उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७०
देहबुधि हे ज्ञानबोधे तजावी ।
विवेके तया वस्तूची भेटि घ्यावी ।
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे ।
म्हणोनी सदा तें चि शोधीत जावे ।।१७०।।
अर्थ : मी देह नसून आत्मा आहे हे ज्ञानाच्या साहाय्याने जाणून देहबुद्धीचा त्याग करावा. विचार आणि विवेकपूर्वक आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा. आपली वृत्ती स्वभावतःच आत्म्याशी एकरूप होत नाही. म्हणूनच नेहमी आत्म्याचा शोध घ्यावा.
( ज्ञानबोध - मी देह नसून आत्मा आहे ही जाणीव, तजावी - टाकून द्यावी, वस्तू - आत्मतत्त्व/[परब्रह्म, तदाकार - एकरूप )
विवेचन
या श्लोकात समर्थांनी आपले आत्मस्वरूप जाणून घेण्यावर भर दिला आहे. आत्मस्वरूप जाणून घेण्याकडे आपला कल नसतो ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे. त्याला कारण म्हणजे आपली देहबुद्धी. देहाच्या सततच्या सहवासामुळे हा देह म्हणजेच मी आहे अशा प्रकारची भावना दृढ होते. देहाच्या सुखालाच आपण आपले सुख मानू लागतो. मूल जेव्हा जन्मते तेव्हा ते निष्पाप आणि निरागस असते. त्यामुळे ते परमेश्वराच्या जवळ असते. स्वाभाविकच ते अत्यंत आनंदी असते. पण ते जसजसे मोठे होत जाते, तसतसे मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचे संस्कार त्याच्यावर होऊ लागतात. सुरुवातीचा त्याचा निष्पाप, निरागस स्वभाव हळूहळू नाहीसा होऊन त्याची जागा वाईट गोष्टी, स्वार्थीपणा घेऊ लागतात. वाईट गोष्टी शिकाव्या लागत नाहीत. त्या सहजपणे अंतरंगात प्रवेश करतात. पण चांगल्या गोष्टी शिकाव्या आणि शिकवाव्या लागतात. संस्कारांचे सिंचन करावे लागते तरच आयुष्यरूपी बाग सुंदर फुलांनी बहरते.
पण भोवतालचे हे दृश्य जग माणसाला ऐहिक सुखात रमवते. त्यातूनच त्याच्या मनात नाना प्रकारचे विकार उद्भवतात. देहबुद्धीचे पोषण होऊन देहाचे सुख म्हणजेच खरे सुख हे तो मानू लागतो. म्हणूनच समर्थ म्हणतात," तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे." आत्मस्वरूप जाणून घेण्याची उत्सुकता नसते. त्याच्याकडे नैसर्गिकरित्या मन वळत नाही. मग त्याच्याकडे वृत्ती वळण्यासाठी काय करावे ? तर समर्थ पहिल्या ओळीत म्हणतात," देहबुधि हे ज्ञानबोधे तजावी." देहबुद्धी असणे तर नैसर्गिकच ! पण ज्ञानबोधाने ती दूर करावी. देहबुद्धी ही आत्मबुद्धी करावी या एकाच वाक्यात परमार्थाचे सार सामावले आहे. मनाचे श्लोक वरवर साधे वाटतात पण त्यात परमार्थाचे गूढ सामावले आहे.
देहबुद्धी ही अज्ञानवश म्हणजे अज्ञानापोटी निर्माण होते. ' ज्ञानबोध ' म्हणजे काय ? येथे ज्ञान म्हणजे शाळा-कॉलेजात मिळणारे ज्ञान अपेक्षित नाही. ज्ञानबोध म्हणजे आत्म्यासंबंधीचे ज्ञान. मी देह नसून आत्मा आहे ही जाणीव त्यासाठी दृढ व्हावी लागते. देह हा नाशिवंत आहे. आत्म्याचे स्वरूप चिरंतन आहे. आत्मा हा परमेश्वराचाच अंश आहे. प्रत्येकाच्या देहात आत्मस्वरूपाने परमेश्वरी चैतन्य विराजमान आहे.
पण आपल्याला दृश्य जगत हेच खरे वाटते. दृश्य जगतातील प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहता येते, अनुभवता येते. पण आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आणि सहजी न कळणारे आहे. त्यासाठी सततची साधना आवश्यक असते. म्हणून समर्थ म्हणतात," म्हणोनी सदा तें चि शोधीत जावे." आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी वाईट विचार, वासनांचा आणि अहंकाराचा त्याग करावा लागेल. पाणी गढूळ असेल तर त्यात प्रतिबिंब दिसत नाही. पाणी स्वच्छ असेल तर त्याचा तळ दिसतो. अशाच प्रकारे मनसुद्धा विकारांचा त्याग करून शुद्ध, निर्मळ करावे लागेल. तरच आत्मस्वरूपाचे प्रतिबिंब त्यात दिसेल. यासाठी विवेक आणि विचाराच्या साहाय्याने देहबुद्धीवर मात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. मनाला तसे करण्याचे वळण लावावे. सद्विचार, संतसंगती, परमेश्वराचे नामस्मरण यांच्या साहाय्याने आत्मस्वरूप जाणून घेण्याचा मार्ग सापडेल.
स्वसंवाद
१. लहान बालकासारखा निष्पाप भाव गमावून, मी बाह्य जगातील स्वार्थ, स्पर्धा आणि ऐहिक सुखांच्या मागे तर धावत नाही ना?
२. गढूळ पाण्यात तळ दिसत नाही त्याप्रमाणे, माझ्या मनातील विकार व वासनांमुळे मला आत्मस्वरूप अनुभवण्यात अडचणी येत आहेत का ?
३. शाळा-कॉलेजातील व्यावहारिक ज्ञानापलीकडे जाऊन, "मी म्हणजे केवळ हा नश्वर देह नसून शाश्वत आत्मा आहे" हा खरा 'ज्ञानबोध' मिळवण्याचा मी प्रयत्न करतो का?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, वृत्ती स्वभावतःच विषयात रमत असल्याने, विवेकाने मनाला वळण लावून अखंड आत्मतत्त्वाचा शोध घेण्याची माझी तयारी आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा