उगवतीचे रंग
आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग दहा
कालव्यांचे शहर असलेल्या व्हेनिस शहराची सफर आम्ही करत होतो. व्हॅपोरेटो आणि गोंडोलामध्ये बसून जलपर्यटनाचा आनंद घेतला. या शहरालाच सिटी ऑफ ब्रिजेस असेही म्हटले जाते. ग्रँड कॅनालमधून प्रवास करताना आपण ज्या एका ब्रिजखालून जातो, त्याला रिआल्टो ब्रिज म्हणतात. ज्याला ग्रँड कॅनॉल म्हणतात, ते म्हणजे प्रत्यक्षात समुद्राचे बॅक वॉटर आहे. त्या ठिकाणी मोठमोठी जहाजे पार्क करून ठेवली होती. त्यात पर्यटकांसाठी हॉटेल, निवास इ. ची सोय होती.
काही बेटांवर असलेली सुंदर वृक्षराजी आणि विविध वनस्पतीमुळे परिसराची शोभा वाढली होती. त्या समुद्राच्या पाण्यात बेटं असणं आणि त्या पाण्यातही आणि त्या हवामानातही विविध वृक्षांची वाढ होणं ही खरोखरच निसर्गाची किमया होती. अर्थात जो भगवंत वाळवंटातही पाणी निर्माण करतो, उंच किल्ल्यांवर चवदार पाण्याचे टाके निर्माण करतो आणि हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतशिखरांवर गरम पाण्याचे तळे निर्माण करतो, त्याला अशक्य असे काय आहे ? म्हणूनच या ठिकाणी विविध वनस्पती, प्राणी, पक्षी आदींचा अधिवास होता. निसर्ग, प्राणी, पक्षी इ. विपरीत परिस्थितीही स्वतःला त्या परिस्थतीशी कसे जुळवून घेतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपण मात्र थोडी फार विपरीत परिस्थिती आली की तक्रार करतो, परिस्थितीला दोष देतो.
जलसफर झाल्यावर आम्ही या बेटांवर भटकलो. इथे पाहण्यासारखी पुष्कळ ठिकाणे आहेत. ग्रँड कॅनॉल पास झाल्यावर पुलाच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला ड्यूकल पॅलेस बघायला मिळतो. हा ड्यूकल पॅलेस म्हणजे व्हेनिसवर राज्य करणाऱ्या ड्यूकचा राजवाडा. हा राजवाडा म्हणजे व्हेनिसमधील अत्यंत देखणी अशी ऐतिहासिक इमारत आहे. त्याच्यासमोरच आहे पीओंबी प्रिझन. व्हेनिसच्या नगरप्रमुखाला डोज म्हटले जात असे. पीओंबी प्रिझनमध्ये डोजने शिक्षा दिलेल्या गुन्हेगारांना डांबून ठेवले जाई. हा तुरुंग म्हणजे एक अंधारकोठडीच. या अंधारकोठडीत एकदा गेलेला माणूस जिवंत परत येत नसे. या अंधारकोठडी आणि राजवाड्याला जोडणारा जो पूल आहे त्याला ब्रिज ऑफ साईज ( निराश झालेल्यांच्या नि:श्वासांचा पूल ) म्हटले जाई. शिक्षा झालेली माणसे या पुलावरून जाताना दुःखाचे निःश्वास टाकत असत. या तुरुंगात अजूनही पूर्वीचे साखळदंड, लोखंडी पिंजरे बघायला मिळतात. तिथले वातावरण आजही अस्वस्थ करते.
येथील ड्यूकल पॅलेसजवळ आपल्याला एक भव्य चौक बघायला मिळतो. या चौकाला पियाझ्झा सान मार्को म्हणजेच सेंट मार्क्स स्क्वेअर असे म्हटले जाते. अतिशय देखण्या असलेल्या या चौकाचे वर्णन नेपोलियनने मोठया सुंदर शब्दात केले आहे. तो म्हणतो, ' This is the finest open air drawing room in the world. ' हा चौक माणसांनी नेहमीच गजबजलेला असतो. इथे कबुतरेही मोठ्या संख्येने आढळतात. आमच्यासोबतच या परिसराची माहिती देणारी एक स्थानिक महिला गाईड होती. ती आम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती देत होती. व्हेनिसच्या ' मुरानो ' या बेटावर काचेच्या सुंदर वस्तू बनवणारे कारखाने आहेत. या कारखान्यांना जवळपास ७०० वर्षांची परंपरा आहे. या चौकातील काही दुकानांमध्ये या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात.
या चौकातच सेंट मार्क्स चर्च ( बॅसिलिका ) आपल्याला बघायला मिळते. सेंट मार्क्स या संताच्या मृतदेहाचे अवशेष व्हेनिसच्या दोन व्यापाऱ्यांनी अलेक्झांड्रिया येथून पळवून आणले. त्याच्या स्मरणार्थ हे सेंट मार्क्स बॅसिलिका सन ८२९ मध्ये बांधण्यात आले. पंख असलेला एक सिंह म्हणजे सेंट मार्क्सचे प्रतीक. त्याने आपल्या पुढील पायाचा पंजा एका उघड्या असलेल्या पुस्तकावर ठेवलेला आहे. हे चर्च आपल्या अनोख्या स्थापत्यशैलीमुळे प्रसिद्ध आहे. याच्या प्रवेशद्वारावर एक भव्य कमान आहे. यात जे पेंटिंग आहे, त्यात व्हेनिसचे नागरिक सेंट मार्क्सच्या मृतदेहास वंदन करताना दाखवले आहेत. तर प्रवेशद्वारावर असलेल्या बाल्कनीत चार अतिशय देखण्या अशा अश्वांचे ब्रॉन्झमध्ये केलेले पुतळे आहेत. या चर्चच्या बांधकामात बऱ्याच ठिकाणी सोने आणि मौल्यवान रत्नांचा वापर केलेला आहे.
या सेंट मार्क्स बॅसिलिकाच्या बाजूलाच एक मोठा बेल टॉवर आहे. त्याच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगातील पिरॅमिडसारखा आकार आहे. त्याच्या सर्वात वर टोकाला एका संताचा पुतळा आहे. बेल टॉवरच्या बाजूला समोरच एक क्लॉक टॉवर आहे. हा टॉवर पंधराव्या शतकात बांधला गेला आहे. यावरील घड्याळ अतिशय विशाल असून पंधरा ते वीस फूट व्यासाचे आहे. या घड्याळावर चोवीस तासांचे दर्शक असे रोमन अंक आहेत. तर या घड्याळाच्या आतील वर्तुळात बारा राशींच्या खुणा दाखवल्या आहेत. आपण ज्या मेष, वृषभ आदी बारा राशी मानतो, त्या तिथे दर्शविल्या आहेत. म्हणजेच १४ व्या, १५ व्या शतकाच्या सुमारास भारतीय संस्कृती राशींच्या स्वरूपात का होईना पण इजिप्तमध्ये पोहोचली होती असे अनुमान आपल्याला काढता येते. भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इटलीमध्ये पोहोचलेल्या या पाऊलखुणा पाहून मन अभिमानाने भरून आले.
व्हेनिसमधील ही सगळी स्थळे पाहण्यात आमच्या दिवसाचा वेळ कसा निघून गेला हे कळले नाही. दिवसभराचे दमले थकलेले आम्ही आता आमच्या हॉटेलवर मुक्कामासाठी परत आलो होतो. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/८/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा