मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग आठ

 उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग आठ  


आजचा आमच्या ट्रीपचा सहावा दिवस होता. तारीख होती सात जून २०२४. आज स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे आकर्षण असलेले आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेले ठिकाण माउंट टिटलिसला आम्ही  भेट देणार होतो. त्याची उत्कंठा लागून राहिली होती. सकाळी आठ वाजताच तयार होऊन आम्ही बसमध्ये बसलो. वातावरण अतिशय रम्य आणि प्रसन्न होते. बसमधील स्वच्छ अशा काचेतून बाहेरचा निसर्ग कमालीचा आकर्षक दिसत होता. हिरवीगार कुरणे, अतिशय देखणी आणि मन मोहून टाकणारी पर्वतराजी डोळ्यांचं पारणं फेडीत होती. मध्येच एखादे पारदर्शी आणि स्वच्छ सरोवर नजरेस पडत होते. भोवतालचा मनमोहक निसर्ग आणि स्फटिकासमान पारदर्शी असलेले तळे पाहून धरतीवरचा स्वर्ग म्हणजे हाच असावा असे वाटत होते. मध्येच डोंगराच्या हिरव्यागार कुशीत वसलेली सुंदर छोटी छोटी गावे दिसत होती. अशा सुंदर वातावरणातून बसचा प्रवास सुरु होता. मला ते पाहून ' हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद व्हा रे..' या गीताच्या ओळी आठवत होत्या. अशा या सुंदर वातावरणातील हा प्रवास संपूच नये असे वाटत असतानाच एंगेलबर्ग आले. 


एंगेलबर्ग हे ठिकाण नेत्रसुखद अशा आल्प्स पर्वतराजीच्या पायथ्याशी वसलेले आहे. वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते. निरनिराळे साहसी खेळ खेळणारे, गिर्यारोहणाची आवड असलेले आणि माउंट टिटलिसचे सौंदर्य पाहण्यासाठी आलेले देशविदेशातील पर्यटक येथे कायम असतात. युरोपात मला ठिकठिकाणी आपली भारतीय मंडळी पर्यटन करताना आढळली. सहलींचे अनेक ग्रुप्स तेथे एकाच वेळी आलेले असतात. आपल्या देशातील लोकांच्या या पर्यटनाच्या आवडीमुळे इतर देशांचा पर्यटनव्यवसाय जोरात चालतो. 


एंगेलबर्गला आपण आलो की माउंट टिटलिस वरील विविध ठिकाणे पाहण्यासाठी आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी तिकीट घ्यावे लागते. काही पर्यटकांनी ते आधीच काढलेले असते. या तिकिटावर बारकोड असतो. हे तिकीट स्कॅन करूनच आपल्याला ठिकठिकाणी प्रवेश दिला जातो. त्यामुळे हे तिकीट शेवटपर्यंत जपून ठेवावे लागते. एंगेलबर्गहून आपण रोपवेने माउंट टिटलिसवर जातो. इथल्या केबल कार स्टेशनवर आम्ही दाखल झालो. आपल्याला पर्वतशिखराकडे घेऊन जाणारे हे गोंडोला किंवा केबल कार्स अत्यंत सुंदर आहेत. त्यातील समोरासमोर असणाऱ्या बेंचवर सहाजण बसू शकतात. अशा बऱ्याच केबल कार्स तिथे सतत जा-ये करत असतात. प्रत्येक केबल कारला क्रमांक दिलेला असतो. विविध देशांचे ध्वज देखील केबल कारवर लावलेले असतात. आपल्या भारताचाही ध्वज एका केबल कारवर लावलेला होता असे आम्हाला कळले. 


केबल कारमध्ये आम्ही बसलो आणि तिचे दरवाजे बंद झाले आणि केबल कार आम्हाला पर्वत शिखराकडे घेऊन निघाली. उंचावरून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या केबल कार्स पण नजरेस पडत होत्या. आतापर्यंत जे दृश्य केवळ सिनेमात किंवा टीव्हीवर पाहिले होते, ते आम्ही प्रत्यक्षात अनुभवत होतो. अंगावर रोमांच उभा करणारा हा सुंदर प्रवास होता. केबल कारमधून आम्ही वर वर जात होतो आणि आजूबाजूचे पर्वत, खाली खाली जाणाऱ्या दऱ्या आणि हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडत होती. युरोपातील या पहिल्यावहिल्या गोंडोलातून म्हणजेच रोटेअर मधून केवळ ४५ मिनिटात आपण या दहा हजार फूट उंचीच्या पर्वतशिखरावर पोहोचतो. आपला हा प्रवास तीन टप्प्यात होतो. पहिला टप्पा ट्रसबी स्टेशनपर्यंत आहे.


पुढचा टप्पा आहे स्टॅन्ड ग्लेशियर. हे साधारणपणे २४२८ मी. उंचीवर आहे. इथून पुढे जाण्यासाठी एक मोठी लिफ्टसारखीच गोंडोल्याची सोय होती. त्यात अंदाजे शंभर पर्यटक जाऊ शकत होते एवढी प्रचंड क्षमता त्याची होती. सर्व बाजुंनी ही लिफ्ट काचेच्या खिडक्यांनी बंदिस्त आणि सुरक्षित होती. काही लोक बसून तर काही उभे राहून आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य आणि वर जातानाचे रोमांचक क्षण अनुभवू शकत होते. 


यानंतर तिसरा टप्पा सुरु झाला.इथे हॉटेल्स, शॉप्स आणि आईस्क्रीम पार्लर आहे. इथे एवढ्या उंचीवर आणि थंडीत आईस्क्रीमचा आस्वाद घेणाऱ्यांची काही कमी नाही. आईस्क्रीमचे अनेक प्रकार आणि वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला चाखता येतात. या ठिकाणी वीणा वर्ल्डतर्फे आम्हा सर्वाना आईस्क्रीम देण्यात आले. प्रत्येकाने आपल्याला हवा तो फ्लेवर घेतला. मग आमचा पुढील प्रवास सुरु झाला.  इथून आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या गोंडोला किंवा केबल कारमध्ये बसून प्रवास करावा लागतो. हा प्रवास आणखीनच रोमांचक असा आहे. या केबल कारची ( रोटेअर ) रचना अशा प्रकारे केली आहे की ती स्वतःभोवती ३६० अंशात फिरते. आपल्याला एकाच जागी बसूनही सगळ्या बाजूचे मनोरम दृश्य पाहायला मिळते. एखाद्या पक्षाने भरारी घेऊन उंचावरून सर्व आसमंत न्याहाळावा तसेच काहीसे आपल्याला वाटते. सगळाच परिसर इतका रम्य आहे की हे पाहू की ते पाहू अशी अवस्था होते. कॅमेरा कोणत्याही दिशेला फिरवला तरी जो कोणता फोटो येईल, तो निसर्गरम्य आणि सुंदरच असेल अशी खात्री असते. अशा वेळी ज्या विज्ञानाने आपल्याला या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या त्याचे खरोखरच आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे वाटते. २० ते २५ मिनिटांचा हा प्रवास करून आम्ही माउंट टिटलिसच्या शिखरावर पोहोचलो. 


इथे पर्यटकांसाठी एक मोठी केबिन आहे. तिच्यातून बाहेर पडलो की आपण सरळ माउंट टिटलिसच्या बर्फाच्छादित प्रदेशात प्रवेश करतो. बाहेर पडलो की बर्फाच्छादित शिखराचा जो अद्भुत नजारा दिसतो, त्या आनंदाचे वर्णन करण्यासाठी शब्दही कमी पडतील, इतका तो सुंदर आहे. आम्ही गेलो त्यावेळी अत्यंत आल्हाददायक असे हवामान होते. सर्वत्र बर्फाचे साम्राज्य होते पण कडाक्याची थंडी नव्हती. वातावरणाची सुखद साथ आम्हाला मिळत होती. इथली शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. आजूबाजूचा बर्फाच्छादित प्रदेश चांदीप्रमाणे चमकत होता तर स्वच्छ सूर्यप्रकाशाने बर्फाच्छादित शिखरांवर सोनेरी मुलामा चढवला होता. पर्यटक बर्फात फिरण्याचा, खेळण्याचा आनंद घेत होते. तिथे एक झुलता पूल आहे. आपण चालताना तो हलतो. त्यावरून चालण्याला cliff walk म्हटले जाते. अति उंचावरील आणि दुर्गम भागातील ३००० मी. उंचीवर हा पूल आहे. त्याची लांबी साधारणपणे १०० मी असून रुंदी ३फूट आहे. या पुलावरून चालताना एक वेगळाच थरार अनुभवास येतो. आजूबाजूची बर्फाच्छादित शिखरे आणि खाली खोल दरी असा रोमांच अनुभवता येतो. 


इथे आल्यानंतर मला आपल्याकडील हिमालय पर्वतातील बर्फाच्छादित पर्वतशिखरांची आठवण झाली. आपल्याकडेही हिमाचल प्रदेश, काश्मीर, कुलू मनाली, लेह लडाख त्याचप्रमाणे हिमालयातील अनेक ठिकाणे अतिशय रम्य आहेत. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत भारतात जेवढी विविधता आणि नावीन्य आढळते, तेवढे अन्य देशात क्वचितच आढळते. पण या सगळ्या गोष्टींचा भारताने आपला पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी पद्धतशीर फायदा करून घ्यायला हवा. त्यामुळे अधिकाधिक परदेशी पर्यटक भारताकडे आकर्षित होऊन भारताला अधिक परकीय चलन मिळू शकेल आणि भारतीय वस्तुंना ग्राहक !


भारतीय पर्यटकांचे आणि बॉलिवूडचे स्वित्झर्लंड,  माउंट टिटलिस, ल्यूसर्न ही अतिशय आवडती ठिकाणे आहेत.  इथे बाहेर जवळच शाहरुख खान आणि काजोलचे चित्र लावले आहे. यश आणि आदित्य चोप्रांच्या ' दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' आणि अन्य अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथे म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये झाले आहे. इथे स्विस सरकारने किंवा पर्यटन विभागाने शाहरुख आणि काजोलचे जे चित्र लावले त्यावरून भारतीय कलाकार परदेशातही किती लोकप्रिय आहेत हे लक्षात येते. 


इथून पुढे फिरण्यासाठी ice flyer मध्ये बसून जाण्याचा थरार अनुभवता येतो. सहा लोकांना बसता येईल अशी एक सरळ बाकवजा लिफ्ट असते. आपण बसलो की त्याची पुढची बाजू लॉक होते. आपले पाय खाली मोकळे राहतात. या आईस फ्लायर मध्ये बसून पुन्हा एकदा खाली जाण्याचा आणि वर येण्याचा आनंद लुटता येतो. हा एक अगदी रोमांचक अनुभव असतो. तिथून परत आलं की मग आपला माउंट टिटलिसवरून परतीचा प्रवास सुरु होतो. आपण खाली आलो की दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर रेस्टॉरंट्स आहेत. इथे एक फोटो स्टुडिओ देखील आहे. आपल्याला हवं तर आठवण म्हणून आपण इथे एखादा फोटो काढू शकतो. पण इथले दर मात्र खूपच जास्त आहेत. आम्ही परत आलो तेव्हा साधारण दुपारचा एक वाजला होता. इथेच एका हॉटेलमध्ये आम्ही भारतीय पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. इथे आम्हाला गरमागरम पावभाजीचे जेवण मिळाले. सोबत स्वीट्स आणि इतर पदार्थ होतेच. स्वित्झर्लंडमध्ये इतक्या उंचीवर आणि तेही भारतीय जेवण मिळाल्याचा आनंद काही वेगळाच होता. 


त्यानंतर आम्ही ल्यूसर्न शहरात आलो. ल्यूसर्न शहर म्हणजे अप्रतिम निसर्गसौंदर्य ! हिरवीगार कुरणे, मनमोहक पर्वतरांगा आणि आकाशाचं निळं प्रतिबिंब पडलेली पारदर्शक स्वच्छ सरोवरे यांनी ल्यूसर्न वेढलेलं आहे. शिवाय ल्यूसर्न लेकमुळे त्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढले आहे. त्यामुळे हे गाव अगदी स्वप्नवत वाटते. तेथील रस्ते पाहून वाटते ' ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा '. स्विस लोक कलाप्रेमी आणि उत्सवप्रेमी आहेत. इतरांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यावर त्यांचा भर असतो. ते अतिशय छान इंग्रजी बोलतात. स्वित्झर्लंडमध्ये सर्वत्र बस, ट्राम आणि ट्रेनची निर्दोष आणि चोख व्यवस्था आहे. जून ते सप्टेंबर या काळात स्वित्झर्लंडमधील ठिकाणे पर्यटकांनी फुललेली असतात. या काळात येथील हवामान आल्हाददायक असते. या काळात अनेक संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. 


तिथे आम्हाला खरेदीसाठी वेळ देण्यात आला. आम्ही गेलो त्या भागात मोठमोठी दुकाने होती. स्वित्झर्लंडमधील चॉकलेट्स, चीज, वाईन आणि घड्याळे जगप्रसिद्ध आहेत. त्याशिवाय इतरही बऱ्याच वस्तू मिळतात. अशा स्टोअर्समध्ये खरेदीसाठी बरीच गर्दी होती. आपली भारतीय मंडळीही बऱ्यापैकी सर्वत्र दिसत होती. अशाच एका तीन मजली इमारतीत आम्ही खरेदीसाठी गेलो होतो. तिथे मी एका ठिकाणी थोडा वेळ बसलो. माझ्या शेजारीच एक आपल्या महाराष्ट्रातूनच आलेल्या आजीबाई बसल्या होत्या. त्यांची सून बरोबर होती आणि खरेदीसाठी गेली होती. थोड्याच वेळात ती परत आली. तिने काय खरेदी केलं असेल बरं ? आपल्याकडे आपण गायी बैलांच्या गळ्यात बांधतो तशा तीनचार घंटा तिच्या हातात होत्या. त्यांची युरोमध्ये किंमत चुकती करून तिने त्या आणल्या होत्या. दुसरे काही घेण्याऐवजी या बाईने या घंटा का घेतल्या असाव्यात असा प्रश्न मला पडला. मला वाटलं यांच्याकडे शेतात गायीबैल वगैरे असावेत आणि त्यांच्यासाठी त्या घेतल्या असाव्यात. मी त्या आजींना विचारलं, ' तुमच्याकडे गायीबैल आहेत का ? ' त्या हसू लागल्या. त्यांनी विचारलं ' असं का म्हणताय ? ' मी म्हटलं, ' अहो, या घंटा पाहून मला तसं वाटलं. ' त्या म्हणाल्या, ' नाही हो, आम्ही सुवेनिर ( आठवण ) म्हणून या घेऊन जातो आहोत. ' कोणी काय खरेदी करावी हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 


तिथे खरेदीसाठी फिरणारे एक महाराष्ट्रीयन तरुण जोडपे मला दिसले. त्यांचे विंडो शॉपिंग सुरु होते. त्या बाईला एका ठिकाणी एक आकर्षक असा सिगारेट लायटर दिसला. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, ' अरे, तू सिगारेट पीत नाहीस, नाहीतर तुला हा गिफ्ट केला असता. ' तिच्याबरोबर असलेला तो तरुण हसायला लागला, ' मग मी आता सिगारेट सुरु करायला हरकत नाही. ' अशा गमतीजमती सुरु होता. तेथील खरेदी आटोपल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेरच्या बाजूला स्विस घड्याळाची अत्यंत आकर्षक अशी दुकाने होती. काचेच्या शोकेसमध्ये आकर्षक अशी स्विस घड्याळे मांडून ठेवली होती. इथेही एक मोठी स्विस बँकेची इमारत आम्हाला दिसली. तेवढ्यात पाऊस सुरु झाल्याने आम्ही आडोसा म्हणून स्विस बँकेच्या आश्रयाला थांबलो. स्विस बँकेत ठेवायला तर आमच्याकडे पैसे नव्हते पण कोणतीही ठेव न ठेवता पावसात स्विस बँकेने आम्हाला आश्रय दिला होता. खरेदीसाठीचा वेळ संपल्यानंतर एका ठरलेल्या ठिकाणी सर्व जण एकत्र जमले. तिथून आम्हाला लायन मॉन्युमेंट पाहण्यासाठी नेण्यात आले. अरुंद अशा गल्लीबोळातून आम्ही साधारणपणे १०/१५ मी. चालत गेलो. भोवतालचा परिसर एखाद्या वाड्यासारखा होता. त्याच्या कमानीतून आम्ही एका मोकळ्या जागेत प्रवेश केला. पाहतो तर समोर एक छोटासा तलाव होता आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या खडकावर एका घायाळ अशा मरणोन्मुख सिंहाचे भव्य असे शिल्प होते. १७९२ च्या सुमारास झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान जे स्विस सैनिक युद्धात मारले गेले, त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी हे शिल्प उभारले आहे. हे शिल्प २० फूट उंच असून ३३ फूट लांबीचे आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी या शिल्पाबाबत बोलताना म्हटले आहे की अशा प्रकारचे हे जगातील एकमेव शिल्प आहे. त्यातील मरणोन्मुख सिंह पाहून पाहणाऱ्याच्या भावना हेलावल्याशिवाय राहत नाहीत. 


येथील चॅपल ब्रीजला ( कापेलब्रुक ब्रीज ) पर्यटक आवर्जून भेट देतात. हा एक अतिप्राचीन असा लाकडी पूल आहे. या पुलावर सुंदर चित्रे रेखाटली आहेत. पुलाच्या बाहेर दोन्ही बाजूला नयनरम्य अशी फुलांची सजावट केली आहे. ल्यूसर्न मधील ऱ्युसस नदीवर ६७० फूट लांबीचा हा ब्रीज आहे. मध्यंतरीच्या काळात हा पूल एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. पण ल्यूसर्नचा मानबिंदू असलेल्या या पुलाची नव्याने उभारणी करून त्याला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न स्विस लोकांनी केला. 


आता संध्याकाळ होत आली होती. आता आमची सफर लेक ल्यूसर्नमधील क्रूझमधून होणार होती. ते एक वेगळेच आकर्षण होते. काही क्रूझ नुसतेच पार्क करून ठेवले होते. त्यावर हॉटेल्सची सोय होती. आम्ही क्रूझमध्ये स्थानापन्न झाल्यानंतर तेथील दोन स्थानिक कलाकारांनी आपली वाद्ये वाजवून आमचे मनोरंजन केले. आमचे गाईड राहुलजी गमतीने म्हणाले, ' हे तात्या आपल्याला वाद्य वाजवून दाखवतील.' आणि सगळेच हसायला लागले. राहुल यांनी युरोपातील कोणाला तात्या तर कोणाला मावशी बनवलं होतं.त्यामुळे  आपल्याकडील तात्या, मावशी वगैरेची आठवण येऊन हसू येत होतं. या ल्यूसर्न लेकमध्ये साधारणपणे एक तास जलविहार झाल्यानंतर आम्ही बसने आमच्या रूममध्ये परतलो. आजची आमची रात्र स्वित्झर्लंडमधील शेवटची रात्र होती. उद्या सकाळी आम्ही स्वित्झर्लंडला गुड बाय म्हणून इटलीतील व्हेनिस शहराकडे प्रयाण करणार होतो. ( क्रमशः )


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 


१९/०८/२०२४


प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२


 ( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...