मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १७३

उगवतीचे रंग

​मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७३

स्वरुपी उदेला अहंकार राहो।

तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥

दिशा पाहतां ते निशा वाढताहे।

विवेके विचारे विवंचुनि पाहे॥ १७३॥

अर्थ : 

मनात जो अहंकाररुपी पापग्रह – राहू जन्म पावला आहे त्याने सारे आकाश व्यापून टाकले आहे. त्यामुळे जिकडे तिकडे अंधाराशिवाय काही दिसत नाही. पण यातून मार्ग काढायचा असेल तर तो विवेकपूर्वक शोधून दूर केला पाहिजे )

( स्वरूपी - आत्मस्वरूप,  उदेला - उदय पावला, राहो - राहू ग्रह, आच्छादिले - व्यापले, व्योम - आकाश, दिशा - चारही बाजूना, निशा - अंधकार/अज्ञान,विवंचुनि- सखोल विचार करून )

विवेचन 

समर्थ अहंकारामुळे काय होऊ शकते हे सांगत असताना पुन्हा पुन्हा विवेकाची महती अधोरेखित करत आहेत. आणि ते योग्यच आहे. तारतम्य, सारासार विचार, विवेकबुध्दी या चाळण्या जर आपण आपल्या प्रत्येक कृतीला लावल्या नाहीत तर आपल्याकडून चुकीचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो. अविवेक हा अहंकारातूनच माणसाच्या मनात उगम पावलेला असतो. ‘मी सर्वज्ञ आहे, मी म्हणतो तेच बरोबर आहे’  हा अहंकार मनात उदयाला आला म्हणजे सारासार विवेक हरवतो. 

या ठिकाणी समर्थांनी सूर्यग्रहणाचे रूपक वापरले आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य राहूमुळे ग्रासला जातो आणि त्यावेळी आकाशात सर्वत्र अंधकार पसरतो. आपले मूळ आत्मस्वरूप स्वयंप्रकाशित आहे पण त्या स्वरूपात अहंकाररुपी राहू उदय पावतो. राहूमुळे एक प्रकारचा अज्ञानाचा पडदा निर्माण होतो. समर्थ अहंकाराला पापग्रह राहू म्हणतात. राहू जसा इतर सर्व ग्रहांना ग्रासत आकाशात वावरत असतो. सूर्य, चंद्रही त्याच्या तावडीतून सुटत नाहीत, तसा हा अहंकार भल्याभल्यांना अविवेकी कृत्ये करणे भाग पाडतो. 

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या गोष्टी राहूने त्यांना गिळल्यामुळे होतात असे पूर्वी मानले जात होते. आज या कल्पना विज्ञानाच्या कसोटीवर भलेही चुकीच्या असल्या तरी ही कल्पना त्या काळी सामान्य जनमानसात घर करून होती. आणि मग ग्रहणकाळात जसा सर्वत्र अंधार होतो  तसा अंधार जीवनात अहंकाररूपी अविवेकाच्या प्रभावाने होतो.  ‘हे बरोबर की ते बरोबर’ यात निवड करणे जमत नाही . आणि चुकीची निवड झाल्याने दु:ख प्राप्त होते. तेव्हा विवेक करावा. आणि त्याच्या मदतीने नीट विचार करूनच निर्णय घ्यावा.

सूर्य म्हणजे प्रकाशाचे प्रतीक आणि राहू म्हणजे अज्ञानाचे प्रतीक. त्याचप्रमाणे आत्मा आणि परमात्मा हे स्वयंप्रकाशित आहेत. त्यांना जाणून घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. परंतु अज्ञानरूपी राहू जेव्हा त्यांना झाकून टाकतो तेव्हा सर्वत्र अंधार पसरतो. चारही दिशा अंधःकाराने भरून जातात. या ठिकाणी राहू हे अज्ञानाचे प्रतीक आहे.

या ठिकाणी समर्थांनी राहूचे वापरलेले रूपक मोठे मार्मिक आहे. राहू हा खरोखरी ग्रह नाही. त्याचे प्रत्यक्ष अस्तित्व नाही. परंतु केवळ कल्पनेच्या सहाय्याने तो आहे असे समजून त्याने ग्रासल्यामुळे सूर्यग्रहण होते अशी कल्पना आहे. म्हणजे प्रत्यक्षात तो जरी दिसत नसला तरी त्याचा परिणाम मात्र दिसतो. त्याचप्रमाणे अहंकार हा प्रत्यक्ष दाखवता येत नाही परंतु त्याचा परिणाम मात्र दिसतो. त्याचप्रमाणे अहंकाराचे देखील अज्ञानाचे प्रतीक आहे. एकदा का माणसाच्या शरीरात, मनात आणि बुद्धीत अहंकार निर्माण झाला की तो माणसाचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा व्यापून टाकतो. परमेश्वर आणि माणूस यामध्ये मग अज्ञानाचा अंधकार पसरतो. 

या सगळ्या गोष्टी केवळ अहंकारामुळे होतात. मला सर्व माहित आहे, मी सगळे जाणतो हा जो आपला समज असतो तो अध्यात्मामध्ये घातक ठरतो. यासाठी शेवटच्या चरणात समर्थ एक त्रिसूत्री सांगतात. ती म्हणजे विवेक, विचार आणि विवंचना. समर्थ म्हणतात की हा अहंकार घालवण्यासाठी विचारांची कास धरली पाहिजे. आपली विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी. मी देह आहे या भावनेचा त्याग करून मी आत्मा आहे ही जाणीव दृढ करायला हवी. तरच परमेश्वर प्राप्तीची ओढ त्याला लागेल आणि अहंकाराचा त्याग करून तो पुढील मार्गावर वाटचाल करू लागेल.

स्वसंवाद 

​१. स्वयंप्रकाशित सूर्याला राहूने ग्रासावे तसा, माझ्या अंतरीच्या आत्मस्वरूपाला आणि सदसद्विवेकबुद्धीला 'मीपणाच्या' अहंकाररूपी राहूने ग्रासले आहे का?

२. "मला सर्व समजते आणि मी म्हणतो तेच बरोबर" या हट्टापायी मी माझ्या जीवनात अज्ञानाचा आणि गैरसमजांचा अंधार (निशा) तर वाढवत नाही ना?

३. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना मी भावनेच्या किंवा अहंकाराच्या आहारी न जाता, सारासार 'विवेक आणि विचाराची' चाळणी लावतो का?

४. देहाचा अहंकार बाजूला सारून "मी देह नसून शुद्ध आत्मतत्त्व आहे" या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी मी अंतर्मुख होतो का?

​( क्रमशः )

​© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२८/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...