मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तेरा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तेरा 

पूर्वीचं त्रावणकोर राज्य दक्षिण भारतातील कोचीनजवळ होतं. या त्रावणकोर राज्यानं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. हे अत्यंत समृद्ध राज्य. निसर्गानं आपल्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ताने केलेली. तशातच या राज्यात युरेनियमचे साठे सापडले होते. शिवाय प्रसिद्ध पद्मनाभमंदिर याच राज्यात होतं. त्यावेळी या राज्याच्या गादीवर तीस वर्षांचा एक तरुण राजा म्हणून बसलेला होता. पण राज्याचा सगळा  कारभार सी पी रामस्वामी या नावाची एक अत्यंत बुद्धिमान व्यक्ती पाहत होती. राजा या रामस्वामींच्या प्रभावाखाली दबलेला होता. रामस्वामी खरं तर अत्यंत हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती होती. सुरुवातील वृत्तीने राष्ट्रवादी असलेले हे रामस्वामी डॉ अ‍ॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीत सहभागी झाली होते. पण नंतर त्यांनी एकदम वेगळी आणि हटवादी भूमिका घेतली. त्रावणकोर राज्य स्वतंत्र राहील, ते भारतात सामील होणार नाही असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेला भोपाळचे महाराजा आणि जीना या दोघांचा पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या जाळ्यात अडकल्यामुळेच रामस्वामी यांनी अशी भूमिका घेतली होती. 

सरदार पटेलांना ही गोष्ट कळली की रामस्वामी यांच्या दबावाखाली असल्यामुळे त्रावणकोरचा पोरसवदा असलेला राजा काही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी थेट त्या राजालाच फोन लावला. त्याला सरळ विचारले की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का ? कोणालाही घाबरू नका. तुमच्या मनाने निर्णय घ्या. पटेलांचे बोलणे इतके आश्वस्त करणारे होते की त्या राजाने नंतर स्वतः फोन करून आपण भारतीय संघराज्यात सामील होत असल्याचे पटेलांना कळवले. 

रामस्वामींना अर्थातच या गोष्टीचा राग आला. पण पुढे त्यांना पटेलांची भूमिका पटली. पटेलांनाही या बुद्धिमान माणसाचा उपयोग स्वतंत्र भारतासाठी करून घ्यायचा होता. त्यांनी त्यावेळी पंडित नेहरूंना तशी शिफारस केली. रामस्वामी यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला अमेरिकेत भारताचा राजदूत म्हणून नेमावे अशी विनंती त्यांनी केली. पण पं. नेहरूंच्या मते रामस्वामी हे त्या योग्यतेचे नव्हते. त्यामुळे त्यांनी सरदारांचे म्हणणे ऐकले नाही. परराष्ट्र खाते हे नेहरूंच्याकडे असल्याने पटेलांना काही करता आले नाही. पण नेहरूंच्या या निर्णयामुळे देश मात्र एका बुद्धिमान माणसाच्या सेवेला मुकला. 

जीना आणि कंपनीचा त्रावणकोरचा प्रयोग फसल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जोधपूरच्या राज्याकडे वळवला. जोधपूरच्या महाराजांचे नुकतेच निधन झाले होते आणि त्यांच्या जागी गादीवर त्यांचा मुलगा हनुवंतसिंग आला होता. हनुवंतसिंग हा अपरिपक्व होता. खरे म्हणजे त्याच्या वडिलांची भारतीय संघराज्यात सामील होण्याची इच्छा होती. पण त्यांच्यानंतर हनुवंतसिंगाच्या सूत्रे आल्यामुळे आणि तो अविचारी आणि उथळ असल्याने जिनांसारख्या धूर्त आणि कपटी माणसाच्या जाळ्यात सहज फसला. जोधपूर हे राज्य पाकिस्तानच्या सीमेला लागून होते. जोधपूर आणि त्याला लागून काही रजपूत राजांची संस्थाने होती. त्यामुळे जोधपूरवर जीनांचा डोळा होताच. जोधपूर ताब्यात आले तर बाकीची राज्ये देखील आपल्याला सामील होतील असा त्यांचा अंदाज होता. हनुवंतसिंगांबरोबर झालेल्या भेटीत जिनांनी एक धूर्त चाल खेळली. त्यांनी जोधपूर राज्याला भविष्यकाळासाठी काही प्रलोभने दाखवली. खरे तर त्यांचा अंतःस्थ हेतू वेगळाच होता. त्यात फायदा पाकिस्तानचाच होणार होता. त्यांनी एका कोऱ्या कागदावर सही करून तो कागद तो हनुवंतसिंगाकडे दिला. त्यावर आपल्याला हव्या त्या अटी लिहा असे त्याला सांगितले. शिवाय त्या कागदासोबत आपले पेनही त्याच्या हवाली केले. 

आता मासा जाळ्यात अडकला हे पाहून जिनांना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण त्या कागदावर हनुवंतसिंग सही करणार तेवढ्यात त्याला त्याच्या खाजगी सचिवाने त्याला सबुरीचा सल्ला दिला. सही करण्यापूर्वी एकदा आपल्या आईसाहेबांशी बोला असा सल्ला या सचिवाने त्याला दिला. तत्पूर्वी जोधपूर राज्याचे प्रधान सचिव वेंकटाचार यांना आपल्या राज्यात चाललेल्या घडामोडींचा अंदाज आला होता. भोपाळचे महाराज, जीना आणि हनुवंतसिंग हे तिघे मिळून काहीतरी भारतविरोधी कारस्थान रचत आहेत अशी गुप्त चिट्ठी त्यांनी सरदार पटेलांना पाठवली होती. त्यांनी ही चिट्ठी पाठवल्याचे कळते तर त्यांच्या जीवालाही धोका होता पण तरीही या देशभक्त असलेल्या वेंकटाचार यांनी तो धोका पत्करला होता. 

आता पटेलांच्या कौशल्याचा कस लागणार होता. त्यांच्यासमोर तीन व्यक्ती अशा होत्या की त्यांचे मन वळवणे मोठे कठीण काम होते. पहिली व्यक्ती म्हणजे धूर्त आणि कारस्थानी जीना, दुसरी व्यक्ती म्हणजे भारतविरोधी आघाडी उघडणारे भोपाळचे महाराज. ही अशी व्यक्ती होती की आपल्या मनात काय आहे त्याचा थांगपत्ता ती दुसऱ्याला लागू देत नव्हती. तिसरी अविचारी व्यक्ती म्हणजे हनुवंतसिंग. पटेलांनी मोठ्या विचारपूर्वक काही एक योजना आखली. आपण स्वतः हनुवंतसिंगाशी बोलण्याआधी माउंटबॅटन यांनी त्याच्याशी बोलावे अशी विनंती त्यांनी माउंटबॅटन यांना केली. माउंटबॅटन यांनी ती तयारी दाखवली. या सगळ्या घडामोडीत व्ही पी मेनन यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. ते स्वतः आपल्यासोबत हनुवंतसिंगांना माउंटबॅटन यांच्याकडे घेऊन गेले. माउंटबॅटन यांनी त्यांना त्यांच्या वडिलांसोबत असलेल्या आपल्या मैत्रीची आठवण करून देऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. एवढे करूनही हनुवंतसिंगाचे मन पूर्णपणे वळवण्यात माउंटबॅटन यांना यश आले नाही. जीनांचे प्रलोभन त्यांना अजूनही भुरळ पाडत होते. 

यानंतर मेनन यांनी त्यांना सरदार पटेलांकडे नेले. पटेलांशी त्यांचं मोजकंच बोलणं झालं. पटेल त्यांना म्हणाले, ' तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता. पण जर तुमच्या राज्यात उद्या काही पेचप्रसंग उद्भवला तर भारताकडून तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही हे लक्षात असू द्या. ' यानंतर पटेलांनी त्यांना असे काही आवाहन केले की हनुवंतसिंग यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द उरले नाहीत. पटेल त्यांना म्हणाले, ' तुमचे वडील माझे मित्र होते.  जाण्यापूर्वी त्यांनी तुमची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. तुमची काळजी घ्या असे त्यांनी मला सांगितले होते. वेळ पडल्यास पित्याच्या भूमिकेतून दोन गोष्टी समजावून सांगा. एखादी गोष्ट ऐकली नाही तर पालकाच्या भूमिकेतून त्यांना शिस्त लावा असे त्यांनी मला सांगितले होते. आता मी तुमच्याशी त्याच भूमिकेतून बोलतो आहे. ' 

पटेल यांच्या बोलण्याचा हनुवंतसिंग यांच्यावर एवढा परिणाम झाला की मी आताच माउंटबॅटन यांच्याकडे जातो आणि भारतात सामील होण्याच्या करारावर सही करतो असे त्यांनी पटेलांना सांगितले. तरीही धरसोडीची वृत्ती असलेल्या हनुवंतसिंगांचा काही भरोसा नव्हता. ते पुन्हा जीनांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी व्ही पी मेनन यांनी त्यांना आपल्या मोटारीत घातले आणि स्वतः गाडी चालवत माउंटबॅटनकडे नेलं. तिथे त्यांनी करारावर सही केली. जोधपूरचं संकट टळलं. जीना आणि भोपाळच्या महाराजांना हात चोळत बसण्याशिवाय काही गत्यंतर उरलं नाही. 

पटेल यांच्या एकूणच व्यक्तिमत्वात अशी काही जादू होती की एकदा एखादी व्यक्ती जर का त्यांच्या संपर्कात आली तर ती व्यक्ती कायमची त्यांची होऊन जात असे. जोधपूरच्या या तरुण महाराजांवर त्यांचा असा काही प्रभाव पडला की ते त्यांना पितृस्थानी मानू लागले आणि पुढील काळात भारतात सामील होण्यासाठी विविध संस्थानिकांचं मन वळवण्यासाठी स्वतःचं विमान घेऊन पटेलांसोबत राज्याराज्यात फिरले. 

( क्रमशः पुढील भाग रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१५/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...