मुख्य सामग्रीवर वगळा

नात्यांचं महावस्त्र – भाग अकरा : 'पती-पत्नी'

उगवतीचे रंग

नात्यांचं महावस्त्र – भाग अकरा : 'पती-पत्नी' (संसार रथाची दोन चाके)

'संसार हैं इक नदिया, दुख-सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाएं हम बहते धारे हैं...' जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं हे एक अतिशय सुंदर गाणं! मला नेहमी असं वाटतं की या गाण्यातील दोन किनारे म्हणजे पती आणि पत्नी; जणू संसाररूपी नदीचे दोन भक्कम काठ. संसार नावाची जीवनदायिनी नदी या दोघांमधून वाहत असते. सुख-दुःखाचे एकमेकांचे सोबती असलेले हे किनारे एकमेकांना सदैव सांभाळून घेत असतात. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे, "संसार दोघांचा असतो, दोघांनी आवरायचा असतो; एकजण चुकला तर दुसऱ्याने सावरायचा असतो!" काही काही वाक्ये सहजपणे संपूर्ण जीवनाचं सार सांगून जातात. पण हे तत्त्वज्ञान जोपर्यंत आपल्या अंतरंगात पोहोचत नाही, तोपर्यंत या सुंदर अशा सहजीवनाला प्रेमाचा खरा गोडवा प्राप्त होत नाही.

'नात्यांच्या महावस्त्रा'तील हा असा एक मूलभूत पदर आहे, ज्यामुळे या महावस्त्राला एक देखणी चौकट प्राप्त होते; आणि त्यातूनच महावस्त्रातील पुढची सर्व नाती जोडली जातात. लग्न ठरवून केलेले असो की प्रेमविवाह, लग्नानंतर दोन वेगवेगळ्या घरांत, वातावरणात आणि संस्कारांत वाढलेले दोन स्वतंत्र जीव एकत्र येतात. ते प्रेमाच्या रेशमी धाग्याने असे काही घट्ट बांधले जातात की, नंतर त्यांना एकमेकांशिवाय एक क्षणही करमत नाही! जेव्हा पत्नी चार दिवस माहेरी जाते, तेव्हा पतीच्या मनातील व्याकुळता या शब्दात व्यक्त होते -

"नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो,

जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो..."

लग्नानंतर थोड्याच दिवसांत सुरुवातीचे रम्य आणि मोहक वातावरण ओसरून संसारातील वारा, ऊन आणि पावसाचे वास्तव समोर दिसायला लागते. मग जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात, ज्यावर केवळ एकमेकांच्या भक्कम साथीनेच मात करता येते. मुलांच्या शाळा, त्यांची दुखणी-खुपणी, संसाराची ओढाताण आणि नातेवाईकांकडील सुख-दुःखाचे प्रसंग या सगळ्यांना ते दोघे एकत्र सामोरे जातात. घरात मूल आजारी असेल, तर दोघेही त्याच्या उशाशी रात्र-रात्र जागून काढतात. अशा वेळी पत्नीचे जागरण झाले असेल, तर पती मायेने म्हणतो, "तू थोडं खाऊन घे आणि विश्रांती घे; मी बसतो त्याच्याजवळ." कधी एखाद्या संकटात तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तेव्हा तो विश्वासाने पाठीवर हात ठेवून म्हणतो, "अगं, मी आहे ना... काळजी कशाला करतेस?" आणि त्याच्या एका आश्वासक मिठीत ती स्वतःचे सगळे दुःख विसरून जाते. अशा वेळी पती जर कुटुंबाचा भक्कम आधारवड असेल, तर पत्नी त्या घराला 'घरपण' देणारी मंगलमय नंदादीप असते!

या नात्यात प्रेम जितके महत्त्वाचे, तितकाच आदर आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याची जपणूकही मोलाची असते. 'मी' पणाचा त्याग करून जेव्हा दोघे 'आम्ही' होतात, तेव्हा संसाराचा हा रथ अतिशय सुरळीत चालतो. लहान-सहान भांडणे, रुसवे-फुगवे आणि पुन्हा एका मिश्कील संवादाने सर्व विसरून एकत्र येणे, हीच या नात्याची खरी गोडी असते.

'नटसम्राट' नाटकात मुले जेव्हा आई-वडिलांना घराबाहेर काढतात, तेव्हा अप्पा बेलवलकर आपल्या पत्नीची समजूत घालतात. तिला ते प्रेमाने 'सरकार' म्हणतात. त्या नाटकात दोघांनी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना दिलेली साथ पाहिली की पती-पत्नीच्या नात्याची अलौकिक ताकद लक्षात येते.

संसार तर सगळेच करतात; पण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या पत्नी माई यांनी पती-पत्नीच्या या नात्याला केवढ्या तरी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले! नुकतेच लग्न झालेले असताना, माईंच्या डोळ्यांत सुखी संसाराची स्वप्ने तरळत असताना सावरकरांनी स्वतःला मातृभूमीच्या स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले. सावरकरांना अंदमानच्या काळ्या पाण्याची जन्मठेप झाल्यानंतर माई जेव्हा त्यांना तुरुंगात भेटायला जातात, तेव्हा पतीला बेड्या घातलेल्या अवस्थेत पाहून त्यांचे डोळे पाणावतात. त्यावेळी त्यांची समजूत घालताना सावरकर म्हणतात—

"माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्यालाच जर संसार म्हणायचा असेल, तर असा संसार कावळे आणि चिमण्या देखील करतात! पण जर अवघ्या देशाचा संसार सुखी करण्यासाठी, आपल्या सुखी संसाराची होळी करून स्वतःला यज्ञकुंडात आहुती म्हणून द्यावं लागत असेल, तर तो खरा संसार आहे!"

पतीच्या या राष्ट्रयज्ञात स्वतःच्या संसाराची समिधा करणाऱ्या माई आणि सावरकरांचे हे नाते त्यागाचे सर्वोच्च शिखर आहे.

लग्न झाल्यानंतर मुलाबाळांचे करता करता संसाराची अनेक वर्षे निघून जातात आणि आयुष्याचा पैलतीर दिसायला लागतो. उतारवयात कधी पती आजारी पडतो, तर कधी पत्नी. मुले जवळ असली तर चांगलेच; पण त्यांच्या भरवशावर न राहता दोघे एकमेकांना मायेने सांभाळून घेतात.

माझ्या डोळ्यांसमोर माझ्या काका-काकूंचे उदाहरण नेहमी येते. दोघेही सेवानिवृत्त झालेले होते. पुढे काकूंना अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला आणि त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यांना चालता येत नव्हते, घरातील कामे करणे तर दूरच राहिले. अशा वेळी काकांनी त्यांची अपार सेवा केली. बाहेरगावी जायचा प्रसंग आला, तरी काका त्यांना व्हीलचेअरवर बसवून गाडीतून सोबत न्यायचे. काकूंना त्यांनी कधीही एकटे सोडले नाही; आमच्या डोळ्यांसमोर त्यांचा हा आदर्श कायम राहिला.

माझे वडीलही आपल्या आयुष्यातील शेवटच्या एक-दीड वर्षात अंथरुणाला खिळलेले होते. त्यांच्याकडून काही होत नसे; अशा बिकट वेळी माझ्या आईने त्यांची दिवसरात्र केलेली सेवा मी पाहिली आहे. एखाद्या लहान मुलाची काळजी घ्यावी, तशी त्यांची काळजी तिने घेतली. हेच खरे पती-पत्नीचे निस्सीम प्रेम!

जेव्हा आयुष्यभर साथ देणारा जीवनसाथी अचानक हे जग सोडून निघून जातो, तेव्हा मात्र पती असो की पत्नी, त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड पोकळी निर्माण होते. मग उर्वरित आयुष्य ते केवळ 'काढतात'; जोडीदाराशिवाय 'जगणं' त्यांच्यासाठी एक मूक अग्निदिव्य बनून जातं.

मला इथे पूर्वी वाचलेली एक सत्यकथा आठवते. एकदा एक वयोवृद्ध गृहस्थ हाताची जखम शिवून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि म्हणतात, "डॉक्टर, मला जरा घाई आहे, कृपया पटकन टाके काढा." डॉक्टरांनी विचारले, "का हो, कुठे जायची घाई आहे?" ते म्हणाले, "मला माझ्या आजारी पत्नीला भेटायला जायचे आहे." डॉक्टरांनी सहज विचारले, "त्या कुठे आहेत?" त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "त्यांना 'अल्झायमर'चा आजार आहे. त्या एका शुश्रूषागृहात उपचार घेत आहेत. मी रोज सकाळी त्यांच्यासोबत बसून नाश्ता करतो, आज मला थोडा उशीर झालाय." डॉक्टरांनी विचारले, "पण त्या तुम्हाला ओळखतात का?" ते शांतपणे म्हणाले, "नाही, ती मला ओळखत नाहीत." डॉक्टरांना आश्चर्य वाटले, ते म्हणाले, "तरीही तुम्ही रोज न चुकता त्यांच्यासोबत नाश्ता करायला जाता?" त्यावर त्या गृहस्थांनी दिलेले उत्तर काळजाला भिडणारे होते—"होय, ती मला ओळखत नसल्या म्हणून काय झाले? मी तर तिला ओळखतो ना!" डॉक्टर नंतर म्हणाले की, हा रुग्ण मला आयुष्यातील प्रेमाचा आणि समर्पणाचा सर्वात मोठा धडा देऊन गेला.

आपल्या भारतीय संस्कृतीत या नात्याला 'अर्धनारीश्वर' संकल्पनेचे उदात्त अधिष्ठान लाभले आहे. शिव आणि शक्ती जसे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, तसेच पती आणि पत्नी एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. श्रीराम-सीता, विठ्ठल-रखुमाई यांच्यापासून ते इतिहासातील महर्षी कर्वे आणि बाया कर्वे, महात्मा गांधी आणि कस्तुरबा, सावित्रीबाई आणि जोतीराव फुले, बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्यापर्यंत... एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समाज घडवणाऱ्या दांपत्यांची अनेक प्रेरक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

आजच्या धकाधकीच्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीत पती-पत्नीचे नाते अधिक संवेदनशील झाले आहे. आज दोघेही नोकरी आणि संसाराची तारेवरची कसरत करत असताना एकमेकांना दिलेला वेळ, संयम आणि विश्वास हीच या नात्याची खरी ताकद ठरते. उतारवयात जेव्हा मुले आपापल्या विश्वात रमतात, तेव्हा हातात हात घालून एकमेकांची काठी बनणारे आणि आठवणींत रमणारे हेच पती-पत्नीचे नाते अखेरपर्यंत सोबत राहते.

कविवर्य बा. भ. बोरकर आपल्या एका कवितेत जोडीदाराच्या विरहाचे दुःख मांडताना म्हणतात—

"तू गेल्यावर, घरात देखील पाऊल माझे अडखळते,

आणि आटुनी हवा भवतीची, श्वासास्तव मन तडफडते.

तू गेल्यावर, या वाटेने चिमणी देखील नच फिरके,

कसे अचानक झाले न कळे, सगळे जग परके परके..."

पती-पत्नीच्या नात्याचा हा पवित्र आदर्श भारतीय संस्कृतीने शतकानुशतके जपला आहे. नात्यांच्या या भरजरी 'महावस्त्रा'चा हा 'पती-पत्नी' नावाचा पदर विश्वासाचा, समर्पणाचा आणि अथांग प्रेमाचा सुगंध असाच सदैव दरवळत ठेवो!

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३०/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...