मुख्य सामग्रीवर वगळा

कृतार्थ मी ...

उगवतीचे रंग 

कृतार्थ मी ... 

काल जागतिक पुस्तक दिवस होता. आणि योगायोगाने माझा वाढदिवसही . आणि कालचा हा वाढदिवस मी कधी कधी नव्हे इतक्या आनंदात साजरा केला. कालचा माझा वाढदिवस आणि जागतिक पुस्तक दिन हा दुग्धशर्करा योग म्हटलं तर त्यामध्ये दुधाचा मसाला, ज्यामध्ये मौल्यवान केशर आदी वस्तू आहेत, ते मिसळलं तुम्ही वाचकांनी. काल खूप मित्र, नातेवाईकांचे फोन आले. त्याहून जास्त फोन आले माझ्या वाचक मित्रांचे. मेसेजला तर सीमाच नव्हती. वाचक मित्रांनी किती प्रेम करावं माझ्यावर... ! म्हणूनच आजचा लेख तुमच्या प्रेमाची उतराई होण्यासाठी. तुमचं ऋण व्यक्त करण्यासाठी. त्यानं मी कृतार्थ झालो. म्हणून कृतार्थ मी..!

अनेक वाचकांनी माझे लेख त्यांच्या मित्रांना पाठवले. ते त्यांनी दुसऱ्यांना पाठवले. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. अनेकांनी लेख आवडल्याचे फोन करून कळवले. खूप जणांनी ही लेखमाला सुरूच ठेवा असा आग्रह धरला. काहींनी काही मौलिक सूचना केल्या. या निमित्ताने मला खूप नवीन मित्र मिळाले. अगदी सर्वसामान्यांपासून तर उच्चपदस्थांपर्यंत.या सगळ्यांमुळे मी श्रीमंत झालो. ही श्रीमंती पैशात मोजता येणारी नाही. याची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही. या श्रीमंतीमुळे जिकडे जातो तिकडे ' माझी भावंडे आहेत ' हा साक्षात्कार मला झाला.  या मैत्रीच्या श्रीमंतीने  जातपात, स्त्री पुरुष, लहानमोठा आदी सगळी बंधने गळून पडली. एकच बंधन राहिले. एकच सूत्र राहिले. ते म्हणजे माणुसकीचे. जसा हार करताना एका धाग्यात सगळी फुलं गुंफली जातात, तशी या माणुसकीच्या धाग्यात सगळी विविधरंगी फुलं ओवली गेली. आणि तो विविधरंगी हार मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने साहित्य शारदेला  अर्पण केला.

काही वाचकांनी उगवतीचे रंग या नावाने ग्रुप सुरु केला. काही वाचकांनी तर माझ्या लेखांच्या ऑडिओ ध्वनिफिती तयार करून इतरांना पाठवल्या. आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया देखील माझ्यापर्यंत पोहोचवल्या. नाशिकच्या एका निकम आजींनी तर माझे लेख हाताने एका वहीत लिहून काढले. मला त्यांचा फोन आला, तेव्हा मी त्यांना म्हटले की आजी एवढे लिहिण्याचे कष्ट घेऊ नका. मी त्याचे पुस्तक झाले की तुम्हाला पाठवीन. किंवा प्रिंटही देईन. काल  माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या आजींनी फोन करून मला भरभरून शुभेच्छा दिल्या. मला सांगा यापेक्षा मौल्यवान काही असेल का ? एका वाचक भगिनीने आपल्या घरी केक बनवला. आणि म्हटले सर आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करतो आहोत.

मी मनाशी विचार करायला लागलो की मी एवढं काय केलं की ज्यामुळे माझ्या वाचकांनी माझ्यावर एवढं भरभरून प्रेम करावं ? फक्त मी माझ्या मनाशी आणि माझ्या वाचकांशी एक अलिखित करार केला होता. तो म्हणजे मी रोज काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करीन. हा अलिखित करार हा माझ्या आताच्या उगवतीचे रंग या सदरातच मी पाळला असे नाही. माझी या आधीची दोन पुस्तके देखील याची साक्ष देतील. त्या पुस्तकातील प्रत्येक लेख नवीन विषयावर आहे. अगदी ' उगवतीचे  रंग ' सारखा.

या लेखमालेला ' उगवतीचे रंग ' असं नाव का दिलं असं माझ्या एका वाचक भगिनीनेच विचारलं. तर उगवती म्हणजे पूर्व दिशा. पहाटेच्या वेळी या पूर्व दिशेचे रंग हे विलोभनीय असतात. आकर्षक आणि मनमोहक असतात. रंगांच्या विविध छटा त्यात असतात. ही सकाळ आपल्याला उल्हसित करणारी असते. ते पूर्वेच्या कॅनव्हॉसवर निसर्गाने भरलेले रंग पाहिले की आपला दिवस कसा प्रसन्न जातो. उदासी, खिन्नता लोपते. प्रसन्नतेचे दव आपल्या मनावर मधुर शिडकावा करते. त्या प्रसन्न पहाटेसारखेच वाचकांना आनंद देणारे आणि विविध रंगछटा असलेले लेख द्यावेत ही माझी आंतरिक इच्छा. म्हणून या सदराचे नाव ठेवले उगवतीचे रंग. त्यामुळे माझ्या कोणत्याही लेखात आपल्याला दुःखाचा, निराशेचा सूर कधी आढळणार नाही. सगळे लेख सकारत्मक संदेश देणारेच असतील.

मला कधी कधी असंही वाटतं की पूर्वीच्या लेखकांपेक्षा मी भाग्यवान आहे. ते या अर्थाने की त्या पूर्वीच्या लेखकांना आजच्या सारखं सोशल मीडियाचं माध्यम उपलब्ध नव्हतं. त्यामुळे वाचकांच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षही जावे लागत. पण आज या आधुनिक माध्यमांमुळे मी रोज तुमच्याशी संवाद साधू शकतो आहे. तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. मग अजून काय हवं ? मी काही वर्तमानपत्रांच्या संपादकांना माझं एखादं दैनंदिन सदर सुरु करता येईल का म्हणून विनंती केली होती. पण त्यांनी सांगितले की त्यांचे लेखकांशी वर्षभराचे करार झालेले असतात. त्यामुळे आम्हाला तुमचे लेख घेता येणार नाहीत.  पण तुम्ही माझ्या वाचकांनी माझ्या लेखांना भरभरून प्रतिसाद दिला. लेख तरी एखाद्याच वर्तमानपत्रात आले असते. पण या लेखमालेमुळे आणि तुमच्या प्रेमळ प्रतिसादामुळे मी घराघरात पोहचू शकलो. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा अतिशय ऋणी आहे. आपल्या प्रेमाने मी श्रीमंत आहे, कृतार्थ आहे. असंच आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावर राहू द्या. म्हणतात ना, जो दुसऱ्यांना फुलं वाटतो, त्याच्या हातांना आपोआप सुगंध प्राप्त होतो. तसा सुगंध आपल्यामुळे माझ्या हातांना येतो आहे, हे मी माझे भाग्य समजतो. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
        ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...