मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सोळा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सोळा 

सरदार पटेलांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि धडाडी त्यांनी हाताळलेल्या प्रत्येक प्रसंगातून दिसून येत होती. इंग्रजांनी जेव्हा सत्तेचं हस्तांतरण भारताकडे करण्याचं ठरवलं, तेव्हा सरदार पटेल नसते तर कोणकोणत्या विपरीत गोष्टी घडल्या असत्या याची कल्पनाही करवत नाही. केवळ पटेल यांच्या सारखा धडाडीचा नेता होता म्हणून विविध संस्थाने भारतात समाविष्ट होऊ शकली. 

जीना यांचा भारतातील विविध राज्यं आणि संस्थानं यावर जसा डोळा होता, तसाच तो काश्मीरवरही होता. काश्मीरचा लचका भारतापासून तोडायला ते सर्वात जास्त उत्सुक होते. काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी सेनाच पाठवण्याचा त्यांचा विचार होता. पण जेव्हा पाक सैन्यातील इंग्रज अधिकाऱ्यांनी या गोष्टीस नकार दिला, तेव्हा जीनांनी पठाणांच्या टोळ्या काश्मिरात घुसवून काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या टोळीवाल्यांना पाकिस्तानकडून शस्त्रे, पैसे इ गोष्टी पुरवण्यात आल्या. ४ नोव्हेंबर १९४७ हाच तो भयंकर दिवस. सशस्त्र पठाणांच्या टोळ्या या दिवशी श्रीनगरपासून अवघ्या चार मैलाच्या अंतरावर पोहोचल्या होत्या. बारामुल्ला आणि काश्मीर खोऱ्यातली इतर शहरं त्यांनी आधीच घेतली होती. काश्मीरचे महाराज हरिसिंग धास्तावले होते. काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला चिंतेत होते. दोघांनाही काळजी होती. दोघांच्या काळजीचे कारण वेगवेगळे होते. हरीसिंगांना आपले राज्य बळजबरी पाकच्या ताब्यात जाईल ही भीती होती तर शेख अब्दुल्ला यांना स्वतःच्या भवितव्याची चिंता सतावत होती. त्यांना काश्मीरचे सत्ताधीश बनायचे होते. हा प्रांत जीनांच्या ताब्यात गेला तर आपली ती संधी हातची जाईल ही शेख अब्दुल्लांची भीती होती. 

राजा हरी सिंग यांची अवस्था तर फार वाईट होती. त्यांना पाकिस्तानात सामील व्हावे की भारतात राहावे हे कळत नव्हते. भारताचे पंतप्रधान शेख अब्दुल्लाना पाठीशी घालत होते. शेख अब्दुल्ला म्हणजेच काश्मीर. ते जे करतील ते काश्मीरच्या हिताचंच असेल अशी नेहरूंची खात्री होती. पण शेख अब्दुल्लांवर नेहरूंनी दाखवलेला विश्वास अवाजवी होता हे पुढे शेख अब्दुल्ला ज्या पद्धतीने वागले त्यामुळे सिद्ध झालेच. शेख अब्दुल्लाना ते जवळचा मित्र किंवा पाठचा भाऊ मानत होते. या त्यांच्या वागण्यामुळे हरीसिंगांची चिंता वाढली होती. अशी स्थिती सुरुवातीलाच राहिली तर आपले भविष्य काय ही चिंता त्यांच्या मनात होती. त्यामुळे ते स्वतंत्र राहण्याच्या विचारात होते. तशातच या अस्थिर राजकीय परिस्थितीत पाकिस्तानने सशस्त्र टोळ्या घुसवून आक्रमण केले होते. 

टोळीवाल्यांनी काश्मीरमध्ये आक्रमण केल्यानंतर काश्मीरचे प्रमुख ब्रिगेडियर एल पी सेन आणि ब्रिगेडियर कौल यांनी काश्मीरच्या परिस्थितीचा अहवाल नेहरूंना पाठवला होता. पण दोघांच्याही अहवालात कमालीची विसंगती होती. ब्रि. कौल यांच्या मते काश्मीरमधील स्थिती शांत आणि नियंत्रणाखाली होती. त्यांच्या मते काश्मीरमधील आक्रमण ही गुंडांच्या टोळ्यांची किरकोळ कारवाई होती. याउलट सेन यांच्या मते परिस्थिती गंभीर होती. टोळीवाल्यांच्या संख्येच्या तुलनेत काश्मिरात हाताशी असलेले सैन्य अत्यंत तोकडे होते. तातडीने काही कारवाई केली नाही तर, काश्मीर टोळीवाल्यांच्या हाती पडण्याची दाट शक्यता होती. असा परस्परविरोधी अहवाल दोघा ब्रिगेडियरनी दिल्यामुळे कोणताही वेळ न दवडता स्वतः सरदार पटेल यांनी जाऊन परिस्थितीची पाहणी करायचे ठरवले. 

यावेळी पटेलांना जम्मू मधून श्रीनगरमध्ये जायचे होते. पण परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. जम्मू ते श्रीनगर हा हवाई मार्ग अत्यंत अरुंद असल्याने वैमानिकाच्या थोड्याशा चुकीने सुद्धा विमान पाकच्या हद्दीत भरकटण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत सरदारांच्या जीवाला धोका होता. शिवाय कडाक्याची थंडी आणि दाट धुके होते. त्यामुळे  सैन्याच्या अधिकाऱ्यांनी पटेलांना श्रीनगरला न जाण्याचा सल्ला दिला. पण देशहितापुढे पटेलांना आपल्या प्राणांची पर्वा नव्हती. त्यांनी अधिकाऱ्यांना आपले विमान तयार ठेवण्यास सांगितले. 

चार नोव्हेंबरच्या पहाटे कडाक्याच्या थंडी आणि धुक्यात तीन व्यक्ती श्रीनगर विमानतळावर उतरल्या. त्यातील पहिली व्यक्ती होती सरदार पटेल. यावेळी त्यांचे वय होते बहात्तर वर्षे. दुसरी व्यक्ती होती पटेलांची कन्या मणिबेन. मणिबेनने लग्न न करता आपल्या वडिलांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी ती सोबत होती. आणि तिसरी व्यक्ती होती संरक्षणमंत्री बलदेवसिंह. विमानतळावर उतरल्याबरोबर हे तिघेही ब्रिगेड हेडक्वार्टर्स मध्ये गेले. तिथे ब्रि.सेन त्यांना परिस्थिती समजावून सांगू लागले. ते बोलत असताना सरदार पटेलांचे डोळे मिटलेले होते. सेन यांना वाटले की सरदार प्रवासामुळे थकले असावेत. पण पटेल त्यांचा शब्द न शब्द कान देऊन ऐकत होते. 

पटेल यांनी त्यांच्या या भेटीनंतर तातडीने तीन महत्वाचे निर्णय घेतले. ब्रि. सेन यांच्या मदतीला तातडीने लष्कराची कुमक पोहोचेल अशी व्यवस्था केली आणि त्यांच्या आज्ञेनुसार विमानाने सैन्यदले धडाधड दाखल झाली सुद्धा..! त्यांनी दुसरा निर्णय घेतला तो म्हणजे महाराज हरी सिंग यांना तातडीने श्रीनगर सोडून जम्मूला जाण्याचा आदेश दिला. कारण श्रीनगरमध्ये त्यांच्या जीवाला धोका होऊ शकत होता. तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये रस्ते आणि दळणवळणाची व्यवस्था मजबूत केली जेणेकरून सैन्याच्या गाड्या सहजपणे येजा करू शकतील. टेलिफोन, तारा इ गोष्टी व्यवस्थित काम करतील याची व्यवस्था केली. त्यांच्या या तीन महत्वाच्या निर्णयामुळे काश्मीर पाकिस्तानच्या हातात पडण्यापासून वाचले. या पटेलांच्या तातडीच्या कृतीने अबोटाबादमध्ये तळ ठोकून भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवून बसलेल्या जीनांची मात्र निराशा झाली.  त्यांचे काश्मीर ताब्यात घेण्याचे स्वप्न भंगले. 

काश्मीरमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित व्हावे म्हणून पटेल सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. पण दुर्दैवाने त्यांना हवे तेवढे यश मिळू शकले नाही. पं नेहरूंनी पुढे काश्मीरची सत्ता शेख अब्दुल्लांच्या हाती सोपवली. सत्ता हाती येताच त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी सरदार पटेल यांना आणि भारत सरकारला दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखवली. काश्मीरची स्थिती अशी हाताबाहेर जात असताना माऊंटबॅटन यांनी दोन असे निर्णय भारताला घ्यायला लावले की ज्यामुळे काश्मीर प्रश्न आणखी चिघळला. त्यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घेऊ असे भारताकडून मान्य करून घेतले. दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याची मागणी नेहरूंकडून मान्य करून घेतली. हे सर्व पटेल आसामच्या दौऱ्यावर असताना घडले. किंबहुना पटेल यांच्या अनुपस्थितीतच त्यांना असे निर्णय घ्यायचे होते. पटेल हजर असते तर त्यांनी या गोष्टींना विरोध केला असता. पण नेहरू आणि माऊंटबॅटन यांनी घेतलेले हे निर्णय भारताच्या दृष्टीने कायमची डोकेदुखी बनले . भारताचा हा अंतर्गत प्रश्न विनाकारण संयुक्त राष्ट्रसंघात गेला. बडी राष्ट्रे त्यांच्या सोयीसाठी या प्रश्नाचे राजकारण करू लागली. 

शेख अब्दुल्लांना काश्मीरमधील आपल्या अनिर्बंध सत्तेच्या मार्गात पटेल यांच्यासारखी लगाम घालणारी व्यक्ती नको होती. सरदार पटेल म्हणजे त्यांच्या मनमानी कारभारात मोठाच अडथळा होता. त्यांनी नेहरूंच्या मागे लागून काश्मीर प्रश्न पटेलांकडे असलेल्या गृहखात्याच्या अखत्यारीतून काढून घ्यायला लावला. नेहरूंनी  पटेलांकडून काश्मीरचे अधिकार काढून घेतले. पटेलांचा आता नाईलाज झाला. ते हतबल झाले. काश्मीरमधील घडामोडी आणि शेख अब्दुल्लांचा अन्यायकारक कारभार पाहत बसण्याशिवाय त्यांना गत्यंतर उरले नाही. अशा अनेक गोष्टींनी व्यथित होऊन सरदार पटेलांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले पण गांधीजींच्या मध्यस्थीने त्यांनी तो मागे घेतला. पण या सगळ्या प्रकरणात भारताचे व्हायचे ते नुकसान झालेच. काश्मीर प्रश्न कायमचा चिघळत राहून भारताची एक ठसठसणारी जखम बनला. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२२/०१/०२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

महाराज हरी सिंग आणि सरदार पटेल 


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...