मुख्य सामग्रीवर वगळा

तेजोनिधी भगवान परशुराम

उगवतीचे रंग

तेजोनिधी भगवान परशुराम

आज भगवान परशुराम यांची जयंती आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अद्वितीय संगम म्हणजे परशुराम. परशुराम हे भृगु कुळातील जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र. ते वेदात पारंगत तर होतेच, पण शस्त्र आणि अस्त्रविद्येतही त्यांचा हात धरू शकेल असा त्या काळी संपूर्ण भारतवर्षात कोणी नव्हता. परशुरामांना विष्णूचा सहावा अवतार मानले जाते. ते शंकराचे निस्सीम भक्त होते. भगवान शंकरांकडूनच त्यांना आशीर्वाद स्वरूपात परशूची प्राप्ती झाली होती. म्हणून आपल्या मात्यापित्यांचा अत्यंत आज्ञाधारक असलेला हा राम परशुराम म्हणून ओळखला जाऊ लागला. आज महापुरुषांना जातीत अडकवून ठेवून आपण त्यांचे कर्तृत्व सीमित करण्याचा प्रयत्न करतो. भगवान परशुराम ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असले तरी त्यांचे जीवनकार्य सर्वांनी समजून घ्यावे अशा प्रकारचे अत्यंत प्रेरणादायी आणि बोधप्रद आहे.  

परशुरामांवर दोन आक्षेप घेतले जातात.  आधी त्यांच्याकडे वळू या. त्यांच्यावर घेतला जाणारा पहिला आक्षेप हा आहे की त्यांनी वडिलांच्या आज्ञेवरून का होईना पण आपल्या आईचा वध केला. आणि मातृहत्येचे अक्षम्य पाप केले. आणि त्यांच्यावरील दुसरा आरोप हा आहे की त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली.

परशुरामांचे वडील म्हणजे जमदग्नी ऋषी हे अत्यंत तपस्वी, शूर आणि बुद्धिमान होते. ते जन्माने ब्राम्हण. तर त्यांची पत्नी रेणुका ही एक राजकन्या आणि क्षत्रिय कुळातली. तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांनी स्वयंवर मांडले होते. त्या वेळी इतर राजांबरोबरोच जमदग्नी उपस्थित होते. त्यावेळी जमदग्नी यांचे तेजस्वी रूप पाहून साहजिकच रेणुकेने त्यांच्या गळ्यात माळ घातली.

पुढे रेणुका जमदग्नी ऋषींसोबत आश्रमात राहू लागल्यानंतर एक दिवशी ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली. त्या ठिकाणी चित्रानंद राजा आपल्या स्त्रियांसह क्रीडा करीत होता. ते पाहून साहजिकच राजवैभवात वाढलेल्या रेणुकेला त्याचे आकर्षण वाटले व तिथे ती क्रीडा बघत थांबली. महर्षी जमदग्नी यांनी हे अंतर्ज्ञानाने जाणले.

ते अत्यंत शीघ्रकोपी होते. त्यांनी आपल्या मुलांना तात्काळ रेणुकेचा म्हणजे त्यांच्या आईचा वध करण्याची आज्ञा दिली. पण मातृहत्येचे पाप लागेल म्हणून त्यांच्या चार मुलांनी ती आज्ञा नाकारली. जमदग्नी ऋषींनी संतापून त्या चारही मुलांना ठार केले. पाचवा मुलगा परशुराम. त्यालाही त्यांनी तीच आज्ञा दिली. जणू त्यांनी एक प्रकारे त्यांची परीक्षाच पाहिली.

परशुरामाने वडिलांच्या आज्ञावरून आपल्या आईची हत्या केली. त्यामुळे संतुष्ट झालेल्या जमदग्नींनी परशुरामाला तू चिरंजीव होशील असा वर दिला. तसेच आपली आज्ञा पाळली म्हणून त्यांनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. परशुरामांनी त्यांना आपल्या आईला तसेच भावंडांना जिवंत करण्यास सांगितले. तसेच त्यांना आधीच्या गोष्टीची कुठलीही आठवण राहू नये असा वरही मागितला. अशा रीतीने परशुरामांनी पुन्हा आपल्या आईला आणि भावंडांना जिवंत केले. यात त्यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि प्रसंगावधान दिसून येते.

पण या प्रसंगाकडे दुसऱ्या दृष्टीने पण पाहता येते. असे म्हणतात की संतापलेल्या जमदग्निंनी रेणुकेला ' चालती हो ' अशी आज्ञा दिली. ती मग वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. तिची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर परशुरामांनी तिला पुन्हा घरी आणले. अशा रितीने ती शुद्ध झाल्यानंतर जणू तिचा पुनर्जन्म झाला. नंतर या तपश्चर्येने शुद्ध झालेल्या रेणुकेसोबत जमदग्नी ऋषींनी उर्वरित आयुष्य घालवले. भगवान परशुराम अत्यंत पराक्रमी आणि शीघ्रकोपी सुद्धा होते. एकदा ते भगवान शंकरांना भेटायला गेले असताना गणपतीने त्यांना अडवले. त्यावेळी त्यांनी क्रोधीत होऊन श्रीगणेशाचा एक दात तोडला अशी कथा आहे. तेव्हापासून श्रीगणेशाला एकदंत असे नाव पडले. 

परशुरामांवर दुसरा आरोप हा आहे की त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली.  परंतु या वाक्याचा शब्दश: अर्थ घेणे चुकीचे आहे. त्याचा अर्थ सगळ्या क्षत्रियांशी त्यांचे वैर होते असा नाही. तसे असण्याचे कारणही नाही. त्यांची आई आणि आजोळ हे क्षत्रिय कुळातीलच होते. पण त्या काळात प्रजेवर अन्याय करणारे काही राजे होते. एकदा सहस्त्रार्जुन राजा आपले सैन्य घेऊन महर्षी जमदग्नीच्या आश्रमात आला. महर्षींनी त्याचे उत्तम आगतस्वागत करून आदरातिथ्य केले. महर्षींकडे असलेल्या कामधेनूने राजा आणि सर्व सैन्याला देखील क्षुधा आणि तृषाशांतीचे समाधान दिले. त्या कामधेनूला  पाहून राजाच्या मनात ती गाय नेण्याचा मोह उत्पन्न झाला. त्याने ऋषींकडे तशी मागणी केली. पण त्यांनी जेव्हा ती देण्यास नकार दिला तेव्हा त्याने सैन्यबळाच्या जोरावर त्या कामधेनूचे हरण केले. वनातून परत आलेल्या परशुरामांना ही हकीगत समजली तेव्हा त्यांना सहस्त्रार्जुन राजाशी युद्ध करून त्याचा वध केला आणि कामधेनू परत आणली. पुढे सहस्त्रार्जुन राजाच्या पुत्रांनी जमदग्नी ऋषींची हत्या करून आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेतला. तेव्हा अत्यंत क्रोधीत झालेल्या परशुरामांनी अन्यायी आणि जुलुमी राजांना नष्ट करून न्याय आणि नीतीचे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे ठरवले. 

त्या काळातील काही क्षत्रिय राजे हे समाजाचे कल्याण करायच्या ऐवजी जुलूम करून समाजाला त्रास देऊ लागले, शोषण करू लागले. तेव्हा त्या अन्यायी राजांना वठणीवर आणण्यासाठी परशुरामांना हाती शस्त्र घ्यावे लागले. त्या जुलुमी शासकांना दूर करून त्यांनी त्या ठिकाणी न्यायाची पुनर्स्थापना केली. या सगळ्यात त्यांचा उद्देश चांगली समाजरचना अस्तित्वात यावी हाच होता. त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे जे म्हटले जाते, त्यातही कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही. कारण त्यांच्या एकवीस मोहिमांचे तपशील उपलब्ध होत नाहीत. कारण त्यांचा जीवनकाल हा रामायणाच्याही आधीचा होता. सुमारे सात हजार वर्षांपूर्वीचा.  फक्त आपण त्यातून अर्थ एवढाच घ्यायचा की ज्या ज्या वेळा त्यांना संपूर्ण भारतवर्षात अन्यायी, प्रजेवर जुलूम करणारे शासक दिसले, त्या त्या वेळी त्यांनी आक्रमण करून त्या दुष्ट शक्तींचा निःपात केला.

रामालाही रावणाला आणि दुष्ट वालीला तसेच प्रजेला त्रास देणाऱ्या राक्षसांना मारावेच लागले होते. राम , कृष्ण आणि परशुराम हे विष्णूचे अवतार मानले जातात. त्या तिघांच्याही हातात शस्त्र आहे. त्यांनी आपल्या जीवनातून अन्यायाचा प्रतिकार करण्याचाच संदेश दिला. परशुराम आणि त्यांची आई माता रेणुका यांची भारतात अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. श्रीरामांचा पराक्रम पाहून त्यांचा आदर करून परशुरामांनी त्यांना आपले वैष्णव धनुष्य प्रदान केले. भगवान कृष्णालाही त्यांनी आपले सुदर्शन चक्र प्रदान केले असे म्हटले जाते. श्रीरामांना धनुष्य दिल्यानंतर त्यांनी युद्ध केले नाही. आपले उर्वरित जीवन समाजाची नवनिर्मिती करण्यासाठी घालवले.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात सालेमपूरजवळ सोहनाग येथे परशुरामांचे मंदिर आहे. तेथे अक्षयतृतीयेला यात्रा भरते. तिथे एक मोठे आणि पवित्र असे सरोवर आहे.  नेपाळचा राजा सोहन हा शेकडो वर्षांपूर्वी तिथे तीर्थयात्रेसाठी आला होता. तिथे स्नान केल्यावर त्याचा कुष्ठरोग नष्ट झाला. तेथील उत्खननात त्याला भगवान परशुराम, माता रेणुका, महर्षी जमदग्नी आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती आढळल्या. तेथे त्याने मंदिराची निर्मिती केली. त्याचे नाव सोहन असल्याने या जागेला सोहनाग म्हणून ओळखले जाते. तसेच झारखंडमधील गुमला जिल्ह्यात टांगीनाथ येथे परशुरामांचा परशु आजही पाहायला मिळतो. तो त्रिशुळाच्या आकारात आहे. तेथील स्थानिक भाषेत परशूला टांगी असे म्हटले जाते. म्हणून या ठिकाणाला टांगीनाथ असे नाव पडले. हजारो वर्षांपासून असलेल्या या परशूला आजही गंज चढलेला नाही. परशुरामांना देवभूमी कोकणचे निर्माते म्हणूनही मानले जाते. ते सप्तचिरंजीवातील एक असून आजही त्यांचे या भूतलावर अस्तित्व असल्याचे मानले जाते. 

आजच्या काळातही वरच्या पदांवर असणाऱ्या लोकांचे अध :पतन होताना आपल्याला दिसत आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढतो आहे. भगवान परशुराम तेजस्वी, पराक्रमी, कर्तबगार तर होतेच पण ते कमालीचे निस्पृह होते. आज समाजात किंवा शासनात वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या व्यक्ती या कर्तबगार तर हव्याच पण त्या निर्मोही आणि निस्वार्थी पद्धतीने काम करणाऱ्या हव्या. परशुरामांचे चरित्र हा आदर्श आपल्यापुढे ठेवते.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/०४/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...