उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७४
जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ।
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दया दक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ।।१७४।।
अर्थ : हे जे परमात्मस्वरूप आहे, त्याचे दर्शन साध्या डोळ्यांनी होत नाही. ज्ञानचक्षूने त्याचे दर्शन झाले की हे दृश्य जग त्यात विलीन होते. मग त्याचे रक्षण करू म्हटले तरी ते करता येत नाही. परमात्मा स्वतः अक्षय असल्याने तो अक्षय मोक्ष देणारा आहे. तो दयेस तत्पर असून साक्षीभावाने आपला पक्ष घेतो.
( चक्षु - डोळा, लक्षणे - पाहणे, लक्षवेना - पाहता येत नाही, भव - दृश्य जगत, भक्षिता - भक्षण करणे/खाऊन टाकणे/नाहीसे करणे, क्षयातीत - ज्याचा क्षय किंवा ऱ्हास होत नाही असा, दया दक्ष - दया करण्यास तत्पर असलेला, साक्षीने -साक्षीपणाने, पक्ष घेतो - बाजू घेतो/सांभाळतो )
विवेचन
चिरंतन, अक्षय, अविनाशी अशा परब्रह्म स्वरूपाचे वर्णन समर्थ या श्लोकात करतात. ते करताना समर्थांनी ' क्ष ' अक्षराची पुनरावृत्ती करून अनुप्रास साधला आहे. अशा प्रकारची काव्यरचना करताना काहीशा गूढ भाषेत या श्लोकाची रचना झालेली आपल्याला दिसते. परब्रह्म हे निर्गुण निराकार असल्यामुळे साध्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही. आपल्याला आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने अनुभवता येते किंवा दिसते ते दृश्य जग आहे. किंबहुना हे जग पाहण्यासाठीच आपल्या इंद्रियांची निर्मिती झाली आहे. पण जे अव्यक्त किंवा अदृश्य आहे ते कसे पाहणार किंवा कसे अनुभवणार ? त्यासाठी ज्ञानचक्षुंची आवश्यकता असते. हे ज्ञानचक्षू संतकृपेने किंवा परमेश्वराच्या कृपेने उघडतात.
हे ज्ञानचक्षू उघडणे म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे. असे जेव्हा होते तेव्हा हे दृश्य जग त्यातच विलीन होऊन जाते. मग या दृश्य जगाचे रक्षण करू म्हटले तरी ते शक्य नाही. कारण त्याचे अस्तित्व उरत नाही.' गण गण गणात बोते ' हा शेगावचे श्री गजानन महाराज यांचा सिद्ध मंत्र आहे. त्यातील पहिला गण म्हणजे आपला जीव. दुसरा गण म्हणजे शिव किंवा परमात्मा. गणात म्हणजे हृदयात. म्हणजे हे जीवा, तू स्वतःच्या हृदयात शिवाला म्हणजे परमात्म्याला पहा. हे जीव शिवाचे म्हणजेच आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन जेव्हा होते, तेव्हा हे भव म्हणजे दृश्य जग नाहीसे होते. आद्य शंकराचार्य म्हणाले होते की कोट्यवधी लोकांनी जरी सांगितले की हे जग सत्य आहे, तरी मी ठासून सांगेन की ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा परब्रह्माचे दर्शन होते, तेव्हा अज्ञान नाहीसे होते. आणखी वेगळ्या शब्दात सांगायचं तर असं म्हणता येईल की आत्मदर्शन झाल्याने या भव म्हणजे संसाराचे दोर कापले जातात. भवबंधन तुटते.मोहमायेच्या पसाऱ्यात जो जीव अडकलेला असतो तो मुक्त होतो. असा मुक्त झालेला पुन्हा त्या भवबंधनात अडकत नाही.
हा परमात्मा किंवा परब्रह्म अविनाशी किंवा अक्षय आहे. त्याचे दर्शन ज्याला घडते त्याला अक्षय मोक्ष मिळतो. मोक्ष किंवा मुक्ती याचे चार प्रकार मानले जातात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. यातील पहिल्या तीन क्षय होणाऱ्या म्हणजे नाशिवंत आहेत. सायुज्यमुक्ती मात्र अक्षय आहे. याचाच अर्थ असा की पहिल्या तीन मुक्ती जरी प्राप्त झाल्या तरी पुनर्जन्म अटळ असतोच. परंतु जेव्हा साधक सायुज्यमुक्तीला प्राप्त होतो, तेव्हा ती मुक्ती अक्षय असते. मनुष्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते.
चौथ्या चरणात समर्थांनी परब्रह्माबद्दल बोलताना ते ' दयादक्ष ' आहे असे म्हटले आहे. हा फार सुंदर शब्द समर्थांनी वापरला आहे. परमेश्वर दयेसाठी दक्ष असतो म्हणजे तत्पर असतो. तिथे रोकडी प्रचिती आहे. आपण परमेश्वराकडे जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले तर तो आपल्यासाठी दहा पावले पुढे येतो असे म्हटले जाते. ही त्याची दयाच नाही का ? परमेश्वर आपल्या भक्ताचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करतो. ' नुपेक्षी कदा राम / देव दासाभिमानी ' असे समर्थांनी आधीच्या श्लोकात आपल्याला सांगितलेच आहे. तो आपल्या भक्ताचा पक्ष/ बाजू घेतो. कशी ? तर साक्षीभावाने ! भक्ताकडे त्याचे लक्ष असते. त्याच्या प्रत्येक गोष्टीला तो साक्षी असतो. म्हणून तर त्याला 'सर्वसाक्षी' म्हटले जाते. आपण माणसे पक्षपाती असतो. एखादी व्यक्ती आपली वाटली तर ती चुकीची असली तरी आपण तिची बाजू घेतो. पण भगवंत पक्षपात करणारा नाही. म्हणून तुम्ही जर संपूर्ण समर्पणाने त्याची भक्ती करत असाल तर तुमचा पक्ष तो घेणारच.
स्वसंवाद
१. केवळ बाह्य डोळ्यांनी दिसणाऱ्या नश्वर जगालाच सत्य मानण्याऐवजी, अंतरीचे 'ज्ञानचक्षू' उघडून मी परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो का?
२. श्री गजानन महाराजांच्या 'गण गण गणात बोते' या मंत्राप्रमाणे, स्वतःच्याच हृदयात वसलेल्या शिवस्वरूप परमात्म्याला अनुभवण्याची माझी साधना सुरू आहे का?
३. तात्पुरत्या भौतिक सुखांमागे धावण्याऐवजी, जन्म-मरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता करणाऱ्या 'अक्षय सायुज्यमुक्तीची' आस माझ्या मनात जागी झाली आहे का?
४. ईश्वराच्या दयादक्ष आणि सर्वसाक्षी रूपावर पूर्ण विश्वास ठेवून, मी संशयरहित व संपूर्ण समर्पणाने त्याची भक्ती करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा