उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७२
स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ।
मुळी कल्पना दो रूपें ते चि जाली ।
विवेके तरी सस्वरूपी मिळाली ।।१७२।।
अर्थ : देहबुध्दीपोटी आपण ज्या कल्पना करतो त्या अज्ञानजन्य असतात त्यांना अविद्या म्हटले जाते. पण ज्या कल्पना ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी असतात त्यांना सुविद्या म्हटले जाते. अविद्या आणि सुविद्या या दोन्हीही ‘कल्पना’ या एकाच स्वरूपात असतात. विवेकाने म्हणजेच सारासार विचार केल्यानेच त्यांचा आत्मस्वरूपामध्ये लय होतो.
( स्फुरे - स्फुरते/सुचते, विषयी - दृश्य जगत, अविद्या - अज्ञान, सुविद्या - आत्मबुद्धी, दो रूपे - दोन रूपाने, स्वस्वरूपी - आत्म्याच्या ठिकाणी )
विवेचन
या श्लोकात समर्थ आपल्याला ब्रह्म आणि माया यांच्याबद्दल सांगतात. आपण या पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या विश्वात राहतो. आपला देहसुद्धा त्यांचाच बनलेला आहे. त्यामुळे देहाबद्दल आणि विषयांबद्दल मनात कल्पना निर्माण होणे हे अत्यंत साहजिक आहे. पण हे सगळे अज्ञानापोटी होते. यालाच उद्देशून समर्थांनी या श्लोकात ' अविद्या ' शब्द वापरला आहे. परब्रह्मापासून जे आपल्याला दूर नेते ती गोष्ट म्हणजे अविद्या. परमेश्वर आणि आपण यांच्यामध्ये मायेचा पडदा असतो. मायेच्या प्रभावामुळे आपले लक्ष किंवा आपली कल्पना ईश्वराकडे जात नाही. तेच तर मायेचे कार्य आहे.
परंतु आत्मज्ञानाचा प्रकाश या अविद्येचा किंवा मायेचा पडदा बाजूला सारतो. जे संत असतात ते या मायेच्या पसाऱ्यात अडकत नाहीत. त्यांना सतत परमेश्वर स्वरूपाचे स्फुरण होते. त्यांच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास असतो. यालाच समर्थ ' सुविद्या ' असे म्हणतात. ज्ञानी माणसे ब्रह्म आणि माया यातील फरक जाणतात. मोहमायेच्या पसाऱ्यात ते अडकत नाहीत. वास्तविक परब्रह्म आणि माया वेगळे नाहीत. त्यांचे मूळ स्वरूप एकच आहे. एकाच स्वरूपातून निर्माण झालेल्या या दोन गोष्टी आहेत. म्हणून समर्थ म्हणतात," मुळी कल्पना दो रूपे ते चि जाली."
हे दृश्य किंवा भासमान जग नश्वर आहे, नष्ट होणारे आहे. ते खरे वाटते पण तो एक भास आहे. त्यातील मूळ तत्त्व परब्रह्म आहे हे संत जाणतात. आपल्याला हे जग खरे वाटते. कारण मायेच्या पडद्यालाच आपण घट्ट धरून ठेवतो. संत ' सुविद्येच्या साहाय्याने ' हा पडदा नाहीसा करतात. त्यांचा प्रवास देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे सुरु झालेला असतो. यासाठीच समर्थ म्हणतात," विवेके तरी सस्वरूपी मिळाली." विवेकाचा वापर करून, देहबुद्धीचा त्याग करून आणि संतसंगतीचा आश्रय करून या मायेच्या जाळ्यातून बाहेर पडणे शक्य आहे. आपण म्हणजे हा देह नसून परब्रह्मस्वरूप आहोत हे लक्षात आल्यावर आपली वाटचाल स्वस्वरुपाकडे सुरु होईल. आपण त्याचाच एक अंश आहोत हे लक्षात आल्यावर माया, देहबुद्धी, अहंकार या गोष्टी त्यात विलीन होतील.
स्वसंवाद
१. माझ्या मनात येणारे विचार आणि कल्पना केवळ नश्वर देहाच्या व ऐहिक भोगांच्या (अविद्येच्या) मागे धावतात, की आत्मज्ञानाच्या (सुविद्येच्या) शोधात रमतात?
२. हे दृश्य जग नश्वर आणि मायेचा पडदा आहे याचे भान ठेवून, त्यामागील मूळ परब्रह्म तत्त्वाला ओळखण्याचा मी प्रयत्न करतो का?
३. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, मायेच्या खेळात आणि प्रपंचाच्या व्यापात न अडकता मनातील कल्पनेला ईश्वरी चिंतनाकडे वळवण्याची माझी साधना सुरू आहे का?
४. देहबुद्धी, अहंकार आणि मायेचा विळखा सैल करून, माझे मन मूळ 'स्वस्वरूपात' विलीन करण्यासाठी मी सत्संगाची कास धरतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा