उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६७
बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ।
घडीने घडी सार्थकाची करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६७।।
अर्थ : शाश्वताचा म्हणजेच चिरंतन असे आत्मस्वरूप किंवा परमेश्वर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे असा दृढ निश्चय करावा. मनामध्ये येणाऱ्या शंका किंवा विकल्प विसरावा. परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्थकी लावावा. हे सर्व साधण्यासाठी आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचा सहवास करावा.
( शाश्वताचा - शाश्वत असे ईश्वरी तत्त्व, संदेह - शंका/विकल्प )
विवेचन
' सदा संगती सज्जनाची करावी ' या मालिकेतील हा अंतिम श्लोक. पुढील श्लोक देखील संतसंगतीचा महिमा सांगणारे आहेत पण त्यांचा अंतिम चरण वेगळा आहे. या श्लोकात समर्थांनी आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपण एकेक करून पाहू या. पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात,'बरा निश्चयो शाश्वताचा करावा.' आपण आपल्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निश्चय किंवा निर्धार करतो. त्याप्रमाणे ती गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून ठरवून प्रयत्न करतो. विद्यार्थी परीक्षेत उत्तम गुण मिळवण्याचा निर्धार करतात. चांगली नोकरी मिळावी, चांगले घर बांधून व्हावे यासारखे अनेक उद्देश माणूस मनाशी ठरवतो. त्याप्रमाणे प्रयत्न करून त्या गोष्टी साध्य करतो.
आपली देहबुद्धी बलवान असल्याने देहाच्या सुखदुःखालाच आपण आपले सुखदुःख मानतो. देहाला सुख लाभेल अशा वस्तू किंवा उपाधी जमवतो. देहाला दुःख होईल अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो. पण कधीतरी हे लक्षात येते की सुख सुख म्हणून आपण ज्या ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर झिजलो त्या गोष्टी चिरकाल सुख देणाऱ्या नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात की या क्षणिक सुखांच्या गोष्टींच्या पाठीमागे लागण्याच्या ऐवजी शाश्वत सुख मिळवण्याचा निश्चय करा. कोणती गोष्ट शाश्वत आहे ? कोणते सुख किंवा आनंद चिरकाल टिकणारा आहे ? आत्मसुखाची किंवा भगवंताची प्राप्ती ही शाश्वत समाधान देणारी गोष्ट आहे.
दुसरी गोष्ट समर्थ सांगतात ती ही की या शाश्वत सुखाच्या आपल्या निश्चयाच्या आड अनेक गोष्टी येतात. त्यासाठी समर्थांनी ' संदेह ' हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. मग हे संदेह अनेक प्रकारचे असतात. मी एवढे प्रयत्न करतो, इतकी वर्षे भगवंताचे नाम घेतो पण खरंच भगवंत मला प्राप्त होईल का ? या जगात भगवंत आहे हे नक्की का ? नामामध्ये खरोखर एवढे सामर्थ्य आहे का की ते मला भगवंताची प्राप्ती करून देईल ? एक ना दोन. अशा नाना प्रकारच्या शंका मनात उभ्या राहतात. एकवेळ अशिक्षित किंवा निरक्षर माणसे संतांचा उपदेश काही शंका न घेता श्रद्धेने पाळतील. पण जास्त शिकलेल्या व्यक्तीच्या मनात नाना तऱ्हेच्या शंका कुशंका निर्माण होतात. त्यामुळेच तो भगवंतप्राप्तीच्या निर्धारापासून ढळण्याची शक्यता असते. म्हणून संदेहांना आपल्या मनात थारा देऊ नये. एकदा निर्धार केला तो कुठल्याही परिस्थितीत मी पाळेन आणि माझे ध्येय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही हे आपल्या मनाशी ठरवावे. शंका किंवा संदेह विसरून भगवंत प्राप्तीच्या मार्गावर चालू लागावे.
तिसरी गोष्ट समर्थ सांगतात ती ही की आपला प्रत्येक क्षण सार्थकी लावावा. तो कशाने सार्थकी लागेल ? जेव्हा आपण सतत भगवंताचा विचार करू, त्याचे नामस्मरण करू तेव्हा. त्याच्या स्मरणाविना गेला असा एकही क्षण नसावा. म्हणजे आयुष्यातील वेळ सार्थकी लागेल. हा वेळ सार्थकी लागला की आपले आयुष्यही सार्थकी लागलेच म्हणून समजावे. एक संस्कृत सुभाषित आहे.
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्।
ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला किंवा धनाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे साधकालाही आपला क्षण न क्षण भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याच्या स्मरणात किंवा सेवेसाठी लावावा लागेल. तेव्हाच त्या वेळेचे सार्थक होईल.
तेव्हा शाश्वताच्या प्राप्तीचा निर्धार, मनात संदेहाला थारा न देणे, वेळेचे सार्थक करणे या गोष्टींकडे साधकाने विशेष लक्ष द्यावे आणि या मार्गात यश मिळवण्यासाठी सज्जनांचा म्हणजे संतांचा सहवास करावा.
स्वसंवाद
१. मी केवळ तात्पुरत्या व नश्वर भौतिक सुखांच्या मागे धावतो, की चिरंतन शांती देणाऱ्या 'शाश्वत आत्मसुखाचा' दृढ निश्चय करतो?
२. साधनेच्या आणि परमार्थाच्या मार्गावर चालताना, माझ्या मनातील बौद्धिक 'संदेह' व शंका-कुशंका बाजूला ठेवून मी पूर्ण श्रद्धेने पुढे जातो का?
३. "क्षणशः कणशश्चैव..." या सुभाषितात सांगितल्याप्रमाणे, आयुष्यातील एक-एक अमूल्य घडी व्यर्थ न घालवता ईश्वराच्या अनुसंधानात ती 'सार्थकी' लावण्याचा मी प्रयत्न करतो का?
४. शाश्वताचा निश्चय टिकवून ठेवण्यासाठी आणि वेळेचे सार्थक करण्यासाठी मी नित्यनेमाने संतसाहित्याचा व सज्जनांचा सहवास धरतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा