मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सतरा

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सतरा 

इंग्रजांनी भारताचे हस्तांतरण करण्यापूर्वी भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा जो पर्याय दिला होता, तो भारताच्या एकात्मतेच्या आणि अखंडतेच्या दृष्टीने धोकादायक होता. सुदैवाने सरदार पटेलांसारखा दूरदृष्टी असलेले नेतृत्व या काळात भारताला लाभले होते. पटेलांनी एकेक करून सगळी संस्थाने भारतात सामील करून घेण्याचे अखंड प्रयत्न सुरूच ठेवले होते. काश्मीरचा प्रश्न सरदार पटेलांना पूर्णपणे जरी सोडवता आला  नाही, तरी आज काश्मीर भारतामध्ये असण्याचे श्रेय पटेल यांनाच द्यावे लागेल. काश्मीरचा प्रश्न पटेलांकडे असलेल्या गृहखात्याच्या अखत्यारीतून नेहरूंनी काढून घेतल्यामुळे पटेलांना नंतर काश्मीर संबंधाने फार काही करता आले नाही. 

स्वतंत्र भारत बलशाली करण्याचे पटेल यांचे प्रयत्न अखंड सुरूच होते. त्यांचे वय या सुमारास ७२ वर्षांचे होते. पण या वयातही या लोहपुरूषाची अखंड धावपळ, दौरे आणि भेटीगाठी सुरु होत्या. एकात्म आणि अखंड भारताचे स्वप्न त्यांना साकार करायचे होते. त्यासाठी पटेल न थकता काम करीत होते. याच धावपळीमुळे त्यांना मार्च १९४८ मध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉ नी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. विश्रांतीसाठी पटेल डेहराडून येथे आले होते. अशाच वेळी हैदराबादचा प्रश्न उभा राहिला. 

हैदराबाद हे भारतातील त्या वेळचे एक महत्वाचे आणि शक्तिशाली राज्य होते. हैदराबादचा निजाम पाकिस्तानशी संधान साधून होता. वेळोवेळी हैदराबाद स्वतंत्र राहणार असल्याची घोषणा करत होता. हैदराबादमध्ये बहुसंख्येने प्रजा मुस्लिम होती. रझाकार या मुस्लिम संघटनेने हैदराबादमध्ये मुस्लिमेतर लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली होती . कासीम रझवी हा रझाकारांचा नेता होता. तो भडक भाषणे करून रझाकारांना हिंदूंविरुद्ध चिथावणी देत होता. निजामाने भारताबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन करायला सुरुवात केली होती. काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून त्याने तुरुंगात टाकले होते. पाकिस्तानला निजामाने वीस कोटींचं कर्ज मंजूर केलं होतं. 

निजामाने आपले संस्थान स्वतंत्र म्हणून घोषित करावं, आपल्या सैन्यात इंग्रज सैनिकांची भरती करावी, त्याचप्रमाणे गोवा हे राज्य आपल्या राज्याला जोडून घ्यावं, हैदराबाद आणि गोवा जोडणारी एक स्वतंत्र रेल्वेलाईन टाकावी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज करावा या साठी निजामाला इंग्रजांकडून उत्तेजन दिले जात होते. या शिवाय निजामाला आपल्या राज्यात इत्तेहाद अल मुसलमीन या जातीय संघटनेची बांधणी करून मुस्लिमेतरांना दाबून टाकायचे होते. 

मॉंकटन म्हणून इंग्रज अधिकारी निजामाचा घटनात्मक सल्लागार होता. त्याचे आणि माऊंटबॅटन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या मॉंकटन महाशयांचे एकच काम प्राधान्याने सुरु होते, ते म्हणजे निजाम आणि त्याचे राज्य अधिकाधिक शक्तिशाली कसे होईल हे पाहणे. पाकिस्तानचे सर्वेसर्वा जीना यांचा हैदराबादवरही डोळा होता. या सर्व गोष्टी पटेलांना काळजीत टाकणाऱ्या होत्या. हैदराबाद संबंधात काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे असे पटेलांचे मत होते. पटेलांसाठी काश्मीरपेक्षाही हैदराबाद अधिक महत्वाचे होते. त्याचे कारण म्हणजे हैदराबादचे भारतातील महत्वपूर्ण स्थान. पटेल यांच्या मते हैदराबाद म्हणजे जणू भारताचे पोट. या पोटालाच जर कँसर झाला तर तो सर्व शरीरभर पसरण्याचा धोका होता. हैदराबादचे अनुकरण इतर राज्ये करण्याचा धोका होता. 

हैदराबादमधील भारतविरोधी कारवायांचा धोका पटेलांनी वेळीच ओळखला होता. निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पटेल समर्थ होते. पण दुर्दैवाने निजामाशी या संदर्भात बोलणी करण्याचे अधिकार नेहरूंनी पटेलांसोबत माऊंटबॅटन यांनाही दिले होते. खरे म्हणजे पटेलांना निजाम आणि ते स्वतः यांच्यामध्ये कुणा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नको होता. पण नेहरूंच्या प्रस्तावाला त्यांनी नाईलाजाने  दिली. पटेल या प्रश्नाकडे एक राज्य भारतात कसे सामील करून घेता येईल आणि त्याचा भारताला असलेला धोका कसा टळेल या दृष्टीने बघत होते. नेहरूंना मात्र आपण काही कारवाई केली तर निजामाच्या राज्यातील मुस्लिम नाराज होतील ही भीती होती. 

पटेलांनी या संदर्भात माऊंटबॅटन यांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की आता या परिस्थितीत हैदराबादसमोर भारतात सामील होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इत्तेहाद अल मुसलमीनच्या कारवायांनी मुस्लिमेतर लोकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. हैदराबादमध्ये सुरु असणाऱ्या कारवाया जीनांच्या चिथावणीने सुरु आहेत. मॉंकटन यांच्या पाठबळाने निजामाने भारतात विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला होता. त्याऐवजी आम्ही भारताशी सहयोग करायला तयार आहोत असे त्यांचे म्हणणे होते. परंतु पुढे हैदराबाद आणि पाकिस्तान शक्तिशाली झाल्यावर त्यांनी हा सहयोगाचा करार सहज धुडकावून लावला असता. निजाम आणि मॉंकटन यांच्यात गुप्त खलबतं सुरु होती. ते पाकिस्तानच्या संपर्कात असल्याने भारताबरोबर कोणताही समझोता होण्याची चिन्हं दिसत नव्हती. 

अशातच माऊंटबॅटन यांनी ' जैसे थे ' कराराची कल्पना मांडली. पण हा जैसे थे करार भारताच्या दृष्टीने धोकादायक होता. या कालावधीत निजामाने आपले सैन्य सामर्थ्य वाढवण्यास सुरुवात केली होती. हैदराबादमध्ये जातीय दंगे सुरूच होते. रझाकारांच्या चिथावणीने सशस्त्र पठाणांच्या टोळ्या शहरात अन्याय, अत्याचार आणि लुटालूट करीत होत्या. हिंदूंना तेथे राहणे अशक्य होत होते. त्यामुळे हिंदू मोठ्या संख्येने शहरातून बाहेर पडत होते. 

( क्रमशः पुढील भाग बुधवारी ) 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२४/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

हैदराबादचा निजाम आणि सरदार पटेल 














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...