मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग आठ

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग आठ 

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद खूपच वाढले असा तो १९४१-४२ चा काळ होता. आज ज्यांना आपण त्याकाळातील मोठे नेते मानतो, असे नेते देखील वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ, सत्तेची आस इ च्या अधीन होऊन स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांना न कळत दुय्यम स्थान देऊ लागले होते. प्रांताप्रांतात निवडणुका होऊन महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल या त्रयींमुळे काँग्रेस सरकारे सत्तेवर आली होती. पण ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा ( डिव्हाइड अँड रुल ) या नीतीचा परिणाम दिसू लागला होता. सरकारमधील काँग्रेसचे काही डाव्या विचारांचे नेते ब्रिटिशांच्या अपप्रचाराला बळी पडले होते. त्यांनी कायदेमंडळातून राजीनामे दिले होते. यातूनच जीनांसारख्या फुटीरतावादी नेत्यांचे फावले. त्यांना ब्रिटिशांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. ब्रिटिशांनीही जीना हेच काँग्रेसला पर्याय आहेत अशी जीनांची प्रतिमा निर्माण केली. 

१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. या युद्धात ब्रिटनला भारताची मदत हवी होती. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद होते. पंडित नेहरू भारताने इंग्रज सरकारला सशर्त मदत करावी या मताचे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. ते इंग्रज सरकारवर आक्रमण करावे अशी भूमिका मांडत होते. गांधीजी इंग्रजांना बिनशर्त मदत करावी याबद्दल आग्रही होते. या मतभिन्नतेमुळे हे नेते मनाने एकमेकांपासून दूर गेले. काँग्रेस पक्षावर असणारा गांधीजींचा प्रभाव तात्पुरता कमी झाला. सरदार पटेलही गांधीजींच्या या मताशी सहमत नव्हते. गांधीजींचा हा सल्ला कदाचित दूरदर्शी असेलही, पण तो व्यवहार्य मात्र निश्चित नाही असे त्यांना वाटत होते. 

भारतीयांकडून इंग्रजांना कोणतेही सहकार्य न मिळाल्याने इंग्रज सरकार चिडले. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांनी वैयक्तिक सत्याग्रह सुरु केल्याने गांधीजी, पटेल या सारख्या नेत्यांना अटक झाली. ३ जुलै १९४० रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली . ७ ऑगस्टच्या बैठकीत ' भारत छोडो ' चा ठराव करण्यात आला. इंग्रजांना कोणतेही सहकार्य करायचे नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देऊन सरकारी कामकाज बंद पाडावे, शाळा-महाविद्यालये सुद्धा बंद व्हावीत, रेल्वे, पोस्ट इ च्या कर्मचाऱ्यांनी आपले काम करणे थांबवावे असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या काळात पटेलांची भाषणे अधिकाधिक प्रक्षोभक होऊ लागली. इंग्रज सरकारला कोणतेही सहकार्य करू नका. ' करो या मरो ' या आंदोलनात सामील व्हा. आपल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून टाका. हीच वेळ आहे. असे भावनिक आवाहन लोकांना ते करीत होते. 

९ ऑगस्टला हे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली . यात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यासह सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या प्रमुख नेत्यांच्या अटकेमुळे देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. दंगे, जाळपोळ सुरु झाली. या सर्व नेत्यांना स्थानबद्ध करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. तेथे त्यांचा जगापासून संपर्कच तोडण्यात आला. या काळात सरदार पटेलांमधील वेगळे स्वभावगुण इतर नेत्यांच्या अनुभवास आले. पटेल अत्यंत कमी बोलत पण त्यांचे बोलणे मुळातच वकिलीचा पिंड असल्याने मुद्देसूद असे. कोणत्याही विषयावर ते पटकन निर्णय घेत. त्यांची मते पक्की असत. पण तरीही जर त्यांना कोणी एखादी गोष्ट सुचवली किंवा लक्षात आणून दिली तर ती स्वीकारण्याची त्यांची तयारी असे. त्यांच्या बोलण्यात नेहमीच नर्मविनोदाला स्थान असे. अनेक गुजराती म्हणी त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांचा चपखल वापर करून आपले म्हणणे ते समोरच्याला मोठ्या प्रभावीपणे पटवून देत. ते तुरुंगात असल्यामुळे राजगोपालाचारी, भुलाभाई देसाई यांच्यासारख्या इंग्रजधार्जिण्या आणि काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे फावले. त्यामुळे जीनांसारख्या नेत्याला अधिक बळ मिळाले. 

लॉर्ड वेव्हेल यांनी सिमला कराराचा जो प्रस्ताव काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यासमोर मांडला होता, तो अयशस्वी झाला. सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांनी वेव्हेल यांच्यापुढे केलेला मैत्रीचा हात वेव्हेल यांनी झिडकारला आणि ते जीनांच्या दबावाला बळी पडले. जीनांच्या आधी ' फोडा आणि मग देश सोडा ' या मागणीला त्यांनी जणू पाठिंबा दिला. या परिस्थितीचा पुरेपूर फायदा धूर्त जीनांनी करून घेतला आणि पाकिस्तानची मागणी आपल्या पदरात पाडून घेतली. दुर्गादास नावाचे ज्येष्ठ पत्रकार त्या वेळी होते. त्यांनी जीनांना स्पष्टच विचारले की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या ऐक्याची वेव्हेल यांची योजना आपण उधळून का लावलीत ? तेव्हा जीना म्हणाले, ' मला जर एखाद्या तबकात घालून जर पाकिस्तान कुणी भेट म्हणून देत असेल तर ते नाकारण्याइतका मी मूर्ख आहे का ? ' काँग्रेसमध्ये फूट पडली नसती आणि आपल्या मागण्यांवर जर काँग्रेस ठाम राहिली असती तर कदाचित फाळणी आणि तिचे आजतागायत आपण भोगत असलेले परिणाम टाळता आले असते. या सगळ्या प्रकारामुळे सरदार पटेलांसारखा नेता मात्र मनातून अस्वस्थ आणि दुःखी होता. 

( क्रमशः पुढील भाग बुधवारी ) 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

03/01/2021

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...