मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १७५

उगवतीचे रंग

​मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७५

विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी ।

परी लिहिता कोण त्याचे कपाळी ।

हरू जाळितो लोक संव्हारकाळी ।

परी सेवटी शंकरा कोण जाळी ।।१७५।।

अर्थ : या सृष्टीचा निर्माता जो ब्रह्मदेव आहे, तो सर्व प्राणिमात्रांच्या कपाळी त्यांचे भवितव्य लिहितो. तर मग ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भाग्य कोण लिहितो ? या पृथ्वीचा संहारकर्ता जो शंकर आहे, तो पृथ्वीच्या अंतःकाळी आपला तृतीय नेत्र उघडून सर्व सृष्टी जाळून टाकतो. तर मग प्रत्यक्ष शंकराला कोण जाळू शकतो ?

( विधी - ब्रह्मदेव, निर्मिता - निर्माणकर्ता, भाळी - कपाळावर, हरू - शंकर, संव्हारकाळी - प्रळयकाळी ) 

विवेचन 

१७५ ते १७९ हे पाच श्लोक मुख्य किंवा समर्थांच्या थोरल्या देवाचे स्वरूप समजावून सांगणारे आहेत. या श्लोकामध्ये समर्थांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. खरे तर हे प्रश्न कोणालाही पडावेत असे आहेत. आपल्यापैकी कोणाला ते पडतही असतील. पण आपण बहुधा ते विचारण्याचे धाडस करीत नाही. पण आता इथे तर प्रत्यक्ष समर्थच हे प्रश्न विचारताहेत. त्यावरून त्यांचा नक्कीच काहीतरी सांगण्याचा उद्देश असेल. 

हे जे दृश्य जग आपण पाहतो, त्याच्या तीन अवस्था ठरलेल्या आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय. साधी व्यवहारातील कोणतीही गोष्ट घेतली तरी तिलादेखील या तीन अवस्था लागू होतात. अगदी आपल्या हातात असलेल्या मोबाईलचे उदाहरण आपण घेऊ. प्रथम या मोबाईलच्या शोधाची किंवा त्याच्या निर्मितीची कल्पना कोणाच्या तरी मनात आली. त्यानुसार मोबाईल तयार करण्यात आला. ही झाली निर्मितीची पहिली पायरी. निर्मिती झाल्यानंतर काही वर्षे आपण तो वापरला. तो त्याचा चालू असण्याचा काळ म्हणजे स्थिती. पण एकवेळ अशी येते की काहीतरी बिघाड होऊन मोबाईल बंद पडतो. तो दुरुस्त होत नसेल तेव्हा आपण टाकून देतो. या स्थितीला आपण लय म्हणू या.

आपण राहतो ते विश्व सुद्धा या तिन्ही अवस्थातून जाते. ब्रह्मदेव या सृष्टीचा निर्माणकर्ता. विष्णू पालनकर्ता आणि शंकर संहारकर्ता. म्हणजे प्रत्येकाचं काम, प्रत्येकाची भूमिका ठरलेली. व्यवहारात सुद्धा आपण सोयीसाठी कामाची वाटणी करतो. त्या त्या वेळी ते ते देव त्यांच्यावर सोपवलेली ही जबाबदारी पार पाडतात. असं जर आहे तर मग त्यांना ही जबाबदारी सोपवणारा त्यांच्याही वर कोणी तरी असला पाहिजे. आणि तोच प्रश्न समर्थांनी इथे आपल्याला विचारण्याचे निमित्त करून उपस्थित केला आहे. 

मग खरंच असे देव किंवा तत्त्व आहे का ? तर उत्पत्ती, स्थिती आणि लय या गोष्टी ज्याच्या आधाराने घडतात ते तत्त्व नक्कीच असले पाहिजे. एका ठिकाणी समर्थांनी म्हटले आहे की 

सकळांसी निर्मिता देव । देवासी निर्माता नसे ।

सर्वांसी मूळ तो देव । देवासी मूळ नाडळे ।।

अर्थातच परमतत्त्व किंवा परम ईश्वर म्हणजेच परमेश्वर या सगळ्या गोष्टींचा कर्ता आहे. तो निर्गुण, निराकार आहे. अदृश्य आहे. त्याला कोणतीही उपाधी लागू होत नाही. तो गुणातीत आहे. तो अस्पर्शी आहे. अर्थातच हे परम ईश्वरी तत्त्व सर्व चराचरात व्यापून राहिलेले असूनही आपल्याला दिसत नाही. जाणीव मात्र होत राहते. बऱ्याच वेळा देवांवर संकट आले की ते भगवान शंकर, ब्रह्माजी किंवा विष्णूंकडे जातात असे आपण पुराणात वाचतो. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर, मानवावर संकट आले की परमेश्वराने अवतार घेऊन सर्वांचें रक्षण केले आहे. परंतु त्यांच्यावरही कोणीतरी आणखी असले पाहिजे. त्या तत्त्वाची सत्ता या सर्व देवांवर चालते. त्यालाच समर्थांनी थोरला देव असे म्हटले आहे. तोच परम पिता, परम ईश्वर.

आता या सगळ्या विवेचनावरून असा समज होऊ शकतो की आपण ज्या देवांना भजतो, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे कोणीतरी असून इतर देव हे कनिष्ठ आहेत. परंतु आपण आपल्या मनाचा असा गोंधळ होऊ देता कामा नये. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही विश्वाचे कार्य चालवण्यासाठी केलेली परमेश्वरी व्यवस्था आहे. परंतु ही  सृष्टी, त्यातील सर्व सजीव, निर्जीव घटक त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव या सर्वांमध्ये तेच तत्त्व कार्यरत आहे. 

खरं म्हणजे मूळ शक्ती एकच आहे परंतु ज्यावेळी ज्या गुणांचं वर्चस्व असेल त्या प्रकारची वृत्ती प्रकट होते. जेव्हा रजोगुणाची आवश्यकता असेल तेव्हा विधि म्हणजे ब्रह्मदेवाच्या रूपाने ही शक्ती प्रकट होते. जेव्हा सत्वरूपाची आवश्यकता असेल तेव्हा भगवान विष्णूंच्या रूपाने ही शक्ती प्रकट होते आणि जेव्हा तमोगुणाची आवश्यकता असेल त्यावेळेला भगवान शंकरांच्या रूपाने ही शक्ती प्रकट होते. नंतर त्या शक्ती किंवा त्या देवता मूळ स्वरूपात विलीन होतात. 

आपल्यामध्ये देखील आत्मरूपाने ते परमतत्त्व विद्यमान आहे. त्याचे स्वरूप जाणून घेणे हेच आपल्या जीवनाचे कर्तव्य आहे. हाच समर्थांचा थोरला देव आहे असेही म्हणता येईल. ही जाणीव ठेवून आपण कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपण ज्या देवतेची उपासना करतो, ती श्रद्धापूर्वक सुरू ठेवावी. ' God is one.' हे लक्षात ठेवावे. एका शास्त्रवचनानुसार "आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति ॥" अर्थात ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पाणी सर्व नद्यांच्या माध्यमातून समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणेच सर्व देवांना केलेला नमस्कार किंवा त्यांची उपासना माझ्यापर्यंत पोहोचते. 

स्वसंवाद 

१. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या विविध रूपांची भक्ती करताना, त्या सर्वांच्या मागे असणाऱ्या एकाच 'अविनाशी परमतत्त्वाची' जाणीव मी ठेवतो का?

२. उत्पत्ती, स्थिती आणि लय या जगताच्या नियमांत अडकलेल्या नश्वर गोष्टींपेक्षा, या सर्वांना चालवणाऱ्या 'थोरल्या देवाचा' (मूळ परब्रह्माचा) शोध घेण्याची माझी तयारी आहे का?

३. वेगवेगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून वाद घालण्याऐवजी, "सर्व पूजा एकाच ईश्वरापर्यंत पोहोचतात" या व्यापक भावाने मी साधना करतो का?

४. दासबोधात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वांना निर्माण करणाऱ्या पण स्वतः निर्गुण-निराकार असणाऱ्या त्या परमेश्वराला मी माझ्या स्वतःच्या अंतर्यामी ओळखतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३०/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...