उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५८
नको वासना वीषई वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें |
सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥
अर्थ
हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.
( पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस )
विवेचन
५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.
वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण ! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.
वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.
माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.
माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.
मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का ? निश्चितच आहे ! समर्थ म्हणतात,"आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.
पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.
या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,
वृत्तीची निवृत्ती आपणा सकट |अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||
जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.
स्वसंवाद
१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?
२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?
३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?
४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?
५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२७/०४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा