उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५५
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥
अर्थ: ज्याच्या मनातील दुष्ट वासना आणि वाईट विचार नाहीसे झाले आहेत, भगवंताला आपल्या प्रेमपाशात बांधण्याची उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये तीव्रतेने आहे आणि ज्याच्या प्रेमामुळे आणि शरणागत वृत्तीमुळे स्वतः भगवंत त्याचा ऋणी झाला आहे, असा भक्त भगवंताचा जगातील सर्वात उत्कृष्ट किंवा धन्य भक्त आहे.
( नष्ट -त्याज्य/वाईट, दुराशा - दुष्ट वासना वासना /इच्छा, प्रेमपाश- प्रेमाने बांधून ठेवणे, पिपाशा - तृष्णा /तहान )
विवेचन
भगवद भक्तीत जो रंगून गेला आहे, तो मनाने अंतर्बाह्य निर्मळ असतो. आत एक आणि बाहेर एक असे त्याच्याजवळ असत नाही. वासना, विकार आणि दुष्टभावना यांना त्याच्या मनात थारा नसतो. किंबहुना ह्या गोष्टी त्याला सहनच होत नाहीत. जसे आपल्याला शुभ्र वस्त्रावर एखादाही डाग चालत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन शुभ्र वस्त्रासारखे आणि पारदर्शक असते. अशा भक्त विषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, " जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे हृदयी. "
"मना वासना दुष्ट कामा नये रे.." असे समर्थ सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. रावणाच्या मनामध्ये सीतेची कामना होती. धृतराष्ट्राच्या मनात पुत्रमोह होता. दुर्योधनाच्या मनात राज्याची कामना होती. अशा वाईट आणि दुष्ट विचारांमुळे त्यांचा नाश झाला.
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ऐहिक सुखाची कामना असते. सत्ता, पैसा, सोनेनाणे कितीही मिळाले तरी हवेच असते. पण भगवंताचा खरा भक्त मात्र या गोष्टींपासून दूर असतो. तो कामना करतो ती भगवंताचीच!त्याच्या मनात तळमळ असते ती भगवंतप्राप्तीचीच! त्याची समर्पण भावना एवढी तीव्र असते की स्वतः भगवंत त्याच्या ऋणात राहतो. त्यांना कोणतेही ऐहिक सुख नको असते. तुकाराम महाराज म्हणतात, " न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.. " त्यांचे भगवंताशी प्रेमाचे नाते जोडलेले असते. "तूंचि बापधनी" अशी भावना परमेश्वराबद्दल भक्ताच्या मनात असते. तोच त्यांचे आई-वडील, गुरु सगळे काही असतो.
भगवंताला देखील अशा भक्तांचा दास व्हावेसे वाटते. आपल्या दासाला कोणताही त्रास झालेला भगवंताला चालत नाही. मग जनाईला तो दळण दळू लागतो, नाथांच्या घरी तो पाणी भरतो, विठू महाराच्या रुपात दामाजींचे कर्ज फेडतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो, अर्जुनासाठी त्याच्या रथाचे सारथ्य पत्करतो. यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.
देव बांधला जात नाही आणि त्याला कोणी बांधू शकत नाही. श्रीकृष्ण लहान असताना यशोदेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु जो जो त्याला बांधायला जावे तो तो दोरी अपूर्ण पडत होती. मग भगवंताने स्वतःच तिच्याकडून बांधून घेतले. असा भगवंत भक्तांच्या प्रेमाने बांधला जातो. हे अदृश्य बंधन असते. देव भावाचा भुकेला असतो.
सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तो श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो जेव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेला आला तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः त्याच्या पायात मोडलेले काटे काढले, त्याचे पाय धुतले, सेवासुश्रुषा केली. अशा रीतीने भगवंत हा भक्तांचा ऋणी होतो. परंतु त्यासाठी भक्ताची देखील तेवढी योग्यता असावी लागते.
आपले सगळे संत भगवंताचे असेच प्रेमळ भक्त होते. "संतांचीया गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश " असे उद्गार संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज काढतात. म्हणूनच आपण सगळ्या संतांना माउली म्हणून संबोधतो. अशा संतांचा तर भगवंत देखील ऋणी असतो आपण अशा संतांचे दास व्हावे म्हणजे दासानुदास व्हावे. एवढी समर्पण भावना जर आपल्याजवळ असेल तर भगवंत प्राप्ती दूर नाही.
स्वसंवाद
१) माझ्या मनातील दुराशा आणि वाईट विचार मला जाणवतात का? आणि ते नाहीसे करण्याचा मी प्रयत्न करतो का ?
२) भगवंताला प्रेमपाशात बांधण्याची तळमळ माझ्या मनात आहे का? की माझी भक्ती केवळ ऐहिक गोष्टींसाठीच आहे ?
३) "दासानुदास" होण्याची माझी तयारी आहे का – संतांच्या चरणी नम्रतेने जाण्याइतकी समर्पण भावना माझ्यात आहे का ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१६/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा