*उगवतीचे रंग*
*दीनांचा कैवारी ...*
आपल्यापैकी पुष्कळांनी डॉ अभिजित सोनवणे यांचं नाव ऐकलं असेल. ते पुण्यात भिक्षेकऱ्यांचा डॉ म्हणून प्रसिद्ध आहेत. मी पुण्यात गेलो तेव्हा त्यांना आवर्जून भेटलो. आणि माझ्या परीने यथाशक्ती मदतही त्यांना दिली. आज उगवतीचे रंग या सदरात या जगावेगळ्या माणसाची माहिती तुमच्यापर्यंत माझ्यापरीने पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. या माणसाने अनेक भिक्षेकऱ्यांना अक्षरशः पायावर उभं केलं. त्यांना उद्योगाला लावलं. त्यांच्यातला माणूस जागा केला. पण त्यांचा हा इथपर्यंत झालेला प्रवास सोपा नाही. प्रचंड मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटातून त्यांना जावं लागलं. समाजाची उपेक्षा, हेटाळणी सहन करावी लागली. परंतु ' की न घेतले हे व्रत अंधतेने ' असे जाणून बुजून हे कठीण व्रत स्वीकारणाऱ्या आणि ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून निभावणाऱ्या एका ध्येयवादी तरुणाची ही कहाणी. विचार करायला लावणारी आणि तितकीच प्रेरणादायी.
म्हसवड ता. माण जि सातारा हे त्यांचं मूळ गाव. डॉ अभिजित हे १९९८-९९ मध्ये डॉ झाले. घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तशातच लग्न होऊन पत्नीची जबाबदारी पण खांद्यावर पडलेली. खडकवासला जवळ अगळंबे गावी त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. पण प्रॅक्टिस चालेना. त्यांच्याकडे रुग्ण म्हणून यायला कोणीही तयार नव्हतं. कारण साधं राहणीमान. कुठल्याही अंगानं डॉ न वाटणारा हा साधा माणूस. अगदी पाच रुपये फी देखील कोणी द्यायला तयार होईना. शेवटी त्या गावाच्या सरपंच्यानं सल्ला दिला की लोक तुमच्याकडे येत नाहीत, तर तुम्ही लोकांच्या घरी जा. त्यांच्यावर उपचार करा. पण तरीही लोक डॉ अभिजित यांना डॉ म्हणून स्वीकारायला तयार होईना. ते अत्यंत निराश झाले.
गावाबाहेर एक मंदिर होतं . त्या मंदिरात येऊन बसू लागले. निराशेचे विचार मनात गर्दी करू लागले. त्या मंदिराच्या बाहेर एक ७०/८० वय असलेलं भिकारी जोडपं बसायचं. त्यांच्याशी ओळख झाली. ते डॉ अभिजीत यांना मुलासारखं वागवू लागले. त्यांना जेव्हा डॉ अभिजित यांचे निराशाजनक विचार कळले तेव्हा त्यांनी या डॉ चा ब्रेनवॉश केला. त्यांनी सांगितलं की पोरा , अरे आपलं आयुष्य म्हणजे तीन पानांचं असतं. पहिलं पान म्हणजे जन्म, दुसरं पान म्हणजे मृत्यू आणि या दरम्यानचं तिसरं पान म्हणजे आपलं आयुष्य. ते खूप मौल्यवान असतं. ते असं निराशेच्या गर्तेत उधळून द्यायचं नसतं. आपल्याला झोप येत नाही म्हणून आपण करतो ते जागरण आणि मला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे, या विचारानं जो जागतो , त्याला जागृती म्हणतात. या जागरणापासून तर जागृती पर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. आपल्या असण्याची कोणाला तरी जाणीव असणं म्हणजे आयुष्य आणि आपल्या नसण्याची कोणाला तरी उणीव भासणं म्हणजे आयुष्य हे जीवनाचं सत्य या गरीब भिक्षेकऱ्यांनी डॉ अभिजीतला शिकवलं.
आता डॉ अभिजित यांचा दिवस तिथेच बसण्यात जाऊ लागला. बऱ्याचदा त्यांना काही खायला नसायचं. त्या भिकारी जोडप्याला लोक शिळं, खराब, नासकं अन्न लोक द्यायचे. ते त्यातलं चांगलं अन्न बाजूला काढून ठेवून डॉ अभिजीतला द्यायचे. तेही ते अन्न खायचे आणि पत्नीसाठी पण कधी कधी घेऊन जायचे. कारण भुकेला लाज नसते. कितीतरी वेळा त्यांना मिळालेले पैसे ते औषधे घेण्यासाठी डॉ अभिजीतच्या खिशात टाकायचे. हळूहळू डॉ अभिजीतचे नकारात्मक विचार या भिक्षेकरी जोडप्यामुळे सकारात्मक विचारात बदलले.
याच दरम्यान त्यांना नोकरीची एक छान संधी चालून आली. ' आयपास 'या आंतरराष्ट्रीय संघटनेत त्यांची महाराष्ट्राच्या हॉस्पिटलचा क्वालिटी कंट्रोल हेड म्हणून निवड झाली . आता त्यांना चार लाख रुपये पगार मिळू लागला. त्यांनी काही दिवस हे काम केले. पण वर मी जे आयुष्य म्हणजे जागरणापासून जागृती पर्यंतचा प्रवास असे म्हटले आहे, ती जागृती त्यांना स्वस्थ बसू द्यायला तयार नव्हती. ज्या माणसांमुळे आपण इथपर्यंत आलो, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल ? त्यांना काय भिकारीच राहू द्यायचे का या विचाराने त्यांना पछाडले. आणि २०१५ मध्ये त्यांनी आपल्या या सोन्यासारख्या नोकरीवर लाथ मारली आणि ते पुन्हा रस्त्यावर आले. पण यावेळी चांगल्या अर्थाने, चांगल्या हेतूने आणि दृढ निश्चयाने. भिक्षेकऱ्यांना आपल्या पायावर उभं करायचं हे मनात ठरलं होतं . ' बेगर टू आंत्रप्रिन्युअर ', म्हणजेच भिक्षेकरी ते उद्योजक अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली . आणि त्या दृष्टीनं ते कामाला लागले.
आता दिवसाचा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ ते या भिक्षेकऱ्यातच घालवू लागले. त्यांना मोफत औषधोपचार करू लागले. या सगळ्या गोष्टीत त्यांची पत्नी डॉ मनीषा हिची साथ त्यांना लाभली. तिथेच जेवणखाण करू लागले. या भिक्षेकऱ्यांशी त्यांनी नाती जोडली. ही सुद्धा नाती रक्तापलीकडची होती. कोणी त्यांची आई, कोणी आजी, कोणी मावशी, कोणी बाबा, कोणी भाऊ अशी सगळी नाती निर्माण झाली. या सगळ्या भिक्षेकऱ्यांना कामधंद्याला लावणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलावी लागणार होती. त्यासाठी डॉ नी भावनिक आधार घेतला. एखाद्या आईला ते म्हणायचे, ' तू मला मुलगा मानतेस ना..? मग माझी आई अशी भीक मागताना चांगलं वाटेल का मला ? आणि तुला हे मान्य नसेल तर मी जातो. ' असं भावनिक आवाहन केल्यानंतर ही माणसं गहिवरायाची . ती म्हणायची , ' लेकरा, आता नको रे सोडून जाऊस. ' मग अशा वेळी मी त्यांना जवळ घेतो. त्यांचा हात हातात घेतो. आणि त्या हातांना काहीतरी काम देतो. माझ्यासाठी तो क्षण महत्वाचा असतो. आज असे 40 आजीआजोबा आणि10 ते 12 युवक त्यांच्या प्रेरणेतून काहीतरी काम करून सन्मानानं जगत आहेत.
असेच एक आजोबा. व्यवसायानं नाभिक होते. पण मुलांनी घरातून काढून दिलं . भीक मागण्याची वेळ आली . त्यांना डॉ नी आधुनिक हजामतीचं साहित्य घेऊन दिलं . उभारी दिली. आज त्यांच्याकडे दाढी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. ही माणसं परिस्थतीच्या रेट्यामुळं भिकारी झालेली असतात. त्यांना खरं म्हणजे प्रेम, माया हवी असते. अशाच एका आजोबांची हृदयद्रावक कहाणी त्यांनी सांगितली. ते आजोबा हमाल होते. एकच मुलगी होती त्यांना. त्यांनी हमाली करून त्या मुलीला शिकवलं. आय टी इंजिनिअर बनवलं. ते तिला लाडानं चिमणी म्हणायचे. पुढे या आजोबाना कुष्ठरोग झाला. तसं त्या मुलीनं बापाला टाकून दिलं . बापाची ओळख टाकून दिली. एका मुलाशी लग्न करून ती परदेशात निघून गेली. तिनं आपल्या नवऱ्याला आपल्याला वडील आहेत हे देखील सांगितलं नाही. ते आजोबा नेहमी डॉ अभिजीतला म्हणायचे, ' माझ्या चिमणीकडे जात येईल का हो आपल्याला ? ' कुठलंही विमान आकाशातून गेलं की ते त्या विमानाकडे बघायचे. त्यांना वाटायचं ' माझी चिमणी तर आली नसेल ? ' पण चिमणी भुर्रकन उडून गेली होती. पुन्हा परत न येण्यासाठी. एक दिवस त्या आजोबांनी आकाशाकडे पाहतच प्राण सोडले. असेच एक दुसरे आजोबा. स्वतःला कमी दिसत होते. पायाने पांगळे . पण एके दिवशी उकिरड्यावर एक मूल रडताना दिसलं. त्याला उचलून ते घेऊन आले आणि त्याचा सांभाळ करू लागले. दिसत नव्हतं म्हणून डॉ अभिजीतच्या मागे लागून त्यांनी आपल्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घेतलं. आता त्यांना चांगलं दिसू लागलं होतं . एक दिवस डॉ ला म्हणाले, ' मला माझे डोळे काढायचेत. ' डॉ नी विचारलं कशासाठी ? आता तर तुम्हाला चांगलं दिसायला लागलं आहे. ते म्हणाले, ' मी आणलेला तो पोरगा अंध आहे. त्याला माझे डोळे देता येतील का ? ' केवढा त्याग, केवढं समर्पण ? आपल्याला भिकारी आणि सामान्य वाटणारी माणसं प्रत्यक्षात किती महान असू शकतात, त्याचं हे जितंजागतं उदाहरण.
डॉ अभिजित म्हणतात, ' रस्त्यावरची कुत्री मांजरं सुद्धा एकमेकांना चाटतात. एकमेकांवर प्रेम करतात. आणि आपण आपल्याच घरातील आजारी, वयोवृद्ध लोकांचा हातसुद्धा हातात घ्यायला लाजतो. मला तुम्हाला मदत करावी अशी इच्छा असेल तर तीनच गोष्टी करा. पहिली म्हणजे कोणत्याही भिकाऱ्याला भीक देऊ नका. त्याच्याशी संवाद साधा. त्यांना तुम्ही माणसं आहात हे पटवून द्या. जमल्यास भीक मागण्यापासून परावृत्त करा. त्यापुढची पायरी म्हणजे त्याला काही काम देता आलं तर द्या. त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करा. आणि तिसरं म्हणजे मला आशीर्वाद द्या की माझं हे काम बंद पडावं . समाजात भिकारी म्हणून कोणी शिल्लक राहू नये. बाबा आमटेंनी ज्या प्रमाणे कुष्ठरोग्यांना त्यांच्यातील ' स्व ' ची जाणीव करून दिली, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. आनंदवन निर्माण केलं. तेच काम आज डॉ अभिजित सोनवणे करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम .
©️ *विश्वास देशपांडे,* *चाळीसगाव.*
*९४०३७४९९३२*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा