मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६१

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६१

उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे |

तया अंतरी सर्वदा ते चि आहे |

जनी सज्जनी वाद हा वाढवावा |

पुढे मागुता शोक जीवी धरावा |६१|

अर्थ 

एखादा माणूस कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे परंतु त्याच्या मनात जर दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या इच्छांचीच कामना असेल तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागेल.  त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि त्यांच्याशी निरर्थक वाद घालू लागली तर त्यालाही आयुष्यभर दुःखालाच सामोरे जावे लागेल.

( वाहे- सुरू राहील,  सज्जन- साधू पुरुष,  वाद- निरर्थक चर्चा )

विवेचन 

आधीच्या श्लोकात श्रीराम किंवा भगवंत म्हणजे कल्पतरू आहे असे समर्थांनी सांगितले. परंतु असा कल्पतरू किंवा कल्पवृक्ष आपल्याजवळ असताना त्याच्या छायेत उभे राहून दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींची कामना करीत राहिलो तर आपल्या वाट्याला दुःख येईल आणि आयुष्यभर ते दुःखच सुरू राहील. काही माणसांचा स्वभावाच असा असतो की ते आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करून घेतात. चेहऱ्यावर कायमच बारा वाजलेले असतात. माझ्याच वाट्याला हे दुःख का ? मी फार कमनशिबी आहे. मला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. अशा प्रकारचे निराशेचे विचार त्यांच्या मनामध्ये कायम घोळत असतात. आणि परिणामी दुःखच त्यांच्या वाट्याला येते. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात की असे लोक कल्पवृक्षाच्या खाली बसूनही दुःखच करीत राहतात त्यांच्या इतके अभागी कोणीच नाही. 

खरे संत किंवा साधू पुरुष मुळातच भेटणे दुर्मिळ असते. ते आपल्यासाठी मोक्षमार्गाचे दिशादर्शक असतात. त्या मार्गावर कशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या मनात सदैव आपल्या कल्याणाचीच इच्छा असते. म्हणूनच संतांबद्दल बोलताना तुकाराम महाराजांनी," संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळू"  असे म्हटलेआहे. पण काही व्यक्ती संतांजवळ आपले कल्याण करून घेण्याच्या हेतूने जात नाहीत.  त्यांना नको ते प्रश्न विचारून किंवा त्यांच्याशी निरर्थक वाद घालून आपली विद्वत्ता ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. खरंच देव आहे का? तुम्ही पाहिला आहे का ? देव आहे हे कशावरून ?हे सगळे परमेश्वराच्याच मर्जीने घडते याचा काय पुरावा आहे ? यासारखे निरर्थक प्रश्न असे लोक विचारत राहतात आणि निरर्थक व्यर्थ वाद घालत राहतात. 

परमेश्वराच्या भक्तीचे महत्व, परमेश्वराची भक्ती कशी करावी, अनुसंधान कसे टिकवून ठेवावे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी जर आपण  अशा निरर्थक गोष्टींवर वाद घालत राहिलो तर आपल्या वाट्याला आयुष्यभर दुःखच येणार हे निश्चित! आणि वेळ निघून गेल्यानंतर आपली चूक कळली तरी काही उपयोग नसतो. 

परमेश्वर सर्वव्यापी आहे. या अर्थाने आपण २४ तास कल्पवृक्षाच्या खाली उभे असतो. कल्पवृक्ष म्हणजे मागितलेले सगळे काही देणारा. या कल्पवृक्षाच्या खाली उभे राहून आपण ज्या काही इच्छा व्यक्त करू, त्यांना 'तथास्तु' म्हणून तो आशीर्वाद देत असतो. म्हणून नेहमी विधायक बोलणे, चांगल्या इच्छा ठेवणे आणि चांगले गोष्टींची कामना करणे हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. म्हणजे या चांगल्या गोष्टींसाठी त्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद लाभेल. तो तथास्तु म्हणेल आणि त्या गोष्टी आपल्याकडे परत येतील. परंतु आपण जर दुःख देणाऱ्या गोष्टींची किंवा वाईट गोष्टींची अपेक्षा ठेवली तर त्याच गोष्टी आपल्याकडे परत येणार आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतो.

या ठिकाणी आपला असाही गैरसमज होण्याची शक्यता आहे की वाईट इच्छा आपण कशाला व्यक्त करू ? परंतु आपण कामना करतो ते दुःख देणार्‍या गोष्टींचीच.  भौतिक सुखे, ऐहिक गोष्टी आपल्याला हव्या असतात. पण त्या अंतिमतः दुःखच देतात. श्रेयस मागण्याऐवजी आपण प्रेयसाचीच कामना करतो. म्हणून आपल्या विचाराने आपणच आपले भविष्य घडवत असतो. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार असतो. 

समजा प्रत्यक्ष परमेश्वर भेटला किंवा अचानक कल्पवृक्षाच्या खाली बसण्याचे भाग्य लागले तर अशावेळी काय मागावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे. एका भिकारी माणसाने एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि अशी इच्छा करत बसला की मला जर ही लॉटरी लागली तर मी खूप श्रीमंत होईल आणि गाडीत बसून भीक मागेन. तेव्हा काय मागायचे किंवा इच्छा सुद्धा काय करायची याचेही ज्ञान हवे. त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. मनामध्ये लोककल्याणाची भावना हवी. साधुसंत भेटल्यानंतर त्यांच्याकडून आत्मोद्धार कसा करून घेता येईल याबद्दल विचार करता यायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या इंद्रियांना वळण लावायला हवे. त्यासाठी वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्यथा नंतर केवळ पश्चातापच हाती उरतो.

म्हणूनच समर्थ या श्लोकातून आपल्याला बजावतात की कल्पवृक्षाची सावली सदैव आपल्यावर आहे, परंतु त्या सावलीचा लाभ घेण्यासाठी आपले मन शुद्ध, विवेकी आणि श्रेयसाभिमुख असणे अत्यावश्यक आहे. संतांची संगती हे त्याचेच साधन. आणि ते साधन वाया घालवणे म्हणजे स्वतःच स्वतःला दुःखाच्या गर्तेत लोटणे होय.

स्वसंवाद

१. माझ्या आयुष्यात कल्पवृक्ष म्हणजे परमेश्वर सदैव सोबत आहे, हे मला खरोखर मनापासून वाटते का? 

२. मी रोज जे विचार करतो, जे शब्द उच्चारतो, ते विधायक असतात की निराशेचे ? माझ्या मनाचा कल कोणत्या दिशेने जास्त आहे?

३. एखाद्या संत, ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरूंशी बोलताना मी खरोखर काही शिकण्यासाठी जातो की माझी विद्वत्ता दाखवण्यासाठी ? 

४. "श्रेयस" आणि "प्रेयस" यांतला फरक मला कळतो पण मी प्रत्यक्ष आयुष्यात श्रेयसाची निवड किती वेळा करतो?

५. माझ्या जीवनातील एखाद्या दुःखाचे मूळ माझ्याच विचारांत किंवा चुकीच्या इच्छांमध्ये होते असे आता वाटते का? (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३०/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...