उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग नऊ
स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस जरी सर्वात मोठा आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेला पक्ष होता तरी या पक्षाने त्या वेळी ज्या काही चुका केल्या, त्याची फळे देशाला आजतागायत भोगावी लागत आहेत. पण याची फारशी माहिती आपल्याला नसते. या काळात सरदार पटेल यांच्यासारख्या धोरणी आणि दूरदर्शी नेत्याला या बाबत फार काही करण्याची संधी दिली गेली नाही. अन्यथा आज चित्र वेगळे दिसले असते.
१९४२ मध्ये गांधीजींनी जी ' चले जाव ' चळवळ सुरु केली होती, त्यामुळे इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली होती. ते तुरुंगातून तीन वर्षांनी सुटले. तोपर्यंत जीनांसारख्या जातीयवादी नेत्यांचे फावले होते. त्यांनी तोपर्यंत आपली पाळेमुळे बळकट केली होती. याच सुमारास केंद्रीय आणि प्रांताच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर या निवडणुकांमुळे कोणताही प्रश्न सुटणार नव्हता. तसेच काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते देखील तुरुंगात होते. अशा परिस्थितीत निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळणे दुरापास्तच होते. तरीदेखील मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढण्यास परवानगी दिली ही आश्चर्याची गोष्ट होती.
या सर्व गोष्टींचा व्हायचा तोच परिणाम झाला. या निवडणुकीत जीना यांच्या मुस्लिम लीगला भरघोस यश मिळाले. काँग्रेसला फार कमी जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीतील यशामुळे जीना यांचा अहंकार आणखी बळावला. त्यांनी आपली भूमिका आणखी ताठरपणे मांडायला सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांना त्यांना रोखण्यात अपयश आले. असे असले तरी अजूनही पंजाब, सिंध आणि बंगालमध्ये जीनांच्या भूमिकेला लोकांचा फारसा पाठींबा नव्हता. त्यामुळे वेळीच त्या प्रांतात जीनांसारख्या जातीयवादी नेत्याला आपले हातपाय पसरण्याची संधी न देता आवर घालणे शक्य होते. हे काम सरदार पटेलांसारखा खंबीर आणि दूरदृष्टी असलेला नेता यशस्वीरितीने पार पाडू शकला असता. पण पटेलांच्या या कार्यात मौलाना आझादांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना असे करण्याची संधी मिळू दिली नाही.
पुढे पंजाब, सिंध, बंगाल आणि सरहद्द प्रांत या ठिकाणी झालेल्या निवडणुकात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला. मौलाना आझादांवर त्यांचा विश्वास राहिला नाही. त्यांनी या संदर्भात नेहरूंना पत्र पाठवून आझादांबद्दलचे त्यांचे मत कळवले होते. या सगळ्या परिस्थितीत गांधीजींनी हस्तक्षेप केला असता आणि मौलाना आझादांना राजीनामा द्यायला लावला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. पण गांधीजींना शक्य असूनही त्यांनी या परिस्थितीत कोणताही हस्तक्षेप केला नाही म्हणून पटेल गांधीजींवर नाराज होते.
पुढे परिस्थिती अगदीच हाताबाहेर जात आहे असे पाहिल्यावर गांधीजींनी आझादांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. त्यांच्यानंतर जो कोणी अध्यक्ष निवडला जाणार होता, त्याला स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान होण्याची नैसर्गिकरित्या संधी मिळणार होती. काँग्रेसच्या कार्यकारिणीत पटेलांच्या नावाला भरभरून प्रतिसाद होता. काँग्रेसच्या पंधरापैकी बारा प्रदेश समित्यांनी अध्यक्ष म्हणून सरदार पटेलांनाच पसंती दर्शवली होती. नेहरूंच्या नावाचा कोणताही प्रस्ताव कोणीही मांडला नव्हता. अशा परिस्थितीत सर्व संकेत झुगारून आणि सर्वांच्या मताचा अनादर करून गांधीजींनी पटेलांना नेहरूंसाठी आपलं नाव मागे घ्यायला लावलं.
पटेलांनी नेहरूंसाठी नाव मागे घेण्याची ही तिसरी वेळ होती. ज्या व्यक्तीने तीस वर्षे आपल्या घरादारावर आणि सुखावर तुळशीपत्र ठेवून काँग्रेस पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत केला, जी व्यक्ती गांधी, नेहरूंमागे प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे उभी राहिली, अशा पात्र व्यक्तीला गांधीजींनी अध्यक्षपदासाठी संधी का दिली नाही हे एक गूढ आहे. पण अशा नेत्याला संधी नाकारली गेल्याने देशाचे एक प्रकारे मोठे नुकसानच झाले. काँग्रेसमध्ये एकवाक्यता राहिली नाही आणि पुढे देशाची फाळणी अटळ ठरली.
कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्रात हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. या हंगामी सरकारच्या हातात सत्ता सोपवून भारत सोडून जायचा ब्रिटिशांचा मनोदय होता. त्यांना भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीशी काही देणेघेणे नव्हते. तर जीना आणि मुस्लिम लीग यांची मागणी अशी होती की आधी भारताची फाळणी करा आणि मगच भारत सोडा. जीना यांना मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य हवे होते. हा सुप्त हेतू मनात ठेवून त्यांनी मुस्लिम लीग मार्फत ' प्रत्यक्ष कृती ' ही योजना अमलात आणली. त्याचा परिणाम फार भयंकर झाला. देशात हिंदू मुस्लिमात दंगे घडवून आणले गेले. कलकत्त्यात सहा हजार लोकांची हत्या झाली. त्यातील सुमारे ४५०० लोक मुस्लिम होते. त्याचा बदला घेण्यासाठी नौखाली आणि तिप्पेरात प्रचंड हत्याकांड घडवून आणले गेले. यावेळी ब्रिटिशांनी काही न करता बघ्याची भूमिका घेतली.
जीनांच्या या घातकी योजनेला लगाम घालू शकेल अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे सरदार पटेल. पण सरदार पटेल यांच्या या संदर्भातील योजनांना काँग्रेसमधूनच विरोध होत होता. म. गांधींची अहिंसेवर पूर्ण श्रद्धा होती. त्यांना रक्तपात नको होता. तर पंडित नेहरूंचे मुस्लिमांशी असलेल्या भावनिक जवळीकेमुळे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्याची त्यांची मानसिक तयारी नव्हती. या सर्व गोष्टी जीनांच्या पथ्यावर पडल्या आणि त्यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवला.
( क्रमशः - पुढील भाग शुक्रवारी )
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०६/०१/०२०२१
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा