उगवतीचे रंग
अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया
वैशाखाच रणरणतं ऊन अंगाची काहिली करीत आहे. माणसे, पशुपक्षी झाडांचा आश्रय घेत आहेत. झाडांच्या सावल्या आखूड होतात. रस्त्यावर डांबर अगदी वितळायला लागते. पण याच वैशाखात असा एक दिवस येतो जो या उन्हाळ्यालाही शीतल करून टाकतो. तो दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया – अक्षय तृतीया !
अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, कधीही न झिजणारे. या दिवसाच्या नावातच त्याचे सार आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या दिवसाचे महत्त्व सांगताना म्हटले होते, "या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते." म्हणजेच या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनंतकाळ टिकते. असा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो.
या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ती फलदायी होते. अनेक अर्थांनी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवसाची महती केवढी आहे पाहा! याच दिवशी कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले. याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामांचा अवतार धारण केला म्हणून या दिवशी परशुराम जयंती सुद्धा आहे. नर-नारायणाची जयंती सुद्धा याच दिवशी. भगवान व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना सुरू केली ती याच तिथीला, आणि त्यांचे लेखनिक म्हणून स्वतः गणपतीने काम केले. गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली ती याच दिवशी. हिमालयातील बद्रीनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक दीर्घकाळ तिष्ठत असतात. या भाविकांसाठी बद्रीनारायणाच्या मंदिराचे दरवाजे याच दिवशी उघडतात. वृंदावनाच्या बांकेबिहारीचे चरणदर्शन वर्षातून केवळ याच एका दिवशी होते. इतकी एकवटलेली पुण्याई या एका तिथीत आहे ! म्हणूनच हा अत्यंत पुण्यप्रद असा मुहूर्त आहे.
जैन धर्मातही या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगवान वृषभदेवांनी मोक्षप्राप्तीसाठी वर्षभर तपस्या केली. अन्नपाण्याचा त्याग केला. ते हस्तिनापूर येथे आले असता राजा श्रेयांशाने त्यांना उसाच्या रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय तृतीयेचाच होता. त्यामुळे जैन बांधवांसाठीही हा दिवस अत्यंत पवित्र आहे.
महाराष्ट्रात या दिवसाला तर एक वेगळेच महत्त्व आहे. चैत्रगौरीच्या उत्सवाची सांगता याच दिवशी होते. स्त्रिया एकमेकींना हळदीकुंकवासाठी बोलावतात, मोगऱ्याचा गजरा, आंब्याची डाळ आणि थंडगार पन्हे देतात. कैरीच्या पन्ह्याचा तो मंद सुगंध, मोगऱ्याचा दरवळ आणि स्त्रियांच्या गप्पांचा आनंद – हे सगळे मिळून एक अविस्मरणीय चित्र तयार होते. खान्देशात तर या सणाला "आखाजी" म्हणतात आणि दिवाळीइतकेच महत्त्व देतात. या दिवशी लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येतात. झाडांवर झोके बांधलेले असतात. माहेरी आलेल्या मुली या झुल्यावर बसून खूप आनंद घेतात. जेवढा झुला उंच जाईल तेवढ्याच त्यांच्या इच्छा, आकांक्षा देखील उंच जातात. पण आता काळाच्या ओघात या सुंदर आणि आनंद देणाऱ्या प्रथा कमी होत चालल्या आहेत.
या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. मातीचे मडके आणून त्यात वाळ्याचे पाणी भरतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर खीर, पन्हे, पापड यांचे नैवेद्य मांडतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. या कृतीत एक खोल भाव आहे. या उन्हाळ्यात जाणाऱ्या-येणाऱ्याला थंड पाणी मिळावे, ही माणुसकीची भावना त्यामागे आहे.
अक्षय तृतीयेचे महत्त्व वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या आहे. बंगालमध्ये व्यापारी लोक या दिवशी नव्या हिशोबाच्या वह्या वापरात आणतात तर ओरिसात शेतकरी लक्ष्मीपूजन करून नव्या पेरणीला सुरुवात करतात. राजस्थानात विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मीचे पूजन करतात. अशा रीतीने संपूर्ण भारतभर, वेगवेगळ्या रूपात हा सण साजरा होतो. आपल्या देशाच्या सांस्कृतिक एकतेचेच सुंदर दर्शन या सणाच्या निमित्ताने घडते.
अक्षय तृतीयेला लोक नवीन घर, वाहने, सोने यांची खरेदी करतात. परंतु या दिवसाचे महत्व केवळ खरेदीपुरते मर्यादित नाही. या दिवशी केलेले दान, केलेली सेवा, केलेले नामस्मरण हे सगळे अक्षय फळ देणारे आहे. खरी अक्षय संपत्ती ही सोन्याच्या दागिन्यांमध्ये नाही तर सत्कर्माच्या संचितात आहे. म्हणून अक्षय तृतीयेच्या सणाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहूया. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, न झिजणारे. परंतु एक प्रश्न इथे सहज मनात येतो...
आजच्या काळात आपण नेमके काय “अक्षय” करण्याचा प्रयत्न करतो आहोत?
सोनं, संपत्ती, मालमत्ता… की काही अधिक खोल आणि शाश्वत?
खरं पाहिलं तर, या दिवशी सोनं खरेदी करण्यापेक्षा स्वतःमध्ये गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे ठरते. ज्ञान, आरोग्य, नाती आणि अंतर्मनाची शांतता—हीच खरी अक्षय संपत्ती आहे. कारण ही वाढत जाते, टिकत राहते आणि आयुष्य समृद्ध करते.
ग्रामीण भागात आणि इतरही अनेक ठिकाणी या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. म्हणून पाण्याचा देखील जपून वापर करणे आणि शक्य असल्यास इतरांना पाणी उपलब्ध करून देणे हे देखील मोठे पुण्याचे काम ठरू शकते. यातूनच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत सुंदर आणि आधुनिक अर्थ आपल्याला घेता येतो. निसर्गाची जपणूक आणि संसाधनांचा संयमी वापर ही देखील एक प्रकारची अक्षय साधना आहे.
या दिवसात तहानेने जीव व्याकुळ होतो. पण बऱ्याच वेळा शहरातील लोक आपली तहान भागवण्यासाठी कृत्रिम शीतपेयांचा वापर करतात. ही शीतपेये आरोग्यासाठी अपायकारक असतात. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, विविध प्रकारची घरगुती सरबते, ताक, उसाचा रस इ. आरोग्यदायी पेयांचा वापर करून आपल्याला हा उन्हाळा सुसह्य करता येईल.
या वैशाखाच्या उन्हात उगवत्या सूर्याचे किरण जेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या अंगणात येतात, तेव्हा ते केवळ प्रकाश आणत नाहीत तर एक अक्षय आशीर्वादही घेऊन येतात. या दिवशी एखादे तरी सत्कर्म करावे. एखाद्याला थंड पाणी द्यावे, एखाद्या गरजूला मदत करावी. ती कृती अक्षय होते. कारण या दिवसाचे नावच आहे अक्षय तृतीया!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा