उगवतीचे रंग
सजगता महत्वाची
सजग असणे म्हणजे जागे असणे, सावध असणे. वर्तमानात राहणे. आपल्याला सजगता साधणे खूप महत्वाचे आहे. म्हणजे आता या क्षणी जे काही आपण करत असू, फक्त त्याच्यात आणि त्याच्यातच लक्ष असणे.असे असणे म्हणजे सजग असणे. आपले मन नेहमी भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार करत असते. त्यामुळे बऱ्याचदा हाती असणारा वर्तमानातला महत्वाचा क्षण हातून निसटून जातो. आपण काही उदाहरणे पाहू या म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षात येईल.
समजा, मी नुकताच उठलेलो आहे आणि ब्रश करतो आहे. ब्रश करताना माझ्या डोक्यात अनेक विचार आहेत. आजचा पेपर आला की नाही ? आज चहा केव्हा घ्यायला मिळतो ? कालपरवापासून सलूनमध्ये जावे असे म्हणतो आहे. पण दुकाने कधी उघडतात कोणास ठाऊक ? असा विचार करत आपण दात घासत असतो. मग तोंड धुवून होते. तेव्हाही त्या काही क्षणात अशीच विचारांची गर्दी होते. आपले मूळ काम कोणते होते ? तर दात घासणे. त्या कामाकडे आपले कितीसे लक्ष होते ? असेच आपले अंघोळ करताना होते. अंगावर पाणी ओतता ओतता कितीतरी विचार आपण पाण्याबरोबर अंगावर जणू ओतून घेतो. मूळ अंघोळीचे जे काम आपण करणार होतो, त्याकडे आपले कितपत लक्ष होते ? त्यामुळे ती अंघोळ फक्त शरीराची होते. मन कोरडेच राहते. मनाचीही अंघोळ व्हायला हवी. कुठलीही क्रिया करताना शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तो ' योग ' होतो. ते काम उत्कृष्ट होते.
म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रत्येक महत्वाची गोष्ट करताना काही मंत्र आपल्याला सांगितले आहेत. त्यांच्यात हाच अर्थ आणि हेच रहस्य दडलेले आहे. सकाळी उठल्यावर हातांचे दर्शन घेणे. तेव्हा ' कराग्रे वसते लक्ष्मी..' हा मंत्र. भूमीवर पाय ठेवताना ' समुद्रवसने देवी...' अंघोळ करताना म्हणायचा मंत्र तर खूप सुंदर आहे.
ॐ गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन सन्निधिं कुरू ||
या मंत्रात ज्या सप्त नद्यांचा उल्लेख आला आहे, त्या नद्यांचा वास या जलामध्ये होवो. आणि असे ते सप्त नद्यांचे पवित्र पाणी माझ्या तनमनाला प्रसन्न करो. अशी भावना ठेवून स्नान करायचं आहे. करून तर पहा किती प्रसन्न वाटतं ते. पाणी तेच असेल, तुम्हीही तेच. पण अशी भावना मनात ठेवून केलेलं स्नान तुम्हाला खरोखरच प्रसन्न करील.
सकाळच्या वेळी आपण सूर्यनमस्कार घालतो, तेव्हा देखील प्रत्येक सूर्यनमस्काराच्या वेळी म्हणायचं मंत्र आहे. तो आपण म्हटला तर त्याकडे लक्ष राहते, सजगता राहते. जेव्हा सद्गुरूंनी सांगितलेल्या एखाद्या मंत्राचा जप आपण करतो, तेव्हा त्या मंत्राकडे, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष असले पाहिजे. नाहीतर मंत्रोच्चार हा केवळ एक उपचार झाल्यासारखे होईल. आणि माझ्या दोन माळा जप झाला, चार माळा जप झाला असे सांगायला होईल, पण त्याकडे तो करताना सजगता नसेल, तर तो सुद्धा केवळ एक उपचार ठरेल.
आपल्या मनात एक तर कालचे किंवा गेल्या क्षणाचे विचार असतात म्हणजे गत काळाचे. नाहीतर पुढच्या क्षणांचे, म्हणजेच भविष्याचे. आपण भूत आणि भविष्य यात आपल्या मनाला अडकवून ठेवत असतो. पण आपल्याला आपल्या हाती आताच जो क्षण आहे, तो नीट वापरणे महत्वाचे असते.
अनेक अपघात हे केवळ सजग न राहिल्याने होतात. गाडी चालवताना देखील असेच वेगवेगळे विचार आपल्या मनात असतात. कधी आपण गाडी चालवताना फोनवरही बोलत असतो. म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त क्रिया करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा वेळी कधी समोरून येणाऱ्या वाहनाकडे आपले लक्ष नसते. कधी कधी तर चालकाची झोप झालेली नसल्याने तो सजग राहण्याचा प्रश्नच येत नाही. कधीतरी त्याचे डोळे मिटले जातात, आणि तो अपघाताला निमंत्रण देतो.
आपण सतत भविष्यकाळ किंवा भूतकाळात राहत असल्याने मन सारखे विचारमग्न असते. त्यामुळे आपल्याला असा अनुभव येतो की जेव्हा एखादे काम संपवून आपण घरी येतो, तेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या तर थकलेले असतोच, पण मानसिक दृष्ट्या देखील थकलेले असतो. कारण मनाला आपण विश्रांती देत नाही. निसर्गातील कुठलाही प्राणी, किंवा पक्षी घ्या, तो किती सजग असतो, त्याचे निरीक्षण करा. आपल्या घराबाहेर आपण पक्षांसाठी पाणी भरून ठेवतो, तेव्हा पाणी पिताना सुद्धा ते किती सजग असतात ! आपली थोडीशी जरी चाहूल लागली, तरी भुर्रकन उडून जातात. ही ' अखंड सावधानता ' जमली पाहिजे.
कुठलेही काम करताना वर म्हटल्याप्रमाणे सजगता जर आपल्याला ठेवता आली , तर आपल्या मनावर नको असलेल्या विचारांचा ताण पडणार नाही. तसेच ध्यानाकडे जाण्याची ही पहिली पायरी असू शकेल. आपण कधीही बसलो, तर काही वेळा आपल्या विचारांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय करायचे ? तर काहीच करायचे नाही हे करायचे. येणाऱ्या जाणाऱ्या विचारांकडे त्यात न गुंतता फक्त त्यांचे निरीक्षण करायचे . हा आपला अभ्यास जसजसा वाढेल, तसे आपले मन हळूहळू निर्विचार करण्याची कला आपल्याला साध्य होईल. त्यामुळे आपला मेंदू आणि मन ताजेतवाने राहील. असे विचाररहीत जेव्हा आपले मन होते, तेव्हा आपला स्वतःशी संवाद सुरु होतो. परमेश्वराचे प्रतिबिंब सुद्धा अशा निर्मळ मनातच आपण अनुभवू शकतो.
समर्थ रामदासांची एक गोष्ट आहे. ते जेव्हा भिक्षा मागायला जात तेव्हा एक स्त्री त्यांना दररोज आपल्याला उपदेश द्या म्हणून विनंती करीत असे. समर्थानी बरेच दिवस तिला उपदेश देण्याचे टाळले. पण जेव्हा ती खूपच मागे लागली, तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे. उद्या देतो मी उपदेश. तू प्रसादासाठी खीर वगैरे तयार करून ठेव. म्हटल्याप्रमाणे समर्थ दुसऱ्या दिवशी त्या बाईच्या घरी गेले. जाताना त्यांनी आपल्या कमंडलूमध्ये नदीतली थोडी वाळू,घाण वगैरे भरून नेली. त्या स्त्रीने प्रसादासाठी खीर तयार करून आणली. ती म्हणाली, ' स्वामी, खीर आणली आहे. कशामध्ये देऊ ? ' समर्थांनी आपला तो वाळूने भरलेला कमंडलू पुढे केला. म्हणाले , ' यात दे. ' ती स्त्री म्हणाली, ' स्वामी, हा तर घाणीने भरलेला आहे. यात मी प्रसादाची खीर कशी वाढू ? '
समर्थ म्हणाले, ' बाई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. कमंडलू रिकामा आणि स्वच्छ असेल तरच त्यात काही घेता येईल. तसेच आपल्या मनाचे आहे. तुझे मन राग, द्वेष, असूया, मत्सर, हेवादावा इ विकारांनी भरलेले आहे. ते जोपर्यंत तू सोडत नाहीस, तोपर्यंत माझ्या उपदेशाचा काही उपयोग होणार नाही. '
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा