उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५७
जगीं होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
अर्थ : भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता ) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.
विवेचन
या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.
आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.
त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.
संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.
भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.
आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.
स्वसंवाद
१) माझी उपासना "नित्यनेमाने" होते का ? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा ?
२) "सामान्य माणसाला देवात विषय दिसतो" माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात ?
३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१८/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा