मुख्य सामग्रीवर वगळा

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दहा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दहा 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व लोक धर्म, जातीपाती, भाषा, प्रांतभेद विसरून एकत्र आले होते, त्याला बॅ जीनांसारख्या नेत्यांमुळे ग्रहण लागले. त्यांनी मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली लोकांना धर्माच्या नावाखाली वेगळे पडण्यास सुरुवात केली. या गोष्टीला अर्थातच ब्रिटिशांची फूस होती. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेहरू, गांधी यांच्यासारखे नेते हतबल झाले होते. व्हाईसराय वेव्हेल यांनी जीनांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना मोकळीकच दिली होती. 

मुस्लिम लीगने पंजाब आणि सरहद्द प्रांतात जाणीवपूर्वक दंगे घडवून आणून रक्तपात घडवला होता. त्यांनी ' प्रत्यक्ष कृतीच्या ' नावाखाली थेट हल्ले करून अमृतसर, रावळपिंडी, मुलतान, झेलम, अबोटाबाद या शहरात भयंकर दंगे घडवून आणले. हातात घातक शस्त्रे घेऊन तीन ते चार हजार जणांचा जमाव निःशस्त्र हिंदूंवर चालून गेला. या लोकांनी अनेक निरपराध हिंदू, शिखांना ठार मारले. महिला आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केले. या काळात सरदार पटेल हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री होते. या सगळ्या प्रकाराने त्यांचे अंतःकरण तीळतीळ तुटत होते. प्रत्येक राज्यात वेगवेगळी सरकारे असल्याने पटेल गृहमंत्री असूनही फार काही करू शकत नव्हते.  त्यांनी गृहमंत्री या नात्याने वेव्हेल यांना पत्र लिहून या दंगलखोरांवर कारवाई करण्याची विनंती केली. पण वेव्हेलने कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. पं नेहरूंनी पण या संदर्भात वेव्हेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पण वेव्हेल नावाच्या पाषाणाला पाझर फुटला नाही. 

अशा स्थितीत पटेलांसमोर दोन उद्देश होते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ब्रिटिशांकडून लवकरात लवकर सत्ता हस्तगत करणे. एकदा का केंद्राच्या हातात सत्ता आली की त्यांना काही कारवाई करणे शक्य झाले असते. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम लीग जाणीवपूर्वक घडवून आणत असलेले दंगे आटोक्यात आणणे. जीनांना पाकिस्तानच्या नावाखाली भारताचा मोठा लचका तोडायचा होता. त्यांना संपूर्ण पंजाब, बंगाल आणि बहुसंख्य हिंदू लोकवस्ती असलेला आसामही पाकिस्तानात हवा होता. पटेलांना जास्तीत जास्त भारत वाचवायचा होता. त्यामुळे पंजाब आणि बंगालच्या विभाजनाला त्यांनी मान्यता दिली. असे केले तरच ७० ते ८० टक्के भारत ते वाचवू शकणार होते. शिवाय दंगे आणि रक्तपात आटोक्यात आणण्यासाठी त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 

गांधीजींनी तर देशाचं ऐक्य आणि अखंडता कायम राहावी म्हणून सगळा देशच जीनांच्या हवाली करावा अशी सूचना नव्याने आलेले लॉर्ड माउंटबॅटन यांना केली होती. ही गांधीजींची सूचना म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशा प्रकारची होती. पटेलांना अर्थातच ही गोष्ट मंजूर नव्हती. त्यापासून त्यांना देशाला वाचवायचं होतं. शिवाय ब्रिटिशांनी भारताची सत्ता सहज सुलभतेने काँग्रेसच्या हाती सोपवावी यासाठी त्यांना काँग्रेस एकसंध दिसणे महत्वाचे होते. त्यामुळे पंजाब आणि बंगालची विभागणी मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. ही  विभागणी मान्य केली नसती तर मुस्लिम लीगने देशभरात पूर्वनियोजित अशा दंगली घडवून आणल्या असत्या. 

याच सुमारास इंग्लंडचे पंतप्रधानअ‍ॅटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी व्हॉइसराय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन आले. माऊंटबॅटन यांनी गांधीजी, नेहरू यांचा युक्तिप्रयुक्तीने विश्वास संपादन केला. पण भारताच्या राजकारणातील सरदार पटेल यांचे महत्व ते जाणून होते. त्यामुळे पटेलांना विश्वासात घेऊन त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पुढील पाऊले टाकायला सुरुवात केली. 

देशाचं विभाजन हा माऊंटबॅटन यांच्या कार्याचा महत्वाचा आणि अखेरचा टप्पा होता. जीवनावर त्यांचाही फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे सरदार पटेलांसारख्या मातब्बर नेत्याची मदत त्यांना हवी होती. त्यांनी पटेलांवर मोठी जबाबदारी सोपवली. ती म्हणजे दोन नवीन होऊ पाहणाऱ्या देशातील मालमत्ता आणि दायित्व यांची विभागणी करणे. त्यासाठी पटेलांनी आय सी एस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांना आपल्या कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत केला. त्यांच्यातील देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले आणि एक अत्यंत कठीण काम सहजगत्या पार पाडले . पटेलांच्या डोळ्यासमोर आता नव्या शक्तिशाली, एकसंध भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ते सगळे विसरून कामाला लागले होते. 

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०८/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...