उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५६
दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू |
स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू |
तया अंतरी क्रोध संताप कैचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५६|
अर्थ : जो अनाथ आणि दुःखितांवर प्रेम करतो, जो मनाने अत्यंत मृदू आहे, प्रेमळ आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करणारा आहे, तसेच शरणागताला आश्रय देणारा आहे आणि ज्याच्या अंतरात राग किंवा संताप यांना त्रास नाही, असा परमेश्वराचा भक्त जगामध्ये खरोखरच धन्य होय.
( मवाळ - मृदू, स्नेहाळ - प्रेमळ, दासपाळू - शरणागताला आश्रय देणारा, संताप -त्रास )
विवेचन
हा श्लोक "जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा" या पालुपद-मालिकेचा सुंदर समारोप आहे.
हा श्लोक वाचताना एक विशिष्ट लय आपोआपच प्राप्त होते.' ळ 'ची पुनरावृत्ती याला एक वेगळेच सौंदर्य देते. परंतु हे केवळ भाषिक दृष्टीने जरी असले तरी अर्थाच्या दृष्टीने देखील हा श्लोक तेवढाच सुंदर आहे. जो भक्त भगवंताचा होऊन राहिला आहे, त्याच्यामध्ये काही गुणांचा परिपोष आपोआपच होत असतो. अशा भक्ताच्या अंगी कोणते गुण असतात ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे.
संत हे भगवंताचे श्रेष्ठ भक्त असतात म्हणून संतांमध्ये वरील श्लोकातील गुण आपल्याला प्रकर्षाने दिसतात किंवा जाणवतात. अत्यंत प्रेमळपणा हा संतांचा गुण! ते अनाथांची, दिनांची, दुःखी जनांची माउली होतात. संत एकनाथांनी तप्त वाळवंटात रडत असलेले हरिजनाचे मूल कडेवर उचलून घेतले. पूर्वजांचे श्राद्ध करीत असताना भुकेल्या हरिजनांना जेवू घातले, तृषार्त गाढवाच्या मुखी गंगेचे पाणी घातले. प्रसंगी परमेश्वर तरी कठोर होतो, परंतु संतांना मात्र सर्वसामान्यांचा अपार कळवळा असतो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी मी अवतार घेतो असे गीतेमध्ये भगवंत म्हणतात. परंतु ज्ञानेश्वर माउलींसारखे संत दुष्ट नाहीसे होवो असे म्हणत नाहीत तर दुष्टांचा दुष्टपणा नाहीसे होवो असे म्हणतात.
सर्वसामान्यांच्या त्रासाने संत संतापत किंवा दुःखी होत नाहीत. त्यांच्याजवळ अपार करुणा असते. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते याचसाठी. संत कधी कधी कठोरपणे वागले किंवा बोलले तरी देखील त्यात लोककल्याणाची तळमळ आणि प्रेम असते. दासपाळू म्हणजे भगवंताच्या भक्ताला ते आश्रय देणारे असतात.
गीतेत भगवंतांनी स्थितप्रज्ञ पुरुषाची जी लक्षणे वर्णन केली आहेत, असे स्थितप्रज्ञ म्हणजे संत असतात. परंतु अशा व्यक्तींबद्दल बोलताना समर्थ त्यांना संत, महात्मे किंवा साधू असे म्हणत नाहीत तर अशा व्यक्तींसाठी ते 'दास सर्वोत्तमाचा 'शब्द वापरतात. हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहेत. दास म्हटले म्हणजे अहंता येत नाही. ज्या व्यक्ती आपल्याला साधू, संत, महात्मे म्हणवून घेतात, अशांच्या ठिकाणी अहंकार येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अशी माणसे आपल्याला सिद्धी प्राप्त आहे अशा प्रकारचा दावा करतात. खरे तर सिद्धी या परमार्थापासून दूर नेतात. परंतु सामान्य माणसे सिद्धीला भुलतात.याच गोष्टीचा गैरफायदा अशी मंडळी घेऊन समाजातील लोकांना फसवत असतात. फसवणुकीची अशी खूप उदाहरणे आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. सुशिक्षित लोक देखील अशा प्रकारच्या चमत्कारांना बळी पडतात. म्हणून समर्थांच्या उपदेशामध्ये सिद्धींचा उल्लेखही नाही. समर्थांच्या दृष्टीने संत पुरुष तोच की जो परमेश्वराचा दास असतो.
परमेश्वराचा साक्षात्कार झालेले संत निरीच्छ असतात. विपरीत परिस्थितीने ते दुःखी होत नाहीत आणि अनुकूल परिस्थिती आली म्हणून हर्षित होत नाहीत. लोककल्याणाची त्यांना तळमळ असते. त्यासाठीच ते आपले आयुष्य घालवतात आणि म्हणून आता उरलो उपकारापुरता... असेच ते म्हणतात. असेच सर्वोत्तमाचे दास जगामध्ये धन्य भक्त म्हणवले जातात.
स्वसंवाद
१) माझ्या मनात दुसऱ्यांबद्दल खरी करुणा आहे का – की ती केवळ दिखाव्यापुरती असते ?
२) "दुष्टपणा नाहीसे होवो" असे म्हणण्याइतकी उदारता माझ्या मनात आहे का – की मला माणसेच नको असतात ?
३) मी "दास" आहे की "महात्मा" होण्याच्या मागे आहे – नम्रतेने परमेश्वराचा दास राहणे मला खरोखर पसंत आहे का ? (क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा