मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग बारा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग बारा 

सरदार पटेलांनी भारतात विखुरलेल्या विविध संस्थानांचे विलीनीकरण करताना कृष्णनीती अवलंबली. काही संस्थानिकांना चुचकारून, काहींना गोड बोलून, काही संस्थानिकांना अस्थिरतेची भीती दाखवून तर काहींना सैनिकी कारवाईचा धाक दाखवून त्यांनी भारतीय संघराज्यात सामील करून घेतले. श्रीकृष्णाने त्याच्या मार्गात आड येणाऱ्या कालयवन, जरासंध इ बलवान राजांना युक्तिप्रयुक्तीने मारले. हे करताना त्याने प्रजेला कोणतेही नुकसान होणार नाही, निरपराध सैनिकांचा बळी जाणार नाही याची काळजी घेतली. त्याचप्रमाणे सरदार पटेलांनीही संस्थानांचे विलीनीकरण करताना देशाचा पैसा, मनुष्यबळ खर्ची पडणार नाही याचा विचार प्राधान्याने केला. त्या त्या राज्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. अर्थात कालयवन, जरासंध हे जसे श्रीकृष्णाचे शत्रू होते, तसे संस्थानिक हे शत्रू नव्हते. ते आपलेच भारतीय देशबांधव होते याची जाण सरदार पटेलांना होती. शिवाय त्यांच्यावर आक्रमण केल्याने संबंधात कायमची कटुता येण्याचा संभव होता. अर्थात जिथे लष्करी कारवाई करणे भाग पडले तिथे त्यांनी ती केली. 

सरदार पटेलांनी संस्थानिकांना त्यांच्या देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांच्या मनातील देशभक्तीची ज्योत पेटवली. पटेलांच्या आवाहनाला संस्थानिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना सरदार पटेलांबद्दल किती आदर वाटत होता याची पावती बिकानेरच्या महाराजांचे उद्गार आपल्याला देतात. ते पटेलांना म्हणाले, " उद्याच्या भारतात आम्हाला सन्मानाचे आणि आदराचे स्थान मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला अंतःकरणपूर्वक पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतातील सर्व राजे आणि त्यांची राज्यं तुमच्या हाती सुरक्षित आहेत याची आम्हाला खात्री वाटते. " एका अर्थाने सरदार पटेल या राजांच्या मनावर राज्य करणारे सर्वात मोठे राजे झाले होते. खऱ्या अर्थाने ते ' सरदार ' होते. 

जशी संस्थानिकांना सरदार पटेलांबद्दल खात्री होती, तशीच दुसऱ्या बाजूला माउंटबॅटन यांनाही त्यांच्याबद्दल होती. सरदार पटेलांकडे ज्यावेळी गृहमंत्री म्हणून हंगामी सरकारमध्ये जबाबदारी सोपवली गेली आणि संस्थानांचा  प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा माऊंटबॅटन म्हणाले, " हे खातं नेहरूंकडे सोपवलं नाही याचा आनंद मला होतो आहे कारण तसं झालं असतं तर सगळ्याच गोष्टी बिघडल्या असत्या. " माऊंटबॅटन यांनी भारताच्या वतीने इंग्लंडच्या राजाला दोन आश्वासने दिली होती. त्यातील पहिले म्हणजे भारत राष्ट्रकुलाचा सदस्य बनेल आणि दुसरं म्हणजे सर्व संस्थानिकांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. ही दोन्ही आश्वासनं पूर्ण करू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे सरदार पटेल याची त्यांना खात्री होती. 

सरदार पटेल यांनी माऊंटबॅटन यांच्या अटी मान्य करताना त्यांच्यासमोर आपले म्हणणे फार सुंदर आणि सूचक शब्दात मांडले होते. ते म्हणाले, " तुम्ही जर मला सफरचंदांनी पूर्ण भरलेली टोपली देणार असाल, तरच मी ही नवी जबाबदारी स्वीकारेन. " हे ऐकल्यावर माऊंटबॅटन गोंधळले. ते म्हणाले, " आपल्याला काय म्हणायचे आहे ? " पटेल म्हणाले, " मला ५६५ सफरचंद असलेली टोपली हवी आहे. एकदोन सफरचंदं कमी असली तरी मला ते चालणार नाही. " म्हणजेच सरदार पटेल यांना भारतातील सर्व ५६५ संस्थाने भारतात सामील व्हायला हवी होती. पटेल यांना काय म्हणायचे आहे ते माऊंटबॅटन समजून चुकले होते. माऊंटबॅटन यांना अशा रोखठोक शब्दात सुनावण्याची हिंमत फक्त पटेल यांची होती. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. ते जे काही करत होते ते होते फक्त मातृभूमीसाठी. 

पटेलांनी संस्थानिकांबरोबर व्यवहार करताना मुत्सद्दीपणा, व्यवहारकुशलता आणि कणखरपणा या गुणांचे दर्शन घडवले. त्यांना माहित होते की ही संस्थाने जर भारतात सामील झाली नाहीत, तर भारतीय स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही. एकवेळ मुस्लिमबहुल प्रांताशिवाय भारत राहू शकेल पण या राज्यांच्या शिवाय तो राहू शकत नाही. हैदराबादला निजामाचे राज्य होते. हैदराबाद स्वतंत्र भारतात येण्यास तयार नव्हते. हैदराबाद राज्य स्वतंत्र राहिले तर पटेलांनी पाहिलेले एकात्म आणि अखंड भारताचे स्वप्न भंग पावत होते. ते म्हणाले, " हैदराबाद हे राज्य भारतमातेच्या पोटात आहे. ते मुख्य शरीरापासून वेगळे झाले तर श्वास कसा घेता येईल ? ही सगळी राज्यं म्हणजे भारताचं हृदय आहे. हे हृदय शक्तिशाली होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. त्यांच्या याच निर्धारामुळे भारतमातेची शकले होण्यापासून त्यांनी देशाला वाचवले. 

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१३/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

सरदार पटेल आणि व्ही पी मेनन 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...