उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस
हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सरदार पटेलांनी राजस्थानातील विविध राज्यांचे एकीकरण घडवून आणले. या राजपुताना म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानचा प्रदेश विशाल होता. या प्रदेशात बहुतांशी रजपूत राजांची राज्ये होती. हे राजे शूर आणि परंपरांचा अभिमान असणारे होते. पण त्यांच्यात आपापसात भांडणे, हेवेदावे असल्यामुळे ही राज्ये जणू एकमेकांची शत्रू असल्यासारखी वागत होती. ही एकूण एकोणीस राज्ये होती. त्यांच्या एकीकरणासाठी सुमारे साडेआठ वर्षांचा कालावधी लागला. या एकीकरणाची प्रक्रिया १८ मार्च १९४८ रोजी सुरु झाली आणि एक नोव्हेंबर १९५६ ला पूर्ण झाली. १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याची या राजांची इच्छा होती. त्याचे कारणही साहजिकच होते. एखाद्या मोठ्या राज्यात आपले राज्य विलीन करणे म्हणजे आपली स्वायत्तता गमावणे हा त्याचा अर्थ होता. आपली परंपरागत सत्ता गमावण्याची या राजांची तयारी नव्हती. राजस्थानातील या राज्यांमध्ये जयपूर, उदयपूर, बिकानेर, जोधपूर इ. प्रमुख राज्ये होती.
जीनांना भारतातील काश्मीर, हैदराबाद यांच्याबरोबरच राजस्थानातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर आदी राज्ये पाकिस्तानात सामील झाल्यास हवीच होती. पण सरदार पटेलांनी त्यांचा हा डाव आधीच ओळखून मुत्सद्देपणाने आणि युक्तिप्रयुक्तीने राजस्थानातील या सर्व राज्यांचे एकीकरण घडवून आणले. रजपूत राजांमधील आपापसातील वैर देखील या एकीकरणामुळे संपुष्टात आले. खरं तर या सगळ्या राजांना एकत्र आणणे ही अत्यंत अवघड आणि नाजूक कामगिरी होती. पण पटेलांनी ही किमया घडवून आणली. त्यामुळे राजस्थानच्या एकीकरणाचे आणि भारतातील विलीनीकरणाचे श्रेय हे निःसंशय पटेलांचेच आहे.
एका समारंभात एकत्र आलेल्या या राजस्थानातील राजांना पटेलांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांच्या छोटेखानी पण प्रेरणादायी भाषणाने उपस्थित राजे आणि तेथील जनता भारावून गेली. या भाषणात पटेलांनी महाराणा प्रताप यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उपस्थित राजांना उद्देशून ते म्हणाले, ' आज तुम्ही सर्वांनी मिळून महाराणा प्रताप यांचं स्वप्न साकार केलं आहे. ' राणा प्रतापांचा गौरवपूर्ण उल्लेख सरदार पटेलांच्या तोंडून ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इंग्रजांनी भारतात राज्य करताना भारतातील राजांमध्ये, जातीजमातींमध्ये फुटीची बीजे पेरली होती. ' Divide and rule ' ही त्यांची नीती होती. सरदार पटेलांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी ही राज्ये एकत्र तर केलीच शिवाय भारतातही त्यांचा समावेश करून भारताला बलशाली केले. विशेष म्हणजे हे करताना त्यांची आपापसातील भांडणे मिटवली. या राजांवर पटेलांच्या व्यक्तिमत्वाचा एवढा प्रभाव होता की त्यांच्यापैकी अनेक जण त्यांचे कायमचे मित्र, चाहते आणि भक्त बनले.
अशाच त्यांच्या चाहत्यांमध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सिंदिया राजांचा समावेश होता. सरदार पटेलांचा देशासाठी एवढा प्रचंड त्याग असताना पटेलांच्या मृत्यूनंतरही १९५४ पर्यंत संसदेत त्यांचे तैलचित्र लावण्यात आलं नव्हतं. १९५४ मध्ये जेव्हा मौलाना आझाद यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं तैलचित्र पं नेहरूंनी संसदेत ताबडतोब लावण्याची व्यवस्था केली. पटेलांची झालेली ही उपेक्षा पाहून सिंदिया राजेंना अतिशय वाईट वाटले. त्यांनी स्वतः सरदार पटेलांचे तैलचित्र संसदेत भेट दिले, तेव्हा कुठे ते संसदेत लावण्यात आले.
जी राज्यं आणि संस्थानं भारतात विलीन होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागेल असा इंग्रंजांचा अंदाज होता, ती राज्ये सरदार पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे स्वातंत्र्यानंतर केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत भारतात सामील झाली. हा चमत्कार केवळ पटेल आणि पटेलच करू शकत होते. वर्षानुवर्षे आपल्याच तोऱ्यात जगणारे राजे महाराजे पटेलांपुढे आदराने झुकले होते. पटेलांनी केलेली ही एक प्रकारची रक्तविहीन क्रांतीच होती. या क्रांतीच्या ज्वाला दहन करणाऱ्या नव्हत्या तर नवनिर्मितीची विधायक स्वप्ने साकार करणाऱ्या होत्या. या ज्वालांनी स्वतंत्र भारताची पहाट उजळून निघाली होती. स्वतंत्र भारताच्या भवितव्याचा मार्ग अधिक प्रशस्त केला होता. पाकिस्तानचे घातक मनसुबे मात्र या ज्वालांनी भस्मसात केले होते. ( पुढील लेख या सरदार पटेलांवरील लेखमालेतील शेवटचा भागअसेल. तो आपल्याला बुधवारी वाचता येईल )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३१/०१/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा