उगवतीचे रंग
महाभारत : काही पटलेलं, काही न पटलेलं
सध्या दूरदर्शनवर महाभारत सुरु आहे. आपणही बहुतेक सगळे ते पाहत असाल. ते पाहत असताना मनात काही प्रश्न उठतात, काही विचार येतात. काही काही प्रश्न मनाला अस्वस्थही करतात. आणि असाही विचार येतो की असं खरंच घडलं असेल का त्या वेळी ? खरं म्हणजे महाभारताला इतिहास म्हटले जाते. ' हा जय नावाचा इतिहास आहे ' असं आनंद साधलेंचं पुस्तक देखील आहे.आणि महाभारतावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर अनेक पुस्तकंही निघाली आहेत.
मी आपल्यापुढे जे काही प्रश्न मांडणार आहे, ते माझ्या मनात आले आहेत. मी काही कोणी मोठा विचारवंत किंवा लेखक किंवा इतिहासकार नाही. महाभारत हा महर्षी व्यासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने लिहिलेला ग्रंथ आहे. त्यावर भाष्य करणे किंवा काही लिहिणे ही माझी योग्यता नाही. मी आहे एक सामान्य वाचक, सामान्य प्रेक्षक. पण लहानपणापासून जी काही मूल्ये आपल्याला शिकवली जातात, जे काही संस्कार केले जातात, त्यांनासुद्धा एकदम धक्का बसेल असे काही प्रसंग या महाभारतात आहेत. काल आपण सगळ्यांनी द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग पाहिला असेल. हा प्रसंग पाहताना द्रौपदीची आर्तता, तिने फोडलेला टाहो पाहून मन विदीर्ण होते. आणि खरोखरोच हे दृश्य पाहताना आपण आजच्या काळातला एखादा चित्रपट तर पाहत नाही ना असे वाटते. इतक्या भयानकपणे तो प्रसंग आपल्यासमोर सादर होतो.
या प्रसंगाचा विचार करताना मन थोडेसे मागे जाते. आठवतो तो प्रसंग जेव्हा युवराज म्हणून कोणाला नियुक्त करावे यावर दरबारात चर्चा सुरु असते. युधिष्ठिर आणि दुर्योधन हे दोघेही त्या वेळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. त्यावेळी आरोपी म्हणून जी काही चार पाच माणसे पकडून आणली जातात, त्यांच्यावर खुनाचा आरोप असतो. आणि त्यांचा निवाडा करून त्यांना शिक्षा फर्मावयाची असते. दुर्योधन त्या सगळ्यांना एकच शिक्षा सुनावतो. ती म्हणजे मृत्युदंड. पण जेव्हा युधिष्ठिर न्यायनिवाडा करतो, तेव्हा तो त्या आरोपींमधील व्यक्तींचे समाजातील वेगवेगळे स्थान पाहून, त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना वेगवेगळी शिक्षा सुनावतो. या युधिष्ठीराच्या न्यायनिपुणतेवर सर्वच समाधानी होतात आणि युवराज म्हणून युधिष्ठिराची निवड होते.
आता आपलं मन साहजिकच तुलना करतं ते दोन प्रसंगातल्या युधिष्ठिराच्या वागण्यामध्ये. वडिलधाऱ्यांची कधीही अवज्ञा न करणारा, धर्माची जाण असणारा, गुरुजनांबद्दल आदर असणारा आणि अचूक न्यायनिवाडा करणारा हा युधिष्ठीर द्युताच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने वागताना दिसतो, ते मनाला न पटणारे आहे. असं सहज वाटून जातं की ज्या द्रोणाचार्यांनी युधिष्ठिर आणि भावंडाना युद्धनीतीचं शिक्षण दिलं, त्यांनी त्यांना व्यवहार चातुर्याचे धडे दिले की नाही ? युधिष्ठिराला हस्तिनापूरचे राज्य दिले जात नाही. ते दुर्योधनाला देऊन धृतराष्ट्र पुत्रमोहाने युधिष्ठिर आणि त्याच्या भावांवर अन्याय करतो. त्यांच्या वाटेला खांडव वन येते. अशी जागा की जेथे काहीही नसते. सगळीच पुनर्निर्मिती करावी लागते . तरीही पांडुपुत्र हे सगळे स्वीकारतात. श्रीकृष्ण त्यांना सांगतो की ही तुमची कर्मभूमी आहे. तुमच्या कर्तृत्वाला तिथे वाव आहे. सगळे जण मग अपार कष्ट करून त्या खांडववनाचे रूपांतर सुंदर अशा इंद्रप्रस्थात करतात. त्यानंतर श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार जरासंधाचा वध करून राज्य निष्कंटक केले जाते. मग युधिष्ठिर राजसूय यज्ञ करतो आणि त्यानंतर तो चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित होतो. इथपर्यंतच्या घटना तशा एकंदरीत सुसंगत आणि तर्काला पटणाऱ्या वाटतात.
जेव्हा दुर्योधन युधिष्ठिराला द्यूतक्रीडेचे आमंत्रण पाठवतो, तेव्हा युधिष्ठिराने ते स्वीकारणे हेच मुळात न पटणारे आहे. कारण पांडव लाक्षागृहाच्या अग्निपरीक्षेतून नुकतेच सहीसलामत पार पडलेले असतात. या सगळी घटनाक्रमाच्या मुळाशी कपट कारस्थानी शकुनी आणि दुर्योधन आहे हे एव्हाना या सगळ्यांना ज्ञात झालेले असते. तरी केवळ क्षत्रियधर्म म्हणून द्यूताचे आमंत्रण नाकारता येत नाही हे पटत नाही. बरे एक वेळ तेही आपण मान्य करू. पण द्यूतक्रीडेत फक्त खेळ म्हणूनच त्यांनी सहभागी व्हायला हवे होते. तसे झाले नाही. युधिष्ठिराने आपले राज्य पणाला लावले. मोठ्या प्रयासाने पांडवांनी खांडव वनांचे इंद्रप्रस्थात रूपांतर केलेले असते. ते इंद्रप्रस्थ इतक्या सहजपणे तो पणाला लावतो हे पटत नाही. खरे म्हणजे असे राज्य पणाला लावण्याचा त्याला कितपत अधिकार होता ? कारण ज्या इंद्रप्रस्थाचा तो चक्रवर्ती सम्राट झाला होता, त्या प्रजेला त्याने गृहीत धरले. आपल्यावर कोणाचे राज्य असावे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला नाही का ? त्याशिवाय त्या राज्यावर त्याच्याबरोबर त्याचे भाऊ, आई, पत्नी यांचा देखील हक्क होताच.
पुढे चालून युधिष्ठिराने एक एक करून आपल्या भावांना त्या द्यूतक्रीडेत पणाला लावले. सारखे त्यांना प्रेमाने ' अनुज अनुज ' म्हणणारा हा धर्मराज एवढा वाहवत कसा गेला की त्याने आपल्या भावांना पण गृहीत धरावे ? किमान त्यांना एका शब्दाने विचारू नये ? शिवाय द्यूतक्रीडेत पणाला लावण्यासाठी भाऊ ही काही वस्तू किंवा संपत्ती नव्हती. इथे तर सगळी मानवतेची सगळी मूल्येच मला संपुष्टात आल्यासारखी दिसतात. कारण माणूस एक वस्तू म्हणून जुगारात लावला गेला. पूर्वी अमेरिकेत निग्रो लोकांना गुलाम म्हणून वस्तूसारखे विकले जात होते. इथे तर सख्ख्या भावांना पणाला लावले गेले एक वस्तू म्हणून आणि ते गुलाम म्हणून दुर्योधनाने गृहीत धरले.
सगळ्यात कळस होतो तो युधिष्ठिर जेव्हा द्रौपदीला खेळामध्ये पणाला लावतो तेव्हा. ती तर काही त्याची एकट्याची पत्नी नसते. तिच्यावर इतर भावांचाही अधिकार असतो. अत्यंत प्रतिष्ठित अशा द्रुपद राजाची ती कन्या. यज्ञातून प्रकट झालेली याज्ञसेनी. पण तिला पणाला लावताना तर जणू युधिष्ठिराचा विवेकच हरवलेला दिसतो. आणि मग भर दरबारात तिची जी विटंबना होते, ती तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच अस्वस्थ करणारी आहे. विचार करायला लावणारी आहे. त्या एवढ्या मोठ्या कुरुसभेत फक्त स्पष्ट बोलणारा एक विदुर सोडला तर बाकी कोणाचीही काही बोलण्याची हिंमत होत नाही. द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि सगळ्यात ज्येष्ठ असलेले ज्ञानी, शूरवीर असे भीष्म पितामह देखील हतबल झालेले दिसतात.
प्राचीन काळी गुरूंचा आदर करण्याची प्रथा होती. त्यांचा शब्द राजा देखील मोडू शकत नसे. हे रामायणात आपण कुलगुरू वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र आदींच्या रूपाने पाहिले आहे. अर्थात तो रामायण काळ आणि महाभारत काळ यांच्यात हजारो वर्षांचे अंतर असले तरी गुरूबद्दलचा आदर हे मूल्य तेव्हाही काही कालबाह्य झालेले नव्हते. ते होणार नाही. आणि जेव्हा ते होईल तेव्हा तेव्हा महाभारत या पृथ्वीच्या पाठीवर घडल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न हा आहे की कौरव हे पांडवांप्रमाणेच द्रोणाचार्यांचे शिष्य असताना, आपल्या गुरूबद्दल यत्किंचितही आदर त्यांना नाही. मग गुरुचे संस्कार, शिकवण कुठे गेली ? आणि त्यावेळी द्रोणाचार्यांनी सुद्धा बाणेदारपणा का दाखवला नाही ? त्यांना कुरु राजघराण्याने आश्रय दिला होता म्हणून त्यांनी इतके त्यांच्या अधीन व्हावे किंवा मिंधे व्हावे हे न पटणारे आहे. अर्थात हे सगळे घडून गेले आहे. आपण काही म्हटले तरी त्यात बदल होणार नाही. पण तरीदेखील आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या काही प्रश्न उभे राहतात ते मी मांडले आहेत.
आणि सगळ्यात महत्वाचे आहेत ते द्रौपदीने उभे केलेले प्रश्न. ते मानवजातीला केलेले चिरंतन काळापासूनचे प्रश्न आहेत. समाज हा स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून किती काळ गृहीत धरणार ? अगदी रामायण काळापासूनचे हे प्रश्न आहेत. तिला किती अग्निपरीक्षा द्याव्या लागणार ? आणि तिच्याकडे एक स्त्री म्हणून न पाहता एक माणूस म्हणून आम्ही कधी बघणार ? ती काय पणाला लावण्याची वस्तू आहे ? भोगदासी आहे ? पत्नी असली तर ती नवऱ्याची संपत्ती आहे का की खुशाल त्याने काहीही मनात आणावं आणि तिला पणाला लावावं ? मुस्लिम समाजात असणारी तीन तलाकची प्रथा या असल्याच पुरुषी अहंकारातून आलेली होती. ती हद्दपार करण्यासाठी कायदा करावा लागला. आणि तो कायदा करण्यासाठी सरकारला अनेक दिव्यातून जावं लागलं.
जसा युधिष्ठिराने पांचालीवर आपली पत्नी म्हणून अधिकार गाजवला, तसा जर पुरुषाचा आपल्या बायकोवर पत्नी म्हणून अधिकार असेल, तर तिचाही पत्नी म्हणून आपल्या नवऱ्यावर आणि त्याच्या सगळ्या संपत्तीवर तेवढाच अधिकार असतो आणि असला पाहिजे. आणि मुळात जेव्हा लग्न होऊन हे दोन जीव एकत्र येतात, आणि पती पत्नीच्या नात्यात बांधले जातात, तेव्हा एकमेकांवर कोणाचा अधिकार नसतो. अधिकार असलाच तर तो आता फक्त आणि फक्त प्रेमाचा असतो. प्रेम द्यावं आणि घ्यावं. त्यामध्ये व्यवहार, नफा तोटा, खरेदी विक्री या गोष्टी नाही बसत. सुख दुःख, यश अपयश, संसारातील संकटे आणि आनंदाचे प्रसंग या सगळ्यात ते एकमेकांचे जोडीदार असतात. त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचे असते. हे सगळं जेव्हा आम्ही समजून घेऊ ना तेव्हा द्रौपदीने जे प्रश्न केले आहेत त्यांचे उत्तर देण्याची फक्त सुरुवात आम्ही केली असे म्हणता येईल.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा