मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६०

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६०

मना राम कल्पतरू कामधेनू |

निधी सार चिंतामणी काय वानू|

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता|

तया साम्यता कायसी कोण आता |६०|

अर्थ 

हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी... सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू ? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल ?

( चिंतामणी - इच्छिलेली वस्तू देणारा, वानू - वर्णन करू )

विवेचन 

या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया.

कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते. कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार किंवा खजिना, चिंतामणी म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा काल्पनिक मणी. 

प्रभू रामचंद्र भक्तांचे सर्व मनोरथ पुरवणारे आहेत. ते कल्पतरू, कामधेनू आहेत. आपल्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी ते घेतात. इच्छिलेले सर्व काही देणारे ते आहेत. ते निधी म्हणजे कुबेराचे भांडार आहेत. कुबेराचे भांडार म्हणजे समृद्ध खजिना! कशाचीही कमी नाही. म्हणजेच श्रीरामाच्या भक्तांना कसलीही कमी पडणार नाही.  त्यानंतर समर्थ म्हणतात की ते सार आहेत. सार म्हणजे महत्त्वाचे तत्व ! या विश्वामध्ये सार म्हणजे फक्त एक श्रीराम. बाकी सर्व काही असार. एका वाक्यात सांगायचे झाले तर रामनाम ही सर्व कुलुपांची अशी एक किल्ली आहे की ज्यामुळे सर्व कुलुपे विनासायास उघडतात. 

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात परमेश्वराला प्रार्थना करताना म्हटले आहे, "जो जे वांछील,  तो ते लाहो." म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा होईल ती ती गोष्ट प्राप्त होवो.  अर्थात या ठिकाणी इच्छा म्हणजे सदिच्छा किंवा चांगली इच्छा हे गृहीत आहे. भक्ताच्या चांगल्या इच्छाच भगवंत पुरवेल. आणि श्रीरामांच्या भक्तांना वाईट इच्छा कशी होईल ? म्हणून आपल्या भक्तांच्या मोक्षाच्या, दर्शनाच्या सर्व कामना तो दयानिधी पुरविल.

वर निधी म्हणजे कुबेराचा खजिना असे आपण म्हटले आहे. परंतु निधी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आणखी वेगळा आणि थोड्या व्यापक अर्थाने घेता येईल. निधी म्हणजे साठा. निधी म्हणजे समुद्र. श्रीराम म्हणजे गुणांचा साठा, दयेचा आणि करुणेचा समुद्र. आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा असा तो आहे. त्याच्या गुणांचे काय वर्णन करावे? त्यासाठी शब्द कमी आहेत. तो कोणासारखा बरं आहे ? तर त्याच्यासारखा तोच !

अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने ? असा तो आहे. तो द्यायला बसला की आपली झोळी अपुरी पडेल. म्हणून काही मागायचे तर त्याच्या जवळच मागावे. जो सगळे काही आहे जो, सारसर्वस्व आहे, त्याच्याजवळ मागण्याचे सोडून इतरांजवळ मागण्यात काय हशील ?

व्यवहारामध्ये आपली इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती करणारी सारी साधने गौण आहेत. त्या इच्छा,  त्या वासना कधी संपतच नाहीत. भगवंत जेव्हा आपली इच्छापूर्ती करतो, तेव्हा काही मागायचे राहतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात," काय उणे आम्हा विठोबाचे पायी ?" अशी भक्ताची अवस्था होते. मन शांत, तृप्त होते आणि अत्यंत सामर्थ्यशाली बनते. कोणतीही आणि कशीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, असा भक्त डगमगत नाही. असे समाधान देणारा भगवंत हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची बरोबरी कशानेही होणार नाही. 

स्वसंवाद

१) मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाह्य साधनांवर जास्त अवलंबून आहे का, की परमेश्वरावर विश्वास ठेवतो?

२) “मला अजून काही हवे आहे” ही भावना माझ्यात कितपत आहे? की “काय उणे आहे?” अशी तृप्ती आहे?

३) मी जे मागतो, ते खरोखर माझ्या कल्याणासाठी आहे का, की केवळ वासनापूर्ती आहे?

४) माझ्या जीवनात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मला भगवंत “सर्वस्व” वाटतो का, की अजूनही इतर गोष्टींमध्येच माझा जास्त विश्वास आहे? ( क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

२९/०४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...