मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अकरा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अकरा 

भारतीय स्वातंत्र्याची पहाट दृष्टीपथात येत असताना तत्कालीन गांधी, नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यातील सर्वात मोठे आव्हान होते भारतातील संस्थानांचे. भारतात ५६५ छोटीमोठी संस्थाने होती. इंग्रजांनी आणि मुस्लिम लीगने या संस्थानामध्ये दुहीची बीजे पेरली होती. या संस्थानांचे प्रमुख ब्रिटिशांची हाजीहाजी करण्यात धन्यता मानत होते. आपली संस्थाने शाबूत राहावीत यासाठी त्यांनी जणू लाचारीचा पत्करली होती. काही संस्थानांची आणि त्यातील जनतेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी जनतेची अवस्था होती. याला एकच पर्याय होता आणि तो म्हणजे या राज्यांनी नव्याने निर्माण होत असलेल्या भारतीय संघराज्यात सामील होणे. यातच त्यांचे हित होते. 

ब्रिटिशांनी या संस्थानांसमोर तीन पर्याय ठेवले होते. भारतीय संघराज्यात सामील होणे, पाकिस्तानात सामील होणे किंवा स्वतंत्र राहणे. काही संस्थानिक काँग्रेसच्या विरोधात आघाडी उघडून स्वतंत्र राहण्याच्या किंवा पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होते. काही संस्थानिक कुंपणावर बसून काय घडते त्याकडे लक्ष ठेवून होते. जशी संधी मिळेल त्याप्रमाणे सोयीस्कर उडी मारण्याच्या तयारीत ते होते. या संस्थानांना स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे घातक तर होतेच पण आतापर्यंत ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी, देशभक्तांनी देशासाठी त्याग केला, आपल्या प्राणांची आहुती दिली अशांचाही तो अपमान होता. पंडित नेहरू आणि काही काँग्रेस नेते या मताचे होते की या संस्थानांवर आक्रमण करून त्यांना बळजबरी भारतात सामील करून घ्यावे. 

सरदार पटेल मात्र या मताशी सहमत नव्हते. त्याला काही कारणे होती. या संस्थानिकांशी लढणे म्हणजे भारतीयांनीच आपल्या बांधवांविरुद्ध लढण्यासारखे होते. दुसरे म्हणजे संस्थानातील जनतेची आता लढाई करण्याची मानसिकता मुळीच नव्हती. स्वातंत्र्यासाठीच्या सुरु असलेल्या चळवळींमुळे त्यांच्यातही जागृती आणि देशाभिमान जागृत झाला होता. अशा परिस्थितीत त्यांच्यावर आक्रमण करणे योग्य नव्हते. तसेच एवढ्या संस्थानांशी संघर्ष करण्यासाठी प्रचंड पैसे आणि मनुष्यबळ खर्ची पडले असते. त्यामुळे या तिन्ही गोष्टी पटेलांना टाळायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक पण थंड डोक्याने आपल्या कार्याची आखणी केली. 

त्यांच्या या कामात त्यांना माजी प्रशासकीय अधिकारी व्ही पी मेनन यांची मोठीच मदत झाली. आपल्याला संस्थाने विलीन करण्यात सरदार पटेलांचे योगदान माहिती असते पण व्ही पी मेनन यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे याची माहिती फार थोड्या लोकांना असते. व्ही पी मेनन यांच्या सहकार्यामुळे पटेल यांचे संस्थाने भारतात विलीन करण्याचे काम पूर्णत्वास जाऊ शकले. व्ही पी मेनन यांनी ब्रिटिशांच्या काळात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेले असले तरी देशभक्ती त्यांच्या नसानसात भरलेली होती. त्यांनी या कार्यातून बाजूला व्हावे म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली . पण त्यांनी माघार घेतली नाही. 

अशातच राजकोटमधील एक गुंतागुंतीचे प्रकरण सरदार पटेलांसमोर आले. राजकोट संस्थानामधील राजाचा मुलगा शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता. पण त्या ठिकाणी अभ्यास करण्याऐवजी हौसमौज आणि चैन करत होता. त्याचा खर्च भागवण्यासाठी सरकार प्रजेवर नवनवे कर लावत होते. त्यामुळे प्रजा त्रस्त झाली होती. पटेलांनी यासाठी लोकांना संघर्ष करण्याचे आवाहन केले. लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सत्याग्रह सुरु केला. राजाच्या सैनिकांनी प्रजेवर अनन्वित अत्याचार केले पण लोक मागे हटले नाहीत. लोकांवरचे अत्याचार पाहून गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा संतप्त झाल्या. कस्तुरबा आणि सरदार पटेलांची कन्या मणिबेन यांनी सुद्धा लोकांसोबत सत्याग्रहात भाग घेऊन त्यांचे नेतृत्व केले. शेवटी न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन पटेलांचे म्हणणे बरोबर आहे असा निकाल दिला आणि प्रजेवरील अन्याय दूर झाला. या सगळ्या प्रकरणात पटेल यांनी बाजूला व्हावे म्हणून एकदा त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला. पण पटेलांचे नशीब बलवत्तर म्हणून ते यातून बचावले. 

भोपाळच्या महाराजांनी काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी संस्थानांची एक आघाडी उघडली होती. या निमित्त सगळे संस्थानिक एकत्र आले होते. त्याचा पटेल यांनी फायदा करून घेतला. त्यांनी त्या संस्थानिकांना कळकळीचे भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, ' संस्थाने पूर्णपणे नष्ट केली पाहिजेत असं या देशातील काही लोकांचं मत आहे. पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने रामराज्य निर्माण करण्याचं स्वप्न मी आणि महात्मा गांधी पाहत आहोत. संस्थानिकांबरोबर मैत्रीपूर्ण धोरण ठेवण्याचंच काँग्रेसचं धोरण आहे. 

येत्या काही दिवसात भारत स्वतंत्र होणार आहे. जे राजे काँग्रेसच्या बाजूने उभे राहतील, त्यांचं मी अभिनंदन करतो. जे राजे लोकांबरोबर राहतील, तेच राज्य करू शकतील. जे लोकांबरोबर राहणार नाहीत, त्यांची राज्य नष्ट होतील. बरेचसे राजे काय घडते आहे याची वाट पाहत कुंपणावर बसून आहेत. पण त्यांनी काही घडण्याची वाट न पाहता भारतात सामील व्हावं असं आवाहन मी करतो. भावी काळात त्यांचा जर युद्धात पराभव झाला तर त्यांना असं काही करता येणार नाही. 

आम्हाला तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा कायम ठेवायची आहे. आपल्यापैकी ज्यांच्यामध्ये शौर्य, बुद्धिमत्ता आणि काही करण्याची धमक आहे त्यांनी आपल्या सैन्यदलाचं नेतृत्व करावं. आपल्यापैकी कायदा, परंपरा इ गोष्टींचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना भारतीय राजदूत बनून परदेशात आपल्या देशाची सेवा करता येईल.  तुम्ही तुमच्या छोट्याशा डबक्यात तुमचे मौल्यवान जीवन कशाला कुजवता आहात ? त्याऐवजी राष्ट्रीय जीवनाच्या प्रवाहात सन्मानाने सामील व्हा. ' पटेल यांच्या या देशभक्तीने भारलेल्या भाषणाने तिथे जमलेले संस्थानिक अत्यंत प्रभावित झाले. अनेक राजे आणि संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या पर्यायावर तिथल्या तिथे सह्या केल्या. 

देशातील संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी पुढील धोरण ठरवण्यात आले.

(१) लहान-लहान राज्यांचे शेजारील मोठया राज्यामध्ये/प्रदेशामध्ये विलीनीकरण करणे 

या धोरणानुसार मुंबई, मद्रास, ओरिसा, छत्तीसगड , पूर्व पंजाब व पशिचम बंगालमधील छोटया मोठया संस्थानिकांचे विलीनीकरणत्या त्या प्रदेशात किंवा राज्यात करण्यात आले.

(२) स्टेट युनियनच्या (संघ) स्वरूपात विलीनीकरण

यानुसार भौगोलिक, भाषिक व सामाजिक एकतेचा विचार करून २२२ संस्थानिकांचा समावेश करून सौराष्ट्र (काठीयावाडा) ची निर्मिती करण्यात आली.

(३) केंद्रशासित प्रदेशाच्या स्वरूपात संस्थानांचे विलीनीकरण

या धोरणानुसार हिमाचल प्रदेश, विंध्य प्रदेश व कच्छ प्रदेश या भागातील संस्थाने त्या त्या प्रदेशात विलीन करण्यात आली. 

सरदार वल्लभभाई पटेलांनी अत्यंत मुत्सद्देगीरीने व कणखर धोरणाचा अवलंब करून १५ ऑगस्ट १९४७ पर्यत जुनागढ, हैद्राबाद व काश्मीरचा अपवाद वगळता सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केले.

( पुढील भाग बुधवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१०/०१/२०२१

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

सरदार पटेल आणि व्ही पी मेनन 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...