उगवतीचे रंग
जुने जाऊ द्या मरणालागुनी...
' जुने जाऊ द्या मरणालागुनी... ' ही ओळ केशवसुतांच्या तुतारी या कवितेतली. नवनिर्माण करायचे असेल तर जुन्याला निरोप द्या असा या कवितेचा भावार्थ. आज या लेखातून मी पण आपल्यला नव्याची आराधना करताना जुन्याला निरोप द्या असेच सांगणार आहे. पण ही नव्याची आराधना करायची म्हणजे नेमके काय करायचे आणि जुने टाकून द्या म्हणजे नेमके काय टाकून द्यायचे हे आपल्याला लक्षपूर्वक समजून घ्यावे लागेल. आजचा विषय थोडा गंभीर आणि वेगळा आहे.
आपल्या भोवतालच्या सृष्टीत नित्य नवे बदल होत असतात. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन होत असते. जुने नष्ट होत असते. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. आपल्या भोवतीची झाडं बघा. जुनी पालवी टाकून नवी धारण करीत असतात. जसजसे त्या पानांचे वय होत जाते, तसतसे ते एकेक करून गळून पडतात. त्या जागी नवीन पालवी फुटते. झाडांना रोज नवीन कळ्या , फुले, फळे येतात. रोज आपल्याला बदल बघायला मिळेल. जे काल पाहिले ते आज दिसणार नाही. जे आज आपण पाहतो आहोत ते उद्या दिसणार नाही. म्हणूनच जेव्हा जुने जाते तेव्हा नव्या गोष्टींना संधी मिळते. आणि हे सगळे बदल होतात, रोज आपल्याला नवीन बघायला मिळते, त्यामुळे जीवनात आनंद आहे, मौज आहे. कल्पना करा की जर असे बदल सभोवतालच्या निसर्गात झाले नसते, तर आपले जीवन किती रुक्ष, रटाळ आणि कंटाळवाणे झाले असते.
अगदी आपल्या शरीराकडे बघा. आपले शरीर सुद्धा जे काल होते, ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. कारण आपले शरीर हा सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे. आणि वैद्यक शास्त्र असे सांगते की दररोज आपल्या शरीरात लाखो नवीन पेशी निर्माण होत असतात. जुन्या पेशी मृत होतात. अशा रीतीने आपले शरीर, त्यातल्या पेशींच्या रूपाने स्वतःला बदलत असते. पण आज आपल्याला जे नवेपण हवे आहे, ते शरीराबरोबरच मनाचे सुद्धा. त्या बद्दलच मी बोलतो आहे.
आपल्या मनावर बालपणापासूनचे संस्कार झालेले असतात. ज्ञानाचा भडीमार झालेला असतो. त्यात आपले स्वतःचे असे काही नसते. माणूस जन्माला आल्यापासून समाजाचा एक भाग होतो. समाज जे सांगेल, ते तो आत्मसात करत जातो. आणि समाजरूपी यंत्राचा एक भाग होतो. एखादे मोठे यंत्र आणि त्याचे छोटे छोटे भाग. ते यंत्र जसे फिरेल, तसे त्या यंत्राचे छोटे छोटे भाग फिरत असतात. त्यांना फिरावेच लागते. चॉईस नसतो. तसेच आपणही या समाजरूपी यंत्राचा एक भाग होऊन गेलेलो असतो. त्याच्या बरोबरच फिरत असतो. आणि त्यात धन्यताही मानत असतो. पण ' स्व ' ला विसरलेलो असतो. सगळी गडबड होते ती इथे.
आतापर्यंत आपण जे काही ज्ञान आत्मसात केलेले असते ते असते बाहेरून आलेले. ते असते रेडिमेड. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर सेकंड हॅन्ड. आता मी या ठिकाणी जे बोलतो आहे, ते आपण शिकतो त्या पुस्तकी ज्ञानाबद्दल नव्हे. तर एक मनुष्य म्हणून स्वतःची जी उन्नती करून घ्यायची आहे, त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान. हे ज्ञान बाहेरून मिळवता येत नाही. ते स्वतःच मिळवावे लागते. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असावी लागते. एखाद्या गोष्टीची तुम्ही स्वतः जोपर्यंत अनुभूती घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन ज्ञान मिळणार नाही. संतांच्या उपदेशातील ' एक तरी ओवी अनुभवावी ' असे जे म्हटले जाते, त्याचा मतितार्थ हाच आहे.
माझ्या कालच्या लेखात अमेरिकेतील वनस्पती शास्त्रज्ञ ल्युथर बरबँक याच्याबद्दल मी लिहिले होते. त्याने जे ज्ञान मिळवले, ती त्याची स्वतःची अनुभूती आहे. फर्स्ट हॅन्ड नॉलेज आहे. पूर्वी आपल्याकडील ऋषीमुनींना देखील वनस्पतीचे अगाध ज्ञान होते. पूर्वी तर आजच्या सारखी आधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा नव्हत्या. मग हे ज्ञान त्यांनी कसे मिळवले ? तर ध्यानातून. चिंतनातून. गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, भगवान महावीर या सारख्या सगळ्या संतांनी स्वतःच्या अनुभूतीतूनच ज्ञान प्राप्त केले आहे. ही सगळी मंडळी आपल्याला ज्ञानाचा मार्ग, दिशा भलेही दाखवतील. पण त्या मार्गावर वाटचाल स्वतःलाच करावी लागणार आहे. अनुभूती स्वतःच घ्यावी लागणार आहे. आणि ही गोष्ट सोपी नाही. सांगणे सोपे पण आचरणे महाकठीण.
आपण आजपर्यंत प्राप्त केलेले जे ज्ञान आहे, ते रोजच्या व्यवहारात आपल्याला भलेही उपयोगी पडेल. पण मी या ठिकाणी रोजच्या व्यवहाराबद्दल नाही बोलत . मी बोलतोय ते आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी . त्या क्षेत्रातील प्रगतीसाठी आपण आतापर्यंत मिळवलेले ज्ञान, जुन्या सगळ्या गोष्टी टाकून द्याव्या लागतील. आपले मन या जुन्या माहितीने भरलेले असते. आणि त्याला आपण फार चिकटून राहतो. त्याला आपण ज्ञान म्हणतो. पण ते कदाचित जुने आणि शिळे झालेले असू शकते. आणि जीवन तर नित्य नवीन आहे. परमात्मा नित्य नवीन आहे. त्याला जाणून घेण्यासाठी हे जुने ज्ञान, जुनी माहिती कुचकामी ठरते. आपल्याजवळ जे काही साठले आहे, त्याला आपण भलेही ज्ञान म्हणा, पण तो एक मृतवत माहितीचा साठा असतो. साठलेल्या पाण्याला जीवन नाही म्हणता येत. ते डबके असते. साचलेल्या पाण्याचे. आणि आरोग्याला घातकही . वाहते पाणी जीवन असते. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात आपल्याकडील धरणे कोरडी होतात. किंवा त्यातील पाण्याचा साठा अल्प असतो. त्यात नवीन पाणी जास्त साठत नाही. त्याचे कारण म्हणजे वर्षानुवर्षे त्यात होत जाणारी गाळाची भर. कधीतरी हा गाळ काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा कुठे त्या धरणातील पाण्याच्या साठवण क्षेत्रात वाढ होते.
असाच हा गाळ आपल्या मनातही साठून राहिलेला असतो. आपल्याला जर माणूस म्हणून स्वतःला जाणून घ्यायचे असेल तर मनातला सगळा कचरा काढून टाकावा लागेल. तरच त्यात आत्म्याचे निर्मळ प्रतिबिंब आपल्याला दिसू शकेल. आणि त्यासाठी ध्यानमार्गाकडे आपल्याला वळावे लागेल. आपल्याला मनःशांती हवी असेल तर ध्यानाला पर्याय नाही. या संदर्भात आणखी काही पुढील लेखात.
( संदर्भ- ओशोंची प्रवचने )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा