उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग १२
बहुमुखी प्रतिभा
रवींद्रनाथांच्या रूपाने बहुमुखी प्रतिभा लाभलेला स्वर्गलोकातील एक गंधर्वच जणू भूतलावर आला होता. कविता तर ते वयाच्या आठव्या नवव्या वर्षांपासून करतच होते. त्यामुळे रवींद्रनाथ हे प्रामुख्याने कवींद्रनाथ जरी असले तरी कथा, कादंबरी, नाटक, नृत्य आणि संगीत यासारख्या विविध कला आणि साहित्याच्या प्रांतात त्यांनी मनमुराद मुशाफिरी केली आणि कलेच्या प्रत्येक प्रांतात आपल्या शैलीचा अजोड ठसा उमटवला. त्यांच्या कविता, कथा, चित्रं, रवींद्र संगीत हे अनेक पिढयांना प्रेरणा देणारं ठरलं. त्यारूपाने एक समृद्ध वारसा त्यांनी मागे ठेवला.
मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची जी गती होती, त्याला कारणीभूत त्यांना लहानपणी मिळालेले संस्कार आणि वातावरण होते. आपल्या आयुष्यावर आपले आईवडील, गुरु, मित्र आणि सभोवतालचे वातावरण या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व आकार घेत असते. रवींद्रनाथांना त्यांच्या घरातलं वातावरण या सगळ्यांसाठी अतिशय अनुकूल होतं. त्यांच्या जोराशांको वाड्यात ' सत्य सुंदर मंगलाची ' नित्य आराधना सुरु असायची. त्यांचे मोठे बंधू ज्योतीदा काव्यलेखन करीत आणि घरातील सर्वांसमोर त्याचं सुरेख चालीत वाचन होत असे. घरातील सगळेच त्याचा आनंद घेत. या आनंदलहरींचा परिणाम रवींद्रनाथांवर न होता तरच नवल !
त्यांच्या घरात नेहमीच त्या काळातील कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे जाणेयेणे सुरु असायचे. छोट्या मोठ्या मैफली सुरु असायच्या. एखाद्या टिपकागदासारखे संवेदनशील मन असलेला छोटा रवी या सगळ्या गोष्टी आपल्या मनात नीट साठवून घेई. लहानपणी रुजलेली ही बीजे त्याच्यात पुढे अंकुरित होऊन एक मोठे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व जन्माला आले.
त्या काळात कारणाशिवायच अकृत्रिम प्रेमाने लोकांचे त्यांच्या घरी जाणेयेणे असायचे. उदार वृत्तीने, आपुलकीच्या भावनेतून माणसे सहज एकमेकांकडे जात असत. मनमुराद गप्पागोष्टी, अधूनमधून उडणारी हास्याची कारंजी यामुळे घरात एक प्रकारचा जिवंतपणा आणि चैतन्य कायम असायचे. पण पुढे पुढे हे सुंदर वातावरण हरवल्याची खंत देखील रवींद्रनाथांनी व्यक्त केली आहे. आज तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. आजकाल कोणी कोणाकडे कामाशिवाय जात येत नाही. काम असलं तरच लोक फोनवरून संपर्क साधतात. घरातल्या माणसांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटत चालला आहे. या प्रवृत्तीबाबत बोलताना रवींद्रनाथ म्हणतात, ' ही एक प्रकारची सामाजिक कृपणता आहे. आणि या कृपणतेसारखी कुरूप सामाजिक गोष्ट दुसरी कोणतीही नाही. '
रवींद्रनाथांच्या घरात होणाऱ्या या अनौपचारिक सभा संमेलनामुळे त्यांना आयतीच मोठी संधी प्राप्त झाली आणि त्याचा आनंद आणि लाभ त्यांनी मनापासून घेतला. रवींद्रांचे मोठे बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि त्यांची पत्नी कादंबरीदेवी हे अत्यंत प्रेमळ आणि सहृदय असे जोडपे होते. पारंपरिक आणि औपचारिक शालेय शिक्षणात न रमणाऱ्या रवींद्रनाथांना त्यांनी पूर्णपणे खुलं आकाश दिलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे रवींद्रनाथांना स्वतःतील कलागुणांचा शोध घेता आला. ज्योतिरिंद्रनाथ कवी होते तसे उत्तम संगीतकारही होते. ते उत्तम पियानो वाजवत. त्यांच्या पियानोवर वाजवण्यासाठी त्यांचे मित्र अक्षयबाबू आणि रवींद्रनाथ काव्यरचना करीत असत. तेव्हापासून गीत आणि संगीत रवींद्रांच्या रक्तात भिनू लागले होते.
रवींद्रनाथांची वहिनी कादंबरीदेवी म्हणजे एक अत्यंत सुसंस्कृत आणि कला आणि साहित्याची उत्तम जाण असलेलं व्यक्तिमत्व होतं. या वहिनीच्या पोटात अपार माया होती. तिनं रवींद्रांना आईचं प्रेम तर दिलंच पण त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामुळेच श्रेष्ठ बंगाली कवी बिहारीलाल चक्रवर्ती यांच्यापर्यंत रवींद्रांना पोहोचता आलं. बिहारीलाल चक्रवर्ती हे कवी आणि संगीतकार होते. रवींद्रनाथांना त्यांच्या रचना खूप आवडत. त्यांचा प्रभाव रवींद्रनाथांवर त्या बालवयात पडला. आपणही त्यांच्यासारखं कवी, संगीतकार व्हावं असं रवींद्रनाथांना वाटू लागलं. रवींद्रनाथांनी या बिहारीलाल चक्रवर्ती यांचं ' मॉर्निंग बर्ड ' असं सुरेख नामकरण केलं.
रवींद्रनाथ यांचं घर चित्तपूर रोडवर होतं. त्याच्या आजूबाजूला असणारं वातावरण, त्यांचे मित्र या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लहानपणीच्या कवितांमध्ये उमटलं आहे. पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पोपट आपण सगळेच पाहतो पण लहानग्या रवीला पिंजऱ्यातील बंदिवान पोपट म्हणजे पारतंत्र्याचं प्रतीक वाटला.त्यांच्या बालसाहित्यात मनाची निरागसता आहे, बालपणीचं कुतूहल आहे. सामाजिक स्थित्यंतरे आणि त्यांचा बालमनावर होणारा परिणाम मनमोकळेपणाने त्यात व्यक्त झाला आहे. रवींद्रनाथांनी आपल्या बऱ्याच कवितांमधून मातृप्रेमाचं लोभसवाणं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या एका कवितेत आई आपल्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून निद्रेला आवाहन करते आहे. ही निद्रा दूरवर असलेल्या परी राज्यातून यावी असे तिला वाटते. ती म्हणते
सानुल्या बाळाच्या डोळ्यावर झोप
उतरे कोठून सांगा कैसी ?
म्हणतात कोणी तिचे घर आहे दूर गावी लपलेले !
घर आल्हाददायक वसे कळ्या अंकुरात
छायेमध्ये जंगलाच्या काजव्यांनी लकाकते !
झोप येते बाळापाशी तेथूनचि थेट
घेते पापण्यांचा गोड पापा !
किती सुंदर गोडवा आहे या कवितेत ! ही कविता म्हणजे एक सुंदर अंगाईगीतच जणू !
त्यांची पहिली कविता ' बिष्टी पॅरी टापूर टिपूर ' ( पावसाचे थेंब ).ही म्हणावी लागेल. देशभक्तीची उत्कट भावना देखील त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला आढळते. आपल्या ' देशाची माती ' या कवितेत ते म्हणतात
देशमृत्तिके, माझे माथे तुझिया ठायी टेकवितो
विश्वव्यापिनी, विश्वमाऊली तूच तिचा अंचल तो
मनात माझ्या देही, प्राणी असशी तू गे निवासिनी
श्यामल, कोमल तुझीच मूर्ती अंतरी माझ्या सुवासिनी.
' शिशु ' हा त्यांच्या बालकवितांचा पहिला काव्यसंग्रह. पुढे वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ' बनफूल ' या नावाची एक दीर्घ काव्यकथा लिहिली. ब्रजभाषेत भानुसिंह म्हणून प्रसिद्ध कवी होते. रवींद्रनाथांनी आपल्या काही कविता ' भानुसिंहेर पदावली ' हे टोपण नाव घेऊन लिहिल्या. सुरुवातीला काव्यरसिकांना वाटले की या कविता भानुसिंहांच्याच आहेत. पण जेव्हा लहानग्या रवीचे नाव समोर आले तेव्हा केवळ चौदा पंधरा वर्षांचा मुलगा अशा कविता लिहू शकतो यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०४/०८/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
संदर्भ
रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव - डॉ नरेंद्र जाधव
शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ : आशा साठे
रवींद्रनाथ : तीन व्याख्याने - पु ल देशपांडे
सफरनामा निवडक कलाकारांचा : पल्लवी पंडित
रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र - श्रीपाद जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा