्तकांमध्ये सांडिला असे म्हटले आहे. या शब्दांमुळे अर्थामध्ये जरा फरक पडतो. ज्या पुस्तकामध्ये मदे मत्सरे सांडीली स्वार्थ बुद्धी असे म्हटले आहे, तिथे सांडली म्हणजे त्याग केला या अर्थाने मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांचाही खऱ्या भक्ताने त्याग केलेला असतो असा अर्थ घेता येतो. तर जेव्हा सांडीला हा शब्द वापरलेला आढळतो तेव्हा मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी हे दुर्गुण खऱ्या भक्ताला सोडून गेलेले असतात. म्हणजे त्याला ते स्पर्शही करत नाहीत असा अर्थ घेता येतो. तसेच काही पुस्तकात मत्सरे तर काही ठिकाणी मछरे हा शब्द वापरला आहे. अर्थात दोन्हींचा अर्थ मत्सर हाच आहे.
या शब्दांच्या जास्त खोलात न शिरता आपल्याला असे लक्षात येते की खरा भक्त हा अहंकार आणि द्वेषरहित असतो. त्याच्याजवळ स्वार्थ बुद्धी नसते. मद म्हणजे गर्व किंवा अहंकार. माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप गर्व असतो. त्यातूनच मग तो मी हे केले, मी ते केले, माझ्यामुळेच हे झाले अशा प्रकारची अहंकारी विधाने करत असतो. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ आहे असे दिसले की मग त्याचा मत्सर जागा होतो. तो त्याचा द्वेष करू लागतो आणि मग त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही पातळीला जातो.
स्वार्थ म्हणजे स्व -अर्थ. स्वार्थी माणूस केवळ स्वतःचाच फायदा पाहत असतो. पैसा, संपत्ती यासारख्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्याचे समाधान होत नाही. अजून हवे, अजून हवे असे त्याला वाटत राहते. एकदा हातात भरपूर पैसा आला की मग त्याच्या जोडीला मद येतो. अहंकार वाढत राहतो. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याचा द्वेषही मनामध्ये ठाण मांडून बसतो. पण जो परमेश्वराचा खरा भक्त असतो, त्याची मानसिक अवस्था या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते. तो तृप्त असतो. आहे त्या परिस्थितीत संतुष्ट आणि समाधानी राहतो. कोणाचा तिरस्कार किंवा द्वेष करणे त्याच्या मनात येत नाही.
या श्लोकात खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. खरा भक्त प्रपंच तर करतो पण कसा? तर संसारात राहूनही तो त्यापासून अलिप्त असतो. तो विरक्त वृत्तीने जगतो. खरा भक्त असण्यासाठी भगवे कपडे, माळा, टिळा, टोपी, गंध इत्यादी धारण केले पाहिजे असे नाही. त्यासाठी कुठे वनात जावे लागत नाही. आपण संसारात राहून सुद्धा भगवंताचे लाडके भक्त होऊ शकतो.
कमलपुष्पाचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कमळ चिखलात असते पण त्यात राहूनही ते त्यापासून दूर असते. असेच संसारात देखील राहता आले पाहिजे. संसाराची उपाधी खऱ्या भक्ताला असत नाही म्हणजेच त्याला संसाराचे पाश बांधू शकत नाहीत. संसारात असूनही तो मुक्त असतो, विरक्त असतो.
खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. त्याचे बोलणे नम्र असते, बोलण्यात माधुर्य असते. आपल्या बोलण्याने तो कोणालाही दुखवत नाही. यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. खऱ्या भक्ताच्या अंगी हे गुण आपोआप येतात. निवडणूक आली म्हणजे बरेच पुढारी अगदी नम्रतेने जनतेला सामोरे जातात. कार्पोरेट क्षेत्रातही कामाच्या गरजेपोटी नम्रता धारण केली जाते. पण हे सगळे मुखवटे असतात. आतले रूप वेगळ्याच असते. असे आपल्याला अनेक प्रसंगी आढळून येते. खरा भक्त हा अंतर्बाह्य निर्मळ असतो. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जेवढं मऊ आणि मुलायम असतं, तसंच सज्जनांचे चित्त असतं असं तुकाराम महाराज म्हणतात.
समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांच्यासारखे संत काही वेळा कठोरपणाने बोलताना दिसतात. पण त्यामागे समाज हिताची तळमळ असते. आई सुद्धा आपल्या मुलाला प्रसंगी रागावते, तर कधी चिडून " मर मेल्या... "असे सुद्धा उद्गारते. परंतु त्यातही तिचे प्रेम असते आणि मुलाच्या कल्याणाचाच विचार असतो. असेच संतांचीही बोलणे असते. जाणीवपूर्वक कोणाचेही मन दुखवावे म्हणून ते बोलत नसतात.
म्हणून आपणही परमेश्वराचे प्रिय भक्त होण्याचा प्रयत्न करावा. अहंकार, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी यांच्यासारख्या दुर्गुणांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात रहावे, प्रपंच उत्तम करावा. परंतु ज्या काही गोष्टी घडतात, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहायला शिकावे म्हणजे आपल्याला त्या बंधनकारक होत नाहीत. अनावश्यक बोलणे टाळावे आणि जे काही आपण बोलू त्यात नम्रता आणि माधुर्य असावे. असा भक्त हा त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील सर्वोत्कृष्ट असा भक्त असतो.
स्वसंवाद
१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का? की ते केवळ गरजेपुरते असते आणि आतमध्ये वेगळेच असते ?
२) माझ्या मनात कोणाबद्दल मत्सर किंवा द्वेष आहे का ?आणि त्याची मला जाणीव होते का ?
३) जीवनात मी साक्षीभावाने वागण्याचा प्रयत्न करतो का की संसारातील गोष्टी मला पूर्णपणे बांधून टाकतात ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा