उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग चौदा
त्रावणकोर राज्याप्रमाणेच गुजरातमधील काठियावाड हे राज्य देखील स्वतंत्र राहण्याची स्वप्नं पाहत होतं. काठियावाडमध्ये छोट्या छोट्या २२२ संस्थानाचा समावेश होता. या संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणासाठी सरदार पटेलांनी एक अठरा कलमी योजना बनवली होती. या संस्थानांमध्ये पोरबंदरचा सुद्धा समावेश होता. गांधीजींचा जन्म सुद्धा पोरबंदर येथील असल्याने या संस्थानांचे एकत्रीकरण व्हावे या मताचे गांधीजी होते. पण या संस्थानांवर नवानगरचे राजे (आता जामनगर ) जामसाहेब यांचा मोठाच प्रभाव होता. काठियावाडमधील सात राज्यांनी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरदार पटेलांसमोर हे एक मोठे आव्हान होते. जामसाहेब हे अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. राजस्थानमधील संस्थानिकांना आपल्या महासंघात सामील करून घेण्यासाठी ते आणि गुजरातच्या अन्य महाराजांचा एक गट दिल्ली विमानतळावर राजस्थानला जाण्यासाठी थांबला होता.
पटेलांना याची खबर लागताच त्यांनी जामसाहेबांना आपल्याकडे भोजनासाठी बोलावले. त्यांच्यासाठी मोटार पाठवली. पटेलांच्या बरोबर झालेल्या भेटीत पटेलांनी त्यांना जीनांच्या कुटील कारस्थानांची कल्पना दिली आणि जर ते भारतीय संघराज्यात सामील झाले नाहीत तर पाकिस्तानकडून भविष्यात होऊ शकणारा धोका त्यांना समजावून सांगितला. पटेलांची ही क्लुप्ती अतिशय यशस्वी ठरली. जामसाहेबांना पटेलांच्या बोलण्यातून भविष्यात काय होऊ शकते याची चुणूक दिसली. त्यांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला.
१५ जानेवारी १९४८ ला या सर्व संस्थानातील राजांची एक सभा पटेल यांनी बोलावली. त्या सभेमध्ये सर्व संस्थानिकांना भारतीय संघराज्यात सामील होण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. या संस्थानिकांना भारताच्या नवनिर्माणाबद्दल आवाहन केले. स्वतंत्र राहण्याचा आणि पाकिस्तानकडून भविष्यात होऊ शकणारा धोका पटवून दिला. पटेलांच्या भाषणाचा त्या सर्व संस्थानिकांवर एवढा प्रभाव पडला की त्यांनी सर्वांनी त्याच दिवशी भारतीय संघराज्यात सामील होण्याला मान्यता दिली. या काठियावाडमध्ये शंभराच्या वर राज्ये होती म्हणून पुढे या प्रदेशाचे ' सौराष्ट्र ' हे अतिशय सार्थ नामकरण करण्यात आले.
यानंतर प्रश्न उभा राहिला तो भोपाळ राज्याबद्दल. भोपाळचे महाराज म्हणजे तिथले नबाबासाहेब होते. तसे भोपाळ हे राज्य त्रावणकोर, जोधपूर किंवा काठियावाड या राज्यांच्या मानाने लहान होते पण या नबाबाचे इंग्रंजांशी चांगले संबंध होते. जीनांचा जवळचा माणूस म्हणूनही ते ओळखले जात होते. त्यामुळे इतर मुस्लिम राजे किंवा संस्थानिक त्यांना मानत होते. या नबाबाने हैदराबादच्या निजामाशी सुद्धा संबंध प्रस्थापित केले होते. या नबाबाचे नाव होते हमीदुल्लाखान. हा नबाब सतत भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतला होता.
काश्मीर ते कन्याकुमारी असलेल्या विशाल भारताचे छोटे छोटे तुकडे व्हावे ही त्याची आंतरिक इच्छा होती. भारतविरोधी राजांचा एक गट त्याने स्थापन केला होता. जास्तीत जास्त राज्यांनी या गटात सामील व्हावे आणि भारतात सामील होऊ नये म्हणून त्याचे प्रयत्न सुरु होते. इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर पाकिस्तानात सामील व्हायची त्याची इच्छा होती. त्याशिवाय जीनांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे गव्हर्नर पद आपल्याला मिळणार अशी आशा तो मनात बाळगून होता. पण जेव्हा पाकिस्तानातल्या मुस्लिम जनतेला हे कळले तेव्हा त्या जनतेने हिंसाचार आणि जाळपोळ करून त्याचा निषेध केला. या नबाबाला हाताळणे आणि त्याला भारतात सामील करून घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण भारतात सरदार पटेल नावाचे एक खंबीर व्यक्तिमत्व बसलेले होते. आपल्या अखंड भारताचे स्वप्न उधळून लावणाऱ्या या देशद्रोही नबाबाला कसे हाताळायचे हे पटेल यांना चांगलेच माहीत होते.
जसा या भोपाळच्या नबाबाने भारतविरोधी राजांचा एक गट स्थापन केला होता, तसाच आता त्याच्या विरोधात एक गट उभा राहिला. यामध्ये मोठमोठे संस्थानिक आणि त्यांच्या अधिकारी किंवा सचिवांचा समावेश होता. या सगळ्यांनी भोपाळच्या नबाबाचे मनसुबे सगळ्या राजांसमोर उघड केले. तशातच आपल्याला हैदराबादच्या निजामाचे साहाय्य मिळेल या आशेवर तो होता. पण इंग्रजांनी त्याच्या अपेक्षेपूर्वीच भारताला स्वातंत्र्य बहाल केल्यामुळे त्याचे मनसुबे उधळले गेले. उत्तरोत्तर तो एकटा पडत गेला. त्याला मिळणारे पाठबळ दिवसेंदिवस घटत गेले. त्याची हिंमत खचत गेली.
पटेलांनी मोठ्या चातुर्याने त्याच्या शक्तीचे खच्चीकरण केले होते. तरी काही करता येते का आशेने त्याने माउंटबॅटन यांना चाचपून पाहिले. त्यांच्यासमोर भारतात सामील होण्यासाठी काही अटी ठेवण्याचा प्रयत्न केला. पण माउंटबॅटन त्याला ओळखून होते. त्यांनी त्याची कुठलीही अट मान्य तर केलीच नाही पण उलटपक्षी त्याला आता एक काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल असे सुनावले. मग त्याने विलीनीकरणासाठी आपल्याला भारत सरकार स्थापन झाल्यापासून दहा दिवसांचा कालावधी मिळावा, मग आपण आपली भूमिका जाहीर करू अशी माउंटबॅटनना विनंती केली. माउंटबॅटन यांनी अशी मुदत देणे फक्त पटेल यांच्याच हातात आहे असे त्याला सांगितले.
पटेलांनी मात्र उदार मनाने त्याला ही परवानगी दिली. पण मुदत दिली तरी नबाबासमोर आता भारतात सामील होण्याशिवाय दुसरा योग्य पर्याय दिसत नव्हता. शेवटी त्याने शरणागती पत्करण्याचे ठरवले. २५ ऑगस्टला भोपाळ भारतात विलीन झाले. या भोपाळच्या नबाबाने मग आपले मनोगत सरदार पटेलांना एक पत्र लिहून कळवले. त्या पत्रात तो म्हणतो, ' मी माझा पराभव स्वीकारला आहे. माझे राज्य वाचवण्याचा मी शर्थीचा प्रयत्न केला पण मला त्यात यश आले नाही. जोपर्यंत तुम्ही देशहिताची भूमिका घ्याल तोपर्यंत मी कायम तुमच्यासोबत एक विश्वासू सहकारी म्हणून आहे. आता मी तुमचा समर्थक आणि मित्र बनलो आहे. तुम्ही फक्त हाक मारा. मी तुमच्या मदतीसाठी सदैव तयार असेन.' एवढे मतपरिवर्तन त्याचे झाले होते. अशा रीतीने सरदार पटेलांच्या कौशल्यपूर्वक परिस्थिती हाताळण्यामुळे स्वतंत्र भारताच्या मार्गातील काटे एकेक करून बाजूला होऊ लागले होते.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०१/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा