मुख्य सामग्रीवर वगळा

माझे पहिले प्रेम...

उगवतीचे रंग 

माझे पहिले प्रेम... 

लेखाचे शीर्षक वाचून चक्रावला असाल ना ? आज यांना काय झाले ? ' व्यवस्थित ' तर आहात ना ..? नेहमी साधारणपणे गंभीर विषयांवर लिहिणारे हे लेखक महाशय आज चक्क ' माझे पहिले प्रेम  ' या विषयावर लिहिणार ?  हो,  आहे बुवा तसंच . आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दलच सांगणार आहे. पण थांबा जरा. त्या आधी मला सांगा तुम्हाला तो एक दुजे के लिये चित्रपट आठवतो का ? त्यात लता मंगेशकरांचे मला एक फार आवडणारे गाणे आहे. ते म्हणजे ' ऐ प्यार तेरी पहली नजर को सलाम...'  त्या गाण्यात त्या चित्रपटाच्या नायिकेला तिच्या पहिल्या प्रेमाची संधी ज्या ज्या गोष्टींनी प्राप्त करून दिली त्या त्या गोष्टींना ती सलाम करते. मग पहली नजर, नंतर ' जिसने हमे मिलाया उस वक्त, उस घडी, उस डगर को सलाम ..' असं ती म्हणते. ती कृतज्ञ आहे त्याबद्दल. आपल्या प्रेमाला साहाय्यभूत ठरणाऱ्या पहिल्या आणि सुरुवातीच्या सगळ्या  गोष्टींना ती सलाम करते. आणि केलाच पाहिजे ना. ज्यांनी आयुष्यभरासाठी प्रेमाची एवढी मोठी दौलत दिली, त्यांना सलाम नाही तर काय करणार ?

 मी तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. सांगून टाकतो माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल. माझं पहिलं प्रेम म्हणजे पुस्तक. पुस्तकांशिवाय मला दुसरं काहीही अधिक प्रिय नाही. कोणाकोणाच्या काही कल्पना असतात ना.. ! म्हणजे अमुक एक स्वप्न पूर्ण व्हायचं राहिलं आहे. मला जर संधी मिळाली तर मी अमुक करीन , टमूक करीन . थोडक्यात म्हणजे इंग्रजीत त्याला बकेट लिस्ट असा शब्द आहे. तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये असं स्वप्न आहेच. आता कोरोनामुळे काही जणांना क्वारंटाईनं करतात ना..!  तसं जर माझ्याबाबतीत करायचं झालं  ( अर्थात कोरोनामुळे तसं करण्याची वेळ न येवो ) तर, मी सांगेन की एखाद्या खोलीत किंवा वाचनालयात माझ्यासाठी एक टेबल खुर्ची, एखादं वही पेन, विश्रांतीसाठी एखादा बेड आणि माझ्या अवतीभोवती माझी आवडती पुस्तक ठेवा. दिवसभर मी आणि ती पुस्तकं . बस. फक्त अधूनमधून मला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा माझी आवडती गाणी ऐकायची सोय ठेवा. आणि जेवण्याखाण्याच्या माझ्या फार आवडीनिवडी नाहीत. त्यामुळे जेवण साधेच दोन वेळेला मिळाले तरी चालेल. आणि दोन वेळेला चहा.. ! पहा बरं  एवढ्याच माफक माझ्या अपेक्षा आहेत. मग मला दुसरे काही नाही मिळाले तरी चालेल. ही माझ्या बकेट लिस्ट मधली पहिली पसंती.

म्हणूनच त्या वरच्या गाण्यात जसा प्रत्येक पहिल्या गोष्टीला सलाम आहे ना, तसा माझा सलाम त्या व्यक्तींना की ज्यांनी मला सुरुवातीला वाचनाची सवय लावली. मग त्यात माझे आईवडील, माझे शिक्षक आले. माझा पहिला सलाम त्या पुस्तकांना की ज्यांनी मला वाचनाची गोडी लावली, मला वाचायला शिकवलं.  माझा पहिला सलाम त्या जागेला की जिथं बसून मी पहिलं पुस्तक वाचलं . मी का सलाम करतोय त्या सगळ्या गोष्टींना ? कारण मी त्यांचा ऋणी आहे. वाचन आणि पुस्तकं या दोन गोष्टींनी माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. पुस्तकं नसती तर काय झालं असतं , आयुष्य किती रटाळ बनलं असतं सांगवत नाही.  मग हळूहळू पुस्तकांच्या त्या दुनियेनं मला झपाटून टाकलं. पुस्तकांचं भूत माझ्या मानगुटीवर कायमचं स्वार झालं. विक्रम वेताळाच्या गोष्टीसारखं. तो वेताळ जसा विक्रम राजाला एक एक गोष्ट सांगायचा ना तशी पुस्तकं मला गोष्ट सांगू लागली. पुस्तकं माझा श्वास झाला, पुस्तकं माझा ध्यास झाला. मला कुठलं नवीन पुस्तक मिळणार असेल ना तर  मी अक्षरशः वेडा व्हायचो ते मिळवण्यासाठी. अजूनही पुस्तक हा माझा वीकपॉइंट आहे.

आज आहे २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. हा दिवस जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपिअरच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचाही हा जन्मदिन. तो सुद्धा वाचन दिवस म्हणून साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती.  त्यांनाही पुस्तके फार प्रिय होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीही पुस्तके म्हणजे जीव की प्राण होती.असं म्हणतात की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना लहानपणापासून वाचनाचे इतके वेड होते, की ते आपल्याला पुस्तक मिळावे म्हणून लोकांची घरातली, शेतातली कामे करून देत. लाकडे फोडून देत. आज तर तशी वेळ नाही. सुदैवाने आपल्याला आज पुस्तकं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. आपणच कमी पडतो ती वाचायला.

आज आपण पुस्तक दिन  साजरा करीत आहोत. अर्थात घरीच. या कोरोनामुळे काही तोटे झाले असले तरी काही फायदे निश्चित झाले आहेत. त्याने वाचनप्रेमींना घरी वाचनासाठी अधिक वेळ उपलब्ब्ध करून दिला आहे. आज पुस्तकांचे वाचन काही प्रमाणात कमी झाले असले तरी ' वाचन ' नावाची गोष्ट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरूच आहे. मग ते मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा किंडल यासारख्या माध्यमावर उपलब्ध होणाऱ्या इ बुक्सचे असेल किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या निरनिराळ्या माहितीपूर्ण लेखांचे असेल. ते सुरु आहे. फक्त माध्यम बदलले आहे. आणि या पुढचा काळ आणि येणारी पिढी कदाचित खरेखरे पुस्तक फार कमी हातात घेईल आणि इ बुक्सच्या माध्यमातून आपले वाचन करील.

खरं तर आज तुम्हाआम्हाला वाचनासाठी खरीखुरी पुस्तकंच आवडतात. आपल्यासमोर जर पुस्तक, मोबाईल, लॅपटॉप इ गोष्टी ठेवल्या आणि जर आपल्याला त्यातून निवड करायची झाली, तर आपण आधी पुस्तकच हातात घेऊ. याचं कारण म्हणजे लहानपणापासून आपली वाचन हे संज्ञा पुस्तकांशी निगडित आहे. पण भविष्यकाळात तसे राहणार नाही. पुस्तक प्रकाशकांना देखील इ बुक्स काढणे सोयीचे होणार आहे कारण छापील पुस्तकांप्रमाणे त्यांची ने आण करणे, हिशेब ठेवणे या गोष्टी त्यांना जिकिरीच्या होत आहेत. पण स्वरूप कोणतेही असो. वाचनाला पर्याय नाही.

शाळेतले, कॉलेजातले औपचारिक शिक्षण आपले काही वर्षांनी संपते. पण अनौपचारिक शिक्षण आयुष्यभर सुरूच राहते. या वाटचालीत आपल्याला शिकवतात ती पुस्तकं , शिकवतं ते वाचन. ती आपले मित्र असतात, मार्गदर्शक असतात आणि गुरुही असतात. एखादी वाहणारी नदी जशी आपल्या काठावरची गावे ,शेते समृद्ध करीत जाते, तशी ही वाचनगंगा आपल्या आयुष्यभर आपण जर वाहती ठेवली तर ती आपलेही जीवन समृद्ध करील यात शंका नाही. आज हा  जागतिक पुस्तक दिन माझा देखील जन्मदिन आहे हा एक सुखद योगायोग मला वाटतो.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
        ९४०३७४९९३२

टिप्पण्या

  1. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण छान लिहिले आहे.तसेच तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.सुप्रभात सर.आणि नमस्कार सर.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...