उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एकोणीस
रझाकारांचे सामान्य जनतेवरील अत्याचार कमालीचे वाढले होते. अनेक जिल्ह्यांमध्ये लुटालूट, जाळपोळ आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना होत होत्या. निजामाचे प्रमुख लायक अली यांनी अशा परिस्थितीत भारताला आव्हान देणारे वक्तव्य केले. ' भारताने जर आमच्यावर कारवाई करून आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न केला तर, आमचे हजारो लोक लष्करात भरती होतील. पाकिस्तान, सौदी अरब या देशातील विमाने भारतावर बॉम्बफेक करण्यासाठी सज्ज आहेत. ' कराचीहून काही विमानं शस्त्रास्त्र आणि दारुगोळा घेऊन हैदराबादला उतरत होती. त्यामुळे हैदराबादला पाकिस्तानची मदत आहे हे स्पष्ट होत होते.
पटेलांनी या सुमारास आपल्या एका मित्राला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते की मी दीर्घकाळ आजारी असल्याने हैदराबादचा प्रश्न सुटू शकला नाही. पण आता मात्र मी तयार आहे आणि कोणतीही कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही.
यावेळी पटेलांनी जनरल चौधरी यांना चर्चा करण्यासाठी आपल्याकडे बोलावून घेतलं. त्यांच्याशी हैदराबादवर करावयाच्या कारवाईबद्दल चर्चा केली. जनरल चौधरी यांच्यावरच हैदराबादच्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. पटेल यांच्या स्वभावाचे हे वैशिष्ट्य होते की ते बोलताना समोरच्या व्यक्तीला आपलंसं करून घेत. त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकत. त्यामुळे समोरची व्यक्ती संपूर्ण आत्मविश्वासाने आणि आपली जबाबदारी समजून ते काम करू शकत असे. हैदराबादवर कारवाई करायची ठरली तरी त्यासाठी मंत्रिमंडळाची संमती आवश्यक होती.
नेहरू मंत्रिमंडळाचे प्रमुख होते. या कालावधीत त्यांच्यात आणि नेहरूंमध्ये बरेच मतभेदही झाले होते. शिवाय तातडीने कारवाई करावी या मताचे नेहरू नव्हते. पण पटेलांनी या कारवाईसाठी त्यांचे मन वळवले. तरीही गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या. कारवाईच्या आदल्या दिवशी रात्री भारताचे लष्कर प्रमुख जन.बुचर यांनी नेहरूंना फोन करून उठवलं आणि त्यांना ही कारवाई केल्यास आपल्याला अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल असे सांगितले. मुंबई, अहमदाबाद या शहरांवर बॉम्बहल्ले होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हैदराबादचे लष्कर हे जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द किंवा स्थगित करावी अशी विनंती केली. जनरल बुचर यांनी नंतर पटेलांनाही फोन करून हेच सांगितले. पण पटेल आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी नेहरूंना शांत झोपण्यास सांगितले आणि बुचर यांना निर्धास्तपणे आपली कारवाई करा म्हणून आदेश दिला.
दूरदृष्टी असलेला नेता कसा असतो याचे सरदार पटेल हे उत्तम उदाहरण आहे. हैदराबादवर पोलीस कारवाई करण्यात आली. १३ सप्टें ला सुरु झालेली ही कारवाई १७ सप्टें पर्यंत चालली. या कारवाईला ' ऑपरेशन पोलो ' असे नाव देण्यात आले होते. ही मोहीम अत्यंत यशस्वी झाली आणि १७ सप्टें १९४८ या दिवशी हैदराबाद भारताच्या ताब्यात आले. या कारवाईनंतर पंडित नेहरूंनी सरदार पटेलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जन. बुचर यांनी या विजयाचे श्रेय सरदार पटेलांनाच दिले. ते म्हणाले, ' मी या कारवाईबद्दल साशंक होतो आणि कारवाई करू नये असा सल्ला मी दिला होता. पण सरदार पटेल यांना परिस्थितीचा अचूक अंदाज होता. ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम होते. '
या यशानंतर पटेलांचे अभिनंदन करणाऱ्या पत्रांचा पाऊस पडला. हैदराबादमधील आणि भारतातील हिंदू, शीख, मुस्लिम लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि या कारवाईबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले. देशविदेशातील विविध मान्यवरांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. या यशामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या होत्या. भारताच्या विरोधकांना भारत काय करू शकतो हे दिसले होते. ऑपरेशन पोलो या हैदराबादवरील मोहिमेमुळे भारताच्या पोटातील फुटीरतेच्या कॅन्सरचे अचूक ऑपरेशन झाले होते. त्यामुळे हा रोग इतर ठिकाणी पसरण्यास आपोआपच पायबंद बसला होता. भारत आणि पाकिस्तान नंतर आशिया खंडात हैदराबाद नावाचे स्वतंत्र राष्ट्र तयार करण्याची ब्रिटिशांची खेळी पटेलांनी अयशस्वी ठरवली होती. शिवाय हैदराबाद पाकिस्तानात सामील करून घेण्याचे जीनांचे नापाक मनसुबे धुळीस मिळाले होते. भारत आता अधिक शक्तिशाली देश बनला होता.
या कारवाईनंतर १९४९ मध्ये पटेलांनी हैदराबादला भेट दिली. तेथे त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. स्वतः निजाम त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होता. यापूर्वी निजामाने कोणत्याही नेत्याचे असे स्वागत केले नव्हते. यावेळी पटेल मात्र सततची धावपळ, आजारपण आणि वार्धक्य यामुळे थकले होते. चालताना त्यांना काठीचा आधार घ्यावा लागत होता. पण आपल्या प्राणप्रिय देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते तेथे केलेल्या एका भाषणात म्हणाले, ' आपण सर्वानी आता भूतकाळातील आपले मतभेद विसरून एकत्र आलो पाहिजे. स्वतंत्र भारताचं भविष्य घडवण्यासाठी आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. आपल्या सर्वांचं भाग्य की आपण या भारतभूमीत जन्मलो आहोत. आपल्या सर्वांना येथे एकत्रच राहायचे आहे. तेव्हा आपापसातील मतभेद गाडून जातीय सलोखा कसा प्रस्थापित करता येईल या साठी सर्वांनी प्रयत्न करू या. ' त्यांचे हे विचार आजही मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. ( क्रमशः )
( पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३१/०१/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा