मुख्य सामग्रीवर वगळा

नारायण हवेत की नारायणी सेना...?

उगवतीचे रंग

नारायण हवेत की नारायणी सेना...?

महाभारतात एक प्रसंग आहे. कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे जणू आता ठरलेले असते. आणि या युद्धात पांडवांसमोर कौरवांचा टिकाव लागणार नाही याची कल्पना धृतराष्ट्र, शकुनी इ सगळ्यांनाचअसते. त्यांच्या मते कौरवांच्या मार्गातील मोठा अडसर म्हणजे वासुदेव, भगवान श्रीकृष्ण. म्हणून शकुनी दुर्योधनाला श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी पाठवतो. तेव्हा दुर्योधन त्याप्रमाणे आधी कृष्णाकडे जातो. आणि नंतर लगेच श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन सुद्धा येतो. अर्जुन पायाशी बसलेला असतो आणि दुर्योधन उशाला.

साहजिकच कृष्णाचे लक्ष अर्जुनाकडे आधी जाते. तेव्हा दुर्योधन म्हणतो, ' मी आधी आलो आहे.' त्यामुळे आधी मदत मागण्याची संधी मला मिळाली पाहिजे. तसा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखण्यात अतिशय चतुर आहे. त्याला दुर्योधन आणि अर्जुन यांच्या स्वभावातील फरक चांगलाच माहिती असतो. त्यामुळे तो सांगतो, ' मी तर स्वतः युद्ध करणार नाही. हातात शस्त्रही घेणार नाही. तेव्हा एका बाजूला मी आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना .' अर्थात आधी मागण्याची संधी तो अर्जुनाला देतो.

यावर अर्जुनाने दिलेले उत्तर त्याचं प्रसंगावधान, बुद्धिमत्ता आणि त्यापेक्षाही जास्त काय असेल तर भगवंतावरील श्रद्धा याचे निदर्शक आहे. तो म्हणतो, ' मला नारायणी सेना काय करायची ? तू असल्यानंतर मला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. ' श्रीकृष्णाने आपल्या रथाचे युद्धात सारथ्य करावे अशी अर्जुनाची इच्छा असते. आणि खरं आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ज्याचा सारथी आहे, त्याचा रथ भरकटू शकत नाही. तो योग्य दिशेलाच जाईल. आणि जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत, तिथे विजय निश्चित आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

पण अर्जुनाच्या दिलेल्या उत्तराने अर्थातच दुर्योधन खुश होतो आणि त्याला हवी असलेली नारायण सेना मागून घेतो. हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो. कल्पना करून बघा की अर्जुन आणि दुर्योधन यांच्या जागी आपण आहोत. आणि आपल्याला भगवंताने संधी दिली तर आपण काय मागू ? आपल्याला हा प्रसंग माहिती आहे. त्यामुळे आपण आता हुशार झालो आहोत. आपणही नारायणालाच मागून घेऊ. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते तेही आपण बघू.

यानिमित्ताने मला श्रेयस आणि प्रेयस हे दोन शब्द आठवले. ज्यांचा उल्लेख कठोपनिषदात येतो. त्यात म्हटले आहे की ज्या मार्गाने मानवाचे कल्याण होऊ शकते तो मार्ग म्हणजे श्रेयस आणि संसारातील विविध प्रकारचे उपभोग घेण्यासाठी जो मार्ग आपण निवडतो, तो म्हणजे प्रेयस . यात आपण योग्य विचार करून निवड करायची असते.

सध्या कोरोनाच्या साथीमुळे सगळी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे देवसुध्दा मोकळा श्वास घेत असतील. नाहीतर सगळीकडे दर्शनासाठी लांबलचक रांगा लागलेल्या असतात. या रांगा दर्शन घेणाऱ्यांपेक्षा मागण्या मागणाऱ्यांच्या अधिक असतात. आपण हात जोडून भक्तिभावाने नमस्कार करतो. मनोभावे करतो. जवळच्या फुलमाला , प्रसाद वगैरे अर्पण करतो. पण हात जोडताना मनामध्ये काहीतरी मागणी असतेच. काहीतरी नवस असतोच. आणि आपण श्रेयस मागतो का ? नाही. आपण मागतो ते प्रेयस .

परमेश्वर त्याला फक्त भेटण्यासाठी जे येतात, त्यांना तो न मागता हवं ते देऊन टाकतो. म्हणून देवाकडे फक्त भक्तीचं वरदान जे मागतात, त्यांना सगळं काही मिळतं . हनुमंताने रामाजवळ फक्त भक्ती मागितली. पण रामाने हनुमंताला आपले सर्वस्व दिले. प्रेम दिले. असं नातं भक्त आणि भगवंतामध्ये निर्माण होतं . स्वामी विवेकानंदाना श्रीरामकृष्णांनी कालीमातेजवळ काय हवं ते माग म्हणून पाठवले. पण त्यांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्यच मागितलं. हेच श्रेयस.

हे श्रेयस आणि प्रेयस थोडं आणखी स्पष्ट करतो. श्रेयस म्हणजे श्रेयस्कर. आणि प्रेयस म्हणजे प्रिय असं थोडक्यात समजू. ज्या गोष्टींनी अंतिमतः आपलं कल्याण होणार आहे, अशा गोष्टी मिळवण्यासाठीचा पत्करलेला मार्ग म्हणजे श्रेयस होय. हा मार्ग खडतर असतो. या मार्गावर काटे असतात. आणि प्रेयसी म्हणजे आवडत्या किंवा प्रिय गोष्टी मिळवणे. हा मार्ग वरवर आकर्षक दिसतो. पण तो अंतिमतः हितकारक असेलच असे नाही. थोडं व्यवहारातलं उदाहरण घेऊ. अभ्यास करणं , वाचन करणं, आरोग्यदायी व्यायाम करणं या गोष्टी श्रेयस या सदरात मोडतील कारण त्या अंतिमतः आपल्या हिताच्या आहेत. तर टीव्ही, मोबाईल, बाहेरील फास्ट फूड यासारख्या गोष्टी आपल्याला आवडतात . आपण त्यांना प्रेयस म्हणू या. त्या अंतिमतः आपल्या हिताच्या नाहीत.

अर्थात हे व्यवहाराच्या दृष्टीने झालं. खरं  तर श्रेयसचा मार्ग म्हणजे अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग. पण आपल्याला रोजच्या व्यवहारात श्रेयस आणि प्रेयसची सांगड घालता येऊ शकते. समर्थ रामदासांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे. ' आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका,' असं समर्थ म्हणतात ते यासाठीच. तेव्हा निवड आपल्या हातात आहे. नारायणाशिवाय नुसत्या नारायण सेनेची किंमत शून्य आहे. आपलं अंतिम लक्ष नारायण आहे. नारायणी सेना नाही, एवढं यानिमित्ताने लक्षात ठेवलं तरी पुरे.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
             ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...