उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६८
करी वृत्ति जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ।
उपाधी देहेबुधिते वाढवीते ।
परी सज्जना केवि बाधू शके ते ।।१६८।।
अर्थ : ज्याची वृत्ती आत्ममय झालेली असते तोच खरा संत होय. त्याच्या मनामध्ये एका भगवंताशिवाय कोणतीही अन्य वासना ( दुराशा ) नसते. त्यामुळे तो कधी लाचार असत नाही. देहबुद्धी वाढवणाऱ्या प्रपंचासारख्या उपाधी त्याला कोणताही त्रास देऊ शकत नाहीत.
( संत - वृत्ती आत्ममय झालेली व्यक्ती, दुराशा - भगवंतावाचून इतर कोणतीही वासना, दैन्यवाणा - लाचार, उपाधि - प्रपंचाचा विस्तार, बाधणे - त्रास देणे )
विवेचन
खरा संत कसा ओळखायचा ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. आपण साधारणपणे ' संत ' हा शब्द रूढ आणि पारंपरिक अर्थाने घेतो. संत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दाढी असलेली, जटा बांधलेली, कपाळावर भस्माचे पट्टे असणारी, भगवे कपडे घातलेली, हातात- गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कमंडलू वगैरे धारण केलेली व्यक्ती येते. पण हे संतांचे बाह्यरूप झाले. अशा सगळ्या गोष्टी नसल्या तरी एखादी व्यक्ती वृत्तीने संत असू शकते. आणि या सगळ्या गोष्टी धारण केलेली व्यक्ती वृत्तीने संत असेलच असेही सांगता येत नाही. संत किंवा संतत्व ही वृत्ती आहे. समर्थ संतांची खूपच सोपी आणि सुंदर व्याख्या आपल्याला सांगतात. ज्याची वृत्ती आत्ममय झाली आहे, ज्याच्या मनात एका परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयांना थारा नाही, अशी व्यक्ती म्हणजे संत.
आजकाल तर बऱ्याच व्यक्ती स्वतःला संत म्हणवून घेताना दिसतात. त्यांचे वागणे, बोलणे वरवर पाहता संतासारखे वाटते. परंतु अंतर्यामी वासनांच्या लाटा उसळत असतात. परमेश्वराचे नाम, भक्ती लोकांना दाखवण्यासाठी असते. पण मनामध्ये प्रसिद्धी, पैसा, शिष्यवर्ग गोळा करणे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या मनातील वासना पुरवून घेणे हा छुपा अजेंडा असतो. ज्याला ' संत ' व्हायचे असेल त्याच्या वृत्तीत बदल व्हायला हवा. संतांच्या मनात एका परमेश्वराशिवाय दुसऱ्या कशाचीही वासना नसते. ते सर्वसामान्यांसारखे प्रपंचात असतात, देहाने कर्म करतात. पण अंतर्यामी ध्यास केवळ एका भगवंताचा असतो. म्हणूनच संसारातील उपाधी, व्याप-ताप त्यांना बाधू शकत नाहीत. आपण मंदिरात जातो तेव्हा देवाच्या मूर्तीपुढे आपल्याला कासव दिसते. संरक्षण करण्यासाठी कासव आपले अंग आत ओढून घेते. त्याप्रमाणे संत, साधू किंवा सज्जन व्यक्ती आपल्या अन्य विषयाकडे असणारी आपली वृत्ती आत वळवतात. त्यामुळे संसारातील व्याप- ताप, मोहमाया या सारखे विकार त्यांना बाधू शकत नाहीत. परमेश्वराच्या नामाने त्यांच्या वृत्ती आत वळलेल्या असतात. वृत्तीत अंतर्बाह्य बदल झालेला असतो. अन्य कोणतीही वासना नसते. ' आता उरलो उपकारापुरता ' अशी त्यांची भावना असते. तुकाराम महाराज म्हणतात,' जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.'
ज्यांच्या अंतरात परमेश्वराखेरीज अन्य वासना ( दुराशा ) असतात, ते आपल्या वासना पूर्तीसाठी लाचार म्हणजे दैन्यवाणे होतात. देहाची सुखदुःखे त्यांना आपली सुखदुःखे वाटतात. देहाचे चोचले पुरवण्यासाठी ते उपाधि म्हणजे प्रपंचाचा विस्तार वाढवत जातात. पैसा, प्रसिद्धी, शिष्यवर्गाचा गोतावळा या सगळ्या गोष्टी म्हणजे उपाधी. या उपाधी शेवटी दुःखच देतात. अशी व्यक्ती परमेश्वरापासून दूर जाते. समर्थ रामदासांसारखे संत अत्यंत निरिच्छ होते. ' आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे.' अशी त्यांची रोखठोक भूमिका होती. संत तुकारामांची कीर्ती ऐकून एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांना उत्तर पाठवताना तुकोबाराय म्हणाले, " तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय । वृथा आहे शीण चालण्याचा."
तेव्हा अशा संतांची देहबुद्धी क्षीण झालेली असते. अहंकार, लोभ, मोह नष्ट झालेले असतात. त्यांची वृत्ती फक्त एका परमेश्वराकडे लागलेली असते. असे संत स्वतःबरोबर समाजाचेही कल्याण साधतात. अशाच संतांना शरण जावे. ते चिरंतन सुखाचा मार्ग आपल्याला दाखवतात. हेच समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद
१. मी संतांना केवळ त्यांच्या बाह्य वेशभूषेवरून (दाढी, जटा, भगवे कपडे) ओळखतो, की त्यांच्या आचरणातील 'आत्ममय वृत्ती' आणि 'निरिच्छता' पाहून नतमस्तक होतो?
२. मंदिरातील कासवाप्रमाणे, संसारातील प्रलोभने आणि विषयांपासून माझी वृत्ती अंतर्मुख (भगवंताकडे) वळवण्याचा सराव मी करतो का?
३. तुकोबाराय आणि समर्थांप्रमाणे, प्रापंचिक लोभ किंवा वासनांपायी कोणापुढेही 'लाचार' (दैन्यवाणा) न होता, ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून मी स्वाभिमानाने जगतो का?
४. प्रपंचाचा पसारा आणि उपाधी वाढवून स्वतःची देहबुद्धी पुष्ट करण्याऐवजी, चित्त शुद्ध ठेवून संतांच्या शिकवणीचा आधार मी घेतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा