मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

 उगवतीचे रंग 

श्रीपाद वल्लभ दिगंबरा... 

दत्तगुरूंच्या आरत्या असोत की ' श्रीपाद वल्लभ दिगंबरा ...' हा मंत्र, त्यात इतकी गोडी आहे की आपण ते म्हणताना भान हरवतो. महाराष्ट्रात आणि भारतातही दत्तगुरूंची अनेक ठिकाणी सुंदर मंदिरे आहेत. दत्तगुरूंची मूर्ती तर इतकी सुंदर असते की तिचं दर्शन घेताच मन शांत अन प्रसन्न होतं. 

तीन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती ।

जटाजूट शिरी पायी खडावा, भस्म विलेपित कांती साजे ।

दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे... ।।

अशा या दत्तगुरुंचा महिमा अपरंपार आहे. भक्ताच्या हाकेला धावून जाणारे हे दैवत आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेशचा साक्षात अवतार म्हणजे दत्तगुरु ! ज्ञानियांचे दैवत म्हणजे ही गुरुमाऊली. अशा या दत्तगुरूंचे तीन अवतार होऊन गेले. प्रथम अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. द्वितीय अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती आणि तृतीय अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. यापैकी नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांची बऱ्यापैकी माहिती सर्व भाविकांना असते. पण दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभ यांची फार थोडी माहिती आपल्याला असते. त्यांच्याबद्दलच जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. 

गंगाधर सरस्वती यांनी गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक आणि दत्तभक्तांच्या कामना पूर्ण करणारा ग्रंथ लिहिला. या गुरुचरित्राचे नायक आहेत श्री नृसिंह सरस्वती. त्यामुळे गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ यांची फार कमी माहिती मिळते. अध्याय ५, अध्याय ८,९, आणि १० यात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रातील ठळक घटना आपल्याला वाचायला मिळतात. तर अध्याय ४९ मध्ये त्यांच्या अवतार कार्याचे महत्व सांगणाऱ्या काही ओव्या आहेत. पृथ्वीवर खरा धर्म म्हणजे काय हे लोक विसरले होते. खरा धर्म म्हणजे काय ते न कळल्याने लोक दुराचारी होऊ लागले होते. भोळ्या भाविकांना धर्माच्या नावाखाली फसवले जात होते. त्यांना गुरुशिष्य परंपरेच्या द्वारे धर्माचे मर्म कळावे, लोकांना सन्मार्गाला लावावे या हेतूने दत्तगुरूंनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतार घेतला. त्यांचेच अवतारकार्य कथारूपाने आपण समजून घेऊ या. 

****************************************************

आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाचं एक छोटंसं गाव. या गावात सुमती आणि आपलराजा या नावाचं एक ब्राह्मण जोडपं राहत होतं. त्यांची परिस्थिती बेताचीच होती. पण पतिपत्नी दोघेही अत्यंत धार्मिक आणि परोपकारी होते. आलेल्या अतिथीला ते कधीही विन्मुख पाठवत नसत. अशा या धर्मपरायण दाम्पत्याला एक दुःख होते. त्यांना उत्तम संतती नव्हती. सुमतीला सुरुवातीला झालेली काही बाळे अल्पजीवी ठरली. त्यानंतर त्या माउलीला दोन मुले झाली. पण त्यातील एक अंध आणि दुसरा पांगळा होता. परंतु परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी आपली परमेश्वराची नित्य आराधना सुरूच ठेवली होती. एके दिवशी त्यांच्या घरी पितरांचे श्राद्ध होते. सुमतीने सर्व स्वयंपाक केला आणि देवापुढे ती नैवेद्याची थाळी ठेवणार तोच तिला आवाज आला,' ओम भवती..' आपल्या हातातील थाळी तशीच घेऊन ती दारापाशी आली. दारी एक तेज:पुंज अतिथी उभा होता. त्या अतिथीला पाहून ती भारावली. तिने त्याचे स्वागत केले. आपल्या हातातील थाळी त्याच्यापुढे ठेवली. त्याच्या चरणाशी नतमस्तक झाली. नंतर तिने जेव्हा मान वर करून पाहिलं तेव्हा प्रत्यक्ष दत्तगुरूंचे दर्शन तिला घडले. त्यांची सुमधुर वाणी तिच्या कानावर पडली. ' माते, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग. '

सुमतीनं भानावर येत पुन्हा त्यांच्याकडं पाहिलं तर काय आश्चर्य ! तो मघाचाच तेज:पुंज अतिथी तिच्या नजरेस पडला. डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. ती म्हणाली, ' महाराज, आपण मला आई म्हणालात, मी धन्य झाले. आता एकच इच्छा आहे. आपल्यासारखाच ज्ञानी, तेजस्वी पुत्र मला व्हावा. ' 

' तथास्तु ! माते, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुला एक ज्ञानी आणि तेजस्वी असा पुत्र होईल. त्याची ख्याती सर्वत्र पसरेल, तुमच्या कुळाचा उद्धार होईल आणि तुमचे सगळे दुःख, दैन्य तो दूर करील. पण...' अतिथिदेव म्हणाले. 

' पण काय महाराज.. ? 

' माते, हा पुत्र जगदवंद्य होईल. पण तो तुमच्याजवळ फार काळ राहणार नाही. तुम्हीही त्याचे ऐका. त्याच्या मनाविरुद्ध वागू नका. ' अतिथिदेव म्हणाले. 

' जशी आपली आज्ञा महाराज, ' सुमती म्हणाली. तिने वर पाहिले तो अतिथी अदृश्य झाला होता. 

****************************************************

यतिवरांच्या रूपाने साक्षात दत्तगुरु दारी आले होते. सुमती मनोमन सुखावली. आपलराज बाहेरून येताच त्यांच्या कानावर तिने ही शुभवार्ता घातली. त्यांनाही खूप आनंद झाला. यथावकाश सुमतीला पुन्हा दिवस राहिले. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसू लागले. एका नव्या जाणिवेनं ती मोहरून गेली. भाद्रपद शुद्ध चतुर्थी. गणेश चतुर्थीचा दिवस. इ. स. १३२०. या शुभ मुहूर्तावर सुमतीने एका सुस्वरूप, सुलक्षणी बाळाला जन्म दिला. बाळाची पत्रिका पाहून विद्वान ज्योतिषांनी भाकीत वर्तवले, ' हा मुलगा मोठेपणी अत्यंत ज्ञानी आणि विद्वान होईल. अनेक लोकांचा उद्धार याच्या हातून होईल. अनेक लोकांना तो गुरुस्थानी असेल आणि त्याच्या शिकवणुकीचे पालन करणारा मोठा शिष्यवर्ग तयार होईल. ' श्री दत्तगुरूंच्या कृपाप्रसादाने झाला म्हणून या बाळाचे नाव ' श्रीपाद ' ठेवण्यात आले. 

श्रीपाद आपल्या बाललीलांनी सर्वांचे मन मोहून टाकत असे. त्याच्या गोड मुखाकडे पाहून सुमती आणि आपलराज आपले सारे कष्ट आणि दुःख विसरून जात. श्रीपाद आठ वर्षांचा झाला. आपलराज आणि सुमतीने त्याचा व्रतबंध करायचं ठरवलं. दारी मंडप उभा राहिला. सनई चौघड्याचे सूर घुमू लागले. आपलराजाने श्रीपादच्या कानात गायत्री मंत्र सांगितला. आणि एक आश्चर्य घडले. त्या आठ वर्षाच्या बालकाच्या मुखातून सुस्पष्ट अशी वेदवाणी बाहेर पडू लागली. सगळ्यांनाच त्याचे आश्चर्य वाटले. लवकरच श्रीपाद चारी वेद, शास्त्र यात पारंगत झाला. त्याची कुशाग्र बुद्धी, तीव्र निरीक्षणशक्ती पाहून विद्वानांनी तोंडात बोटे घातली. सर्वांना आनंद देणारा हा श्रीपाद लवकरच सोळा वर्षांचा झाला. आता त्याच्या मातापित्यांना त्याच्या लग्नाची स्वप्ने पडू लागली होती. सून घरात येईल म्हणून ते आनंदले होते. एकदा आईने हा विषय काढताच श्रीपाद म्हणाला, ' आई, माझ्या लग्नाचे स्वप्न तू पाहू नकोस. मी लग्न करणार नाही. माझे लग्न वैराग्य नावाच्या स्त्रीबरोबर झाले आहे. मी संन्यस्त राहणार, मला हे घरही सोडावं लागणार आहे. पाय नेतील तिकडे मी जाणार आहे. करतली भोजन आणि तरुतली निवास करणार.  माझे जीवितकार्य दुसरे आहे. '

सुमतीला मग दारी आलेल्या अतिथीचे बोल आठवले. ' हा मुलगा जास्त काळ तुमच्याजवळ थांबणार नाही. ' 

तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती म्हणाली, ' बाळ, तू आम्हाला असेच दुःखी कष्टी ठेवून जाणार का ? तुझे दोन भाऊ हे असे. एक अंध तर दुसरा अपंग. म्हातारपणी आम्ही कोणाकडे पाहावे ? ' 

श्रीपाद म्हणाला, ' आई, काळजी करू नकोस. तुम्हाला दुःखात ठेवून मी जाणार नाही. ' श्रीपाद आपल्या अंध भावाजवळ गेला. त्याच्या डोळ्यांवरून त्याने हात फिरवला. श्रीपादचा हात फिरताच त्याला दृष्टी आली. दुसऱ्या भावाच्या अंगावरूनही त्याने हात फिरवला. तो काय आश्चर्य ! त्याचे सर्व व्यंग नाहीसे झाले. आपल्या मुलांच्या या परिवर्तनामुळे आईच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आपल्या दोन्ही भावांना श्रीपादने आशीर्वाद दिला. ' तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. आपल्या आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल.'  मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुजनांना मी दीक्षा देणार आहे. तुम्हाला काही कमी पडणार नाही. काळजी करू नका. ' असे म्हणून श्रीपाद आता आपल्या कार्यासाठी बाहेर पडायला सिद्ध झाला. 

एवढासा पोर ! पण निश्चय केवढा होता ! काषाय वस्त्र परिधान केलं. दंड धारण केला. हाती कमंडलू घेतलं आणि भिक्षेची झोळी खांद्याला अडकवली. आपल्या मातापित्यांना आणि आजूबाजूच्या ज्येष्ठांना वंदन करून श्रीपाद तीर्थयात्रेसाठी बाहेर पडला. मातापित्यांनी साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. 

****************************************************

मजल दरमजल करीत श्रीपाद कृष्णेच्या काठी असलेल्या कुरवपूर इथे येऊन पोहोचला. पहाटे कृष्णेच्या पवित्र जलात स्नान करून जवळच असलेल्या एका औदुंबर वृक्षाखाली त्याची ध्यानधारणा सुरु झाली. श्रीपादश्रीवल्लभांचे रूप  दिव्य होते. पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काषाय  वस्त्र हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म, व मस्तकी जटाजुट धारण केलेली, कमळाप्रमाणे प्रफुल्लित नेत्र आणि सुहास्य वदन.  श्रीपादप्रभूंची दया, क्षमा शमदमालंकृत भव्य मूर्ती ज्यांनी पाहिली ते सर्व लोक धन्य होत ! ते कृष्णामाईत त्रिकाल स्नान करीत असत. रोज प्रातःकाळी संध्येत १००० गायत्री जपत तर सूर्यनारायणास १०८ नमस्कार घालीत. 

त्यांची तेज:पुंज मूर्ती जेव्हा ग्रामस्थांनी पाहिली, त्यांची तपश्चर्या, चेहऱ्यावरील तेज आणि तरुण कोवळे वय पाहून ग्रामस्थांना हा कोणीतरी असाधारण तपस्वी असावा असे वाटले. लोक मोठ्या संख्येने त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले.  पुष्पहार, नैवेद्य आणू लागले. त्यांना मात्र या कशाचाच लोभ नव्हता. पण त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांना आनंद वाटू लागला. त्यांच्या बोलांनी त्यांच्या रोजच्या समस्यांवर त्यांना समाधान मिळू लागले. तो त्यांच्या जीवनाचा आधार झाला. रोज त्या ठिकाणी भगवंताचे भजन, पूजन, कीर्तन होऊ लागले. 

****************************************************

गुरुचरित्रातील कथेप्रमाणे त्याच्यावर भक्ती करणारी आणखी एक व्यक्ती त्या परिसरात होती. तो होता त्या गावातील परीट. रोज कपडे धुण्यासाठी तो कृष्णाकाठी यायचा. या तेजस्वी बालकाला पाहिलं की त्याला शांत आणि प्रसन्न वाटायचं. तो मनोमन त्याला दुरूनच नमस्कार करायचा. आपलं काम सुरु करायच्या आधी त्याचं नित्यनेमानं दर्शन घ्यायचा. कृष्णेकाठी मळलेले कपडे धूत असताना या तेजस्वी यतीच्या दर्शनानं त्याचं मनही शुद्ध, स्वच्छ होऊ लागलं. 

असा दिनक्रम सुरु असताना एक दिवस एक घटना घडली. त्या परिसरातील एक यवन राजा आपल्या राण्यांसह कृष्णेकाठी जलविहार करण्यासाठी आला. राजाच्या सैनिकांनी या परिटाला तेथून हाकलून लावलं. परीट राजाचे ऐश्वर्य, त्याची आपल्या राण्यांसोबत चाललेली जलक्रीडा पाहत होता. या राजाच्या भाग्याचा त्याला मनोमन हेवा वाटला. 

आपल्या विचारातच तो श्रीपाद स्वामींजवळ पोहोचला. त्यांचे दर्शन घेऊन निघावे असा विचार त्याने केला. स्वामींनी त्याच्या मनातले विचार जाणले होते. पण त्यांनी त्याला सहजच विचारले, ' रजका, कसला विचार करतोस ? ' 

परीट ओशाळला. तो म्हणाला, ' काही नाही महाराज, तो माझा मूर्खपणा होता. क्षमा असावी. ' 

स्वामी म्हणाले, ' अरे जन्मभर कष्ट करणाऱ्या जीवाला कधीतरी सुखोपभोगाची इच्छा होणं स्वाभाविक आहे. बोल, तुला या जन्मी हे सगळे सौख्य हवे की पुढील जन्मी ? ' 

रजक म्हणाला, ' हा देह आता थकला आहे महाराज. त्यामुळे आता आयुष्याच्या उत्तरार्धात हे सुख मिळून काय उपयोग ? ' 

स्वामी म्हणाले, ' ठीक आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. पुढील जन्मी तू यवन कुळात जन्म घेशील. राज्योपभोग घेशील. ' 

परीट म्हणाला, ' पण महाराज, यवन कुळात.... ? ' 

स्वामी म्हणाले, ' काळजी करू नकोस. तुझ्या उतारवयात पुन्हा आपली भेट होईल. नंतर तू मोक्षमार्गाचा अधिकारी होशील. ' 

खरोखरच त्या परिटाचा जन्म पुढे यवन कुळात होऊन तो राजा झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या दुसऱ्या म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारात त्याची भेट घेतली आणि तो उद्धरून गेला. 

*****************************************************

असाच आणखी एक त्यांचा भक्त नित्यनेमाने त्यांच्या दर्शनासाठी यायचा. तो व्यापारी होता. पण श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिलं आणि त्यांच्यावर त्याची अपार श्रद्धा बसली. त्याला दैनंदिन जीवनात काही समस्या आली तरी तो श्रीपाद श्रीवल्लभांचे ध्यान करून त्यांना मनोमन ती समस्या सांगत असे. त्याच्या समस्येचे गुरुकृपेने समाधान होई. एकदा त्याने त्यांना असाच मनोमन काहीतरी नवस केला होता. आपला नवस फेडण्यासाठी तो स्वामींच्या गावी जाऊन सहस्रभोजन घालणार होता, दानधर्म करणार होता. पण त्याला निघायला उशीर झाला. एका जवळच्या मार्गाने त्याने जायचे ठरवले. वाटेत त्याला तीन चोरांनी गाठले. त्याच्याजवळील संपत्ती लुटून त्याला ठार मारायचे असे त्यांनी ठरवले. जंगलात जाताच त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळील संपत्ती लुटू लागले. तो त्यांची विनवणी करीत होता. ' मला मारू नका. मला माझ्या स्वामींचा नवस पूर्ण करू द्या. ' पण त्या चोरांनी त्याला मारणे सुरूच ठेवले. त्याने शेवटी कळवळून स्वामींचा धावा केला. भक्ताची आर्त हाक स्वामींपर्यंत पोहोचली. गुरुमाऊली धावून आली. श्रीपाद श्रीवल्लभ तिथे प्रकटले. त्यांची तेजस्वी मूर्ती, हाती लखलखणारा त्रिशूळ पाहून चोरांची पाचावर धारण बसली. त्यातील दोन जण पळून गेले. एक चोर मात्र स्वामींचे ते रूप पाहून त्यांना शरण आला. त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले. स्वामींनी त्याला त्या व्यापाऱ्याला घेऊन कुरवपूरला यायला सांगितले. त्या शुद्ध हरपलेल्या व्यापाऱ्याला तो चोर कुरवपूरला घेऊन आला. वाटेत त्याने त्या व्यापाऱ्याला घडलेली सगळी हकीगत सांगितली. 

स्वामींजवळ येताच व्यापाऱ्याने त्यांचे पाय धरले. तो अश्रू ढाळत म्हणाला, ' स्वामी, माझ्यामुळे तुम्हाला केवढा त्रास सहन करावा लागला. मला क्षमा करा. ' स्वामी म्हणाले, ' अरे, त्यात त्रास कसला ? भक्तांचे रक्षण करणे हे तर आमचे ब्रीदच आहे. ' सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा असली की सद्गुरू असेच भक्तांच्या हाकेला धावून येतात. 

*****************************************************

कुरवपूरहून श्रीपाद श्रीवल्लभ पुढे उत्तर भारतात तीर्थयात्रेला गेले. आपल्या भ्रमणात त्यांनी बनारस, जगन्नाथपुरी, बद्रीनाथ, केदारनाथ आदी तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर उत्तर भारताची तीर्थयात्रा त्यांनी आरंभ केली. काही वर्षे त्यांनी गोकर्ण-महाबळेश्वर या क्षेत्री निवास केला. त्यानंतर ते पुन्हा एकदा कुरवपूरला आले आणि आपल्या अवतारसमाप्तीपर्यंत तिथेच राहून आपले कार्य पूर्ण केले. 

या दरम्यान एक प्रसंग घडला. श्रीपाद श्रीवल्लभ हे कृष्णातीरावर सहज फिरत असताना एका स्त्रीला आपल्या मुलासह नदीत आत्महत्या करताना त्यांनी पाहिले. त्या स्त्रीला त्यांनी थांबवले आणि तिला विचारले, ' माई, हा अविचार आपण का करत आहात ? ' 

तेव्हा ती स्त्री म्हणाली, ' महाराज, मी किती अभागी आहे. हा माझा मुलगा मंदबुद्धी आहे. त्याच्यामुळे मला अपमान सहन करावा लागतो. त्याला व्यवहारज्ञान किंवा कोणतेही ज्ञान नाही. कसे वागावे ते कळत नाही. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. '

स्वामी म्हणाले, ' माई, हा नरदेह मोठया भाग्याने मिळतो. आत्महत्या करणं हे सर्वात मोठं पाप आहे. ' 

' मग मी काय करू ? हा मुलगा शहाणा आणि ज्ञानी होईल असा काही उपाय आहे का ? '

' माई, मी तुला एक व्रत सांगतो. त्यामुळे तुझा मुलगा सुधारेल, ज्ञानी होईल. शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी म्हणजे शनिप्रदोषाच्या दिवशी तू शंकरांची पूजा कर. पण तुझ्या मनात ज्या पुत्राची इच्छा आहे, तसा पुत्र तुला पुढील जन्मी प्राप्त होईल. ' त्या स्त्रीने ते व्रत कसे करायचे ते समजून घेतले. व्रत आचरणाला सुरुवात केली. हळूहळू मुलामध्ये फरक पडू लागला. आता तो अभ्यासात प्रगती करू लागला. पुढे ज्ञानी झाला. मात्र स्वामींसारखा पुत्र आपल्याला असावा ही तिच्या मनीची आस होती. मनोमन ती स्वामींची भक्ती करत होती. श्रीपाद श्रीवल्लभांनी कालांतराने श्री नृसिंह सरस्वती म्हणून त्या स्त्रीच्या पोटी अवतार घेतला आणि तिची इच्छा पूर्ण केली. 

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी कुरवपूरला राहून लोकांना सन्मार्गाचा उपदेश केला. लोकांना दुःखमुक्त केले. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, हा त्यांच्या अवतारस्थापनेचा उद्देश होता. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. म्हणूनच श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. श्रीपाद म्हणजे ' श्री पादेयस्य ' ज्याच्या चरणाजवळ श्री म्हणजे लक्ष्मी आहे असा तो. लक्ष्मीयुक्त परमात्मा म्हणजे श्रीपाद. श्री लक्ष्मीदेवी ज्याच्याजवळ आहे आणि म्हणून सर्वांना वल्लभ आहे, म्हणजे प्रिय आहे असा सुंदर अर्थ त्यांच्या नावाचा आहे. 

 त्यांचा आयुष्यकाल केवळ तीस वर्षांचा होता. पण या अल्प आयुष्यात त्यांनी प्रचंड कार्य केले. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारा मोठा संप्रदाय आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरला आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे. स्वामींचा सहवास, त्यांचे दर्शन हवेहवेसे वाटत असतानाच शके १३५० मध्ये गुरुद्वादशीच्या दिवशी त्यांनी आपला अवतार संपवला आणि ते निजधामी गेले. असे असले तरी आजही ते सूक्ष्मदेहाने कार्यरत आहेत आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करीत असतात. कलियुगात त्यांचे नामस्मरण शीघ्र फलदायी आहे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२३/०८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...