मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पंधरा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पंधरा 

सरदार पटेलांनी जे जे निर्णय घेतले त्यातून त्यांचा दूरदर्शीपणा, मुत्सद्दीपणा दिसून येत होता. एवढेच नव्हे तर काळाच्या कसोटीवर त्यांनी घेतलेले निर्णय  अचूक आणि त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक होते हेही सिद्ध झाले. काठियावाड आणि भोपाळचा प्रश्न सोडवल्यानंतर त्यांच्या पुढे जुनागढचा प्रश्न आ वासून उभा राहिला. पटेलही या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होते. आपला संसार सोडून त्यांनी देशाचा संसार करण्यासाठीच स्वतःला वाहून घेतले होते. वैयक्तिक सुखदुःखाचा विचार करायला या माणसाला वेळच नव्हता. 

जुनागढ हे गुजरातमधील एक मोठे राज्य होते. पंधरा ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि त्याच दिवशी जुनागढने आपण पाकिस्तानात सामील होणार हे अचानक जाहीर केले. तोपर्यंत भारत सरकारला याचा सुगावाही लागणार नाही याची काळजी जुनागढचा नबाब, त्याचा दिवाण आणि जीना या मंडळींनी घेतली होती. दोन दिवसांनी वर्तमानपत्रात जेव्हा ही बातमी आली तेव्हा कुठे भारत सरकारला त्याबद्दल कळले. लागलीच भारत सरकारने पाक उच्चायुक्तांकडे याबाबत तक्रार नोंदवली. असे विलीनीकरण बेकायदेशीर आहे असे भारताने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले होते. भारत सरकारने व्ही पी मेनन यांना जुनागढच्या नबाबाकडे भारताची भूमिका समजावून सांगण्यासाठी पाठवले. मेनन यांनी पाकिस्तानकडून होऊ शकणारा धोका तसेच राज्य पाकिस्तानात विलीन झाल्यास प्रजेचा होणारा विरोध आणि त्यावरून घडू शकणारा हिंसाचार इ गोष्टी नबाबाच्या निदर्शनास आणल्या. पण आपण पाकिस्तानात सामील होऊ हा त्याचा हेका कायम होता. 

जुनागढ हे गुजरातमधील असे राज्य होते की ज्यातील ८०% प्रजा हिंदू होती. या राज्याला कच्छ, पोरबंदर, नवासागर आणि गोंडाल या राज्यांनी वेढलेले होते. जुनागढचा भूमार्गाने कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संपर्क साधला जाऊ शकत नव्हता. फक्त वेरावळ या बंदरातून कराचीशी समुद्रमार्गे संपर्क ठेवला जाऊ शकत होता. तरीही नबाबाचा पाकिस्तानात सामील होण्याचा मनोदय होता. जीना यांनाही जुनागढ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात हवे होते. जुनागढ ताब्यात आलं असतं तर जीनांना अरबी समुद्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येणार होतं आणि भारतावर नजर ठेवता येणार होती. पण भारतासाठी ही मोठी धोक्याची गोष्ट होती. 

जुनागढचा नबाब ही एक विक्षिप्त व्यक्ती होती. तो भोगविलासी आणि चैनी तर होताच पण कुत्री पाळण्याचा मोठा शौकीन होता. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची  ८०० कुत्री होती. या प्रत्येक कुत्र्याची देखभाल करण्यासाठी त्याने खास माणसांची नेमणूक केली होती. आपल्याकडील काही कुत्र्यांची लग्नेही त्याने मोठ्या थाटामाटात लावली होती. त्यांच्या लग्नावर काही लक्ष रुपये सरकारी खजिन्यातून त्या काळी उधळले होते. शिवाय लग्नाच्या दिवशी राज्यात सुटी जाहीर केली होती. या राज्यातील प्रजेला त्याचे हे उद्योग आवडत नव्हते. प्रजेची इच्छा भारतात सामील होण्याची होती. जुनागढ कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी जोडलं जाऊ शकत नव्हतं. अशा विपरीत परिस्थितीतही जीना जुनागढवर आपला हक्क सांगत होते. जुनागढचा हा विलासी  नबाब महाबतखान रसूलखान पाकिस्तानात सामील होण्याची स्वप्ने बघत होता. 

जीनांनी माऊंटबॅटन यांच्याकडे तीन मागण्या केल्या होत्या. पहिली म्हणजे जुनागढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेणे, दुसरी म्हणजे भारतीय सैन्यदलाला जुनागढमध्ये प्रवेशबंदी करणे आणि तिसरी मागणी म्हणजे जुनागढच्या प्रजेचे पाकिस्तानात सामील होण्याबाबत सार्वमत घेणे. या तिन्ही मागण्या पटेल यांना मंजूर नव्हत्या. पण माऊंटबॅटन यांनी जीनांच्या मागणीला होकार देऊन एक प्रकारे भारतविरोधी भूमिका घेतली होती. माऊंटबॅटन जुनागढमध्ये भारतीय सैन्याला कारवाई करू देण्यास तयार नव्हते. पं नेहरू यांचे म्हणणे होते की या संदर्भात आपण ब्रिटिश सरकारकडे तक्रार करू. पण ब्रिटिश सरकार हे भारताच्या बाबतीत पक्षपाती होते. ते भारताच्या हिताची भूमिका घेईल याची कोणतीही खात्री नव्हती. त्यामुळे हा प्रश्न राष्ट्रसंघात नेणे, ब्रिटिशांकडे तक्रार करणे या गोष्टी सरदार पटेलांना अजिबात मान्य नव्हत्या. आपण स्वतः होऊन आपली मान दुसऱ्याच्या हातात का द्यायची ही याबाबत त्यांची भूमिका होती. 

जुनागढमध्ये दोन छोटी स्वतंत्र संस्थाने होती. बाबरियावाड आणि मंगोला अशी त्यांची नावे होती. या राज्यांवर नबाबाचे वर्चस्व होते. पण राज्यातील प्रजा नबाबाच्या विरुद्ध होती . या दोन संस्थानांनी आपण भारतात सामील होणार असे जाहीर केले होते. शिवाय या संस्थानातील समलदास गांधी यांनी नबाबाला आव्हान देण्यासाठी एक हंगामी सरकार स्थापन करून त्यात काठियावाडमधील सैनिकांची भरती केली होती. काठियावाडमधील राजे आधीच नबाबाच्या पाकधार्जिण्या भूमिकेने संतप्त झाले होते. या सगळ्या परिस्थितीमुळे चवताळलेल्या नबाबाने आपली सेना बाबारियावाड आणि मंगोला ताब्यात घेण्यासाठी तेथे घुसवली. हे त्याने सरळ सरळ केलेले आक्रमण होते. अशा परिस्थतीत सरदार पटेल स्वस्थ बसणे शक्य नव्हते. त्यांनी भारतीय लष्कराला जुनागढमध्ये पाठवले. हे सैन्य अशा पद्धतीने गेले की त्याने सगळ्या बाजूला जुनागढला वेढा टाकला. ही कारवाई पटेलांनी माऊंटबॅटन यांची परवानगी न घेता परस्पर केली होती. कारण अशा कारवाईला ते परवानगी देणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत  वेळ दवडून चालणार नव्हते. विजेच्या वेगाने कारवाई करणे आवश्यक होते. 

 सैन्याच्या खर्चाने आणि उधळपट्टीने आधीच जर्जर झालेल्या जुनागढ राज्याला आता अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला होता. शिवाय भारतीय सैन्याने नाकेबंदी केली होती. त्यामुळे मदत मिळणे कठीण होते. पाकिस्तानकडून कोणतेही साहाय्य मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय राज्यातील प्रजा कधीही उठाव करू शकत होती. नबाबाला आता आपला पराभव स्पष्ट दिसू लागला होता. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन त्याने पाकिस्तानात पळून जायचे ठरवले. त्याने आपले राज्य दिवाणाच्या स्वाधीन केले. त्याच्या एकूण नऊ बेगमा होत्या. त्यातील सात बेगम, त्यांची मुले, आपली आवडती कुत्री, रोख पैसा, सोनेनाणे, दागदागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन हा नबाब पाकिस्तानातील कराचीला पळून गेला. 

नऊ नोव्हेंबरला भारत सरकारनं जुनागढ आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर स्वतः पटेलांनी जुनागढला भेट दिली. तेथे त्यांचं अभूतपूर्व स्वागत झालं. त्यावेळी पटेलांनी लोकांना संबोधित केलं. ते आपल्या भाषणात म्हणाले, ' भारत सरकार लोकांच्या इच्छेचा अनादर करणार नाही. जुनागढने भारतात राहावं की पाकिस्तानात जावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? ' यावेळी दहा हजाराहून अधिक लोकांनी हात वर करून भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांनी खरोखरीच लोकांची इच्छा जाणून घेण्यासाठी जुनागढमध्ये सार्वमत घेण्यात आलं. या वेळी लोकांनी प्रचंड बहुमताने भारताच्या बाजूने कौल दिला. जुनागढच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं होतं. देशभरातून सरदार पटेलांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला होता.

 प्रत्यक्ष युद्ध न होऊ देता, कुठलाही रक्तपात न घडू देता पटेलांच्या मुत्सद्देगिरीने जुनागढ भारताच्या ताब्यात आले होते. जुनागढचा नबाब आणि जीना यांचे कुटील मनसुबे पटेलांनी धुळीस मिळवले होते. 

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२०/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 


सरदार पटेल आणि व्ही पी मेनन 

जुनागढचा नबाब 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...