मुख्य सामग्रीवर वगळा

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अठरा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अठरा 

माऊंटबॅटन यांची भारतातील कारकीर्द संपत आली होती. ते इंग्लंडला परत जाणार होते. जाता जाता हैदराबादच्या यशाचे मोरपीस आपल्या मुकुटात खोवावे अशी त्यांची साहजिकच इच्छा होती. त्यांना हैदराबाद भारतात सामील करण्याच्या बाबतीत रस नव्हता तर येनकेन प्रकारे ही समस्या मार्गी लावून त्याचे श्रेय त्यांना घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एक कराराचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यातील बऱ्याचशा अटी हैदराबादच्या बाजूने झुकणाऱ्या होत्या. या कराराची कागदपत्रे तयार करून त्यांनी पं नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद, गोपालस्वामी अय्यंगार आणि संरक्षणमंत्री बलदेवसिंह यांना आपल्या सोबत घेतले. स्वतःच्या खाजगी विमानाने ते या सर्वांना घेऊन पटेलांच्या भेटीसाठी डेहराडूनला आले. या काळात सरदार पटेल हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे तेथे विश्रांती घेत होते. 

माऊंटबॅटन यांनी कराराच्या कागदपत्रांची फाईल पटेल यांच्यासमोर ठेवली. पटेल ती कागदपत्रे वाचत असताना त्यांच्या हावभावाकडे माऊंटबॅटन यांचे बारीक लक्ष होते. पटेल वाचता वाचता मध्येच पुटपुटत होते. ' नाही, हे शक्य नाही. मी हे कदापि मान्य करणार नाही. ' यानंतर माऊंटबॅटन यांनी काही न बोलता तो विषय तेथेच सोडून दिला. इकडची तिकडची चर्चा झाल्यावर सगळ्या मंडळींनी एकत्र जेवण घेतले. यानंतर पुन्हा सगळ्यांच्या  सुरुवात झाली. माऊंटबॅटन आता भारतातून परत जाणार हे जाणून सरदार पटेल म्हणाले, ' तुम्ही आमच्यासाठी बरेच काही केले आहे. तुम्हाला काय हवे ते मला सांगा. मला शक्य होईल ते मी तुमच्यासाठी करीन' . यावर माऊंटबॅटन यांनी क्षणभर विचार केला. ते म्हणाले, ' सरदार, आपण खरंच काही देऊ इच्छिता ? ' पटेल यांनी होकारार्थी मान डोलावली. माऊंटबॅटन यांनी आपले मन घट्ट केले आणि ते पटेलांना म्हणाले, 'आपण माझ्यासाठी खरेच काही करू इच्छित असाल, तर या कागदपत्रांवर स्वाक्षरी करा. ' 

' हा करार आपल्याला एवढा महत्वाचा वाटतो का ? ' पटेलांनी विचारले. यावर माऊंटबॅटन यांनी होकारार्थी उत्तर दिले. सरदार पटेलांनी कागदपत्रांची फाईल आपल्याकडे घेतली आणि काही न बोलता त्यावर स्वाक्षरी केली. सर्वजण आश्चर्याने बघतच राहिले. पटेलांनी माऊंटबॅटन यांना दिलेल्या शब्दाला जागून दिलदारपणे स्वाक्षरी केली होती. पण पटेलांच्या मनात काय आहे ते कोणीच सांगू शकत नव्हते. त्यांनी जरी स्वाक्षरी केली तरी पुढे यातून कसा मार्ग काढायचा आणि निजामाला वठणीवर कसे आणायचे याची योजना त्यांच्या मनात आकार घेत असावी. 

कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्याने माउंटबॅटन मोठ्या खुशीत दिल्लीला नेहरूंसह परतले. मॉंकटनही त्यांच्यासोबत डेहराडूनला आले होते ते हैदराबादला परतले. पण एक आश्चर्य घडले आणि पटेलांच्या मनासारखे आपोआप झाले. पटेल यांच्यासोबत झालेला करार आता निजामानेच फेटाळला. भारतात सामील होण्याऐवजी आम्ही हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढू असे  केले. पटेल यांच्या मार्गातले दोन अडथळे आता दूर झाले होते. निजामाने करार अमान्य केल्याने आता निजामावर कारवाई करायला ते मोकळे होते. माऊंटबॅटन इंग्लंडला गेल्याने त्यांच्या मध्यस्थीचा आता प्रश्नच नव्हता. हैदराबादमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालल्याने तातडीने कारवाई करावी अशा मताचे पटेल होते. नेहरू मात्र कारवाईसाठी अजूनही राजी होत नव्हते. 

हैदराबादमधील परिस्थिती दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली होती. हिंदूंचे मनोधैर्य खचत चालले होते. अशा परिस्थितीत लवकरात लवकर कारवाई करणे आवश्यक होते. पटेल यांनी त्यावेळी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ' मी हैदराबादमधील परिस्थितीबाबत अतिशय काळजीत आहे. आता आपल्याला खंबीर व्हायलाच हवे. अचूक निर्णय घेऊन कारवाई करायला हवी, तरच जनतेचे मनोधैर्य टिकून राहील. ' 

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी ) 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२७/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...