उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७७ तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना ढळेना कदा दैन्यवाणा । कळेना कळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जनीं मीपणासी ।।१७७।। अर्थ : मुख्य देव म्हणजे परमेश्वर कधी तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही किंवा ढळत नाही किंवा दैन्यवाणा होत नाही.आपल्या या डोळ्यांनी त्याचे कधीही दर्शन होत नाही. ज्यांच्या अंतरात अहंकाराचा वास आहे त्यांना तर कधी दिसणे शक्य नाही. ( देवराणा - मुख्य देव, चळेना - विचलित होत नाही, ढळेना - जागेवरून हलत नाही, दैन्यवाणा - दीनवाणा, लोचनासी - डोळ्यांना, कळेना - आकलन होत नाही, मीपणासी - अहंकार असणाऱ्याला ) विवेचन या श्लोकातही समर्थ मुख्य देवाबद्दल बोलताना त्याचे स्वरूप नेमके कसे आहे हे सांगतात. पण ते समजून घेण्याआधी समर्थांच्या काळातील परिस्थिती समजून घेऊ या. समर्थांच्या काळात यवनी सत्ता प्रबळ झाली होती. हिंदूंवर अत्याचार होत होते. मंदिरे तोडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या. सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची श्रद्धास्थाने नष्ट होत होती, त्यांची विटंबना होत होती. बाबराने अयोध्येचे मंदिर नष्ट करून तेथे मशीद उभारली...