उगवतीचे रंग
आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग नऊ
झुरीचवरून आम्ही इटलीला जाण्यासाठी निघालो. या प्रवासासाठी आमची बस सज्ज होती. सकाळी लवकर नाश्ता करून आम्ही आठ वाजताच बस मध्ये बसलो. वाटेत एका ठिकाणी भारतीय पद्धतीच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण घेतले आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. स्वित्झरलँडमधील झुरीच ते इटलीमधील पडूआ हा सुद्धा सहा ते सात तासांचा प्रवास होता. पण रस्त्याने निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे प्रवासाचा कंटाळा वाटला नाही. जसजसे आम्ही स्वित्झर्लंड पासून दूर जाऊ लागलो, तसतसा हवामानात बदल जाणवू लागला. आधीचे थंड आणि आल्हाददायक हवामान आता थोडे उष्ण होऊ लागले होते आणि आपण एका वेगळ्या भौगोलिक प्रदेशात प्रवेश आणि प्रवास करतो आहोत याची जाणीव व्हायला लागली होती. आमचे गाईड राहुल गमतीने म्हणाले, " तुम्हाला एकदम थंड प्रदेशातून भारतात जायला नको. भारतातील हवामानाची सवय व्हायला हवी म्हणून आपण इटलीहून भारतात परत जाणार आहोत."
संध्याकाळच्या सुमाराला आम्ही पडूआ इथे पोहोचलो. पडूआ हे इटलीतील एक जुने प्रसिद्ध ऐतिहासिक शहर आहे. इथे बरीच संग्रहालये आणि ऐतिहासिक इमारती आहेत. इटलीतील बरीच प्रसिद्ध ठिकाणे इथून जवळ आहेत. त्यामुळे बरेचसे पर्यटक येथे मुक्काम करतात. इथून व्हेनिसचे अंतर 40 किलोमीटर आहे. त्यामुळे आमचा मुक्काम पडूआलाच होता. पण आमचा प्रवेश इटलीमध्ये झाला होता.
जगातील अनेक पर्यटक दरवर्षी इटलीला आवर्जून भेट देतात. इटली म्हटले की आपल्याला पास्ता आणि पिझ्झा आठवतो. पण सगळेच इटालियन खाद्यपदार्थ जगभर लोकप्रिय आहेत. इटालियन लोक चीज आणि वाईनप्रेमी आहेत. इटालियन खाद्यपदार्थ आपले रूप, रंग, स्वाद आणि सुवास यासाठी जगभर नावाजले जातात. पण इटली केवळ खाद्यपदार्थांसाठीच प्रसिद्ध आहे असे नाही. या देशाने जगाला अनेक विचारवंत साहित्यिक आणि कलाकार दिले आहेत.
मायकेल अँजेलो, लिओनार्दो द विंची, राफेल, दोनातेल्लो हे चित्रकार आणि शिल्पकार म्हणून जगप्रसिद्ध आहेत तर दांते, बोकॅशिओ, तासो यांच्यासारखे साहित्यिक आणि गॅलिलिओ, मार्कोनी यांच्यासारखे वैज्ञानिक इटलीतच जन्मले आहेत. ऑपेरा या नृत्य नाट्याचा उगम इथलाच त्याचप्रमाणे पाश्चिमात्य संगीत प्रकारातील सिम्फनी, कॉन्सर्ट यांची निर्मिती इथेच झाली. पियानो आणि व्हायोलिन या वाद्यांची जननी इटली आहे. उद्योग आणि व्यापारातही इटली आघाडीवर आहे.
इटलीला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. इटलीच्या उत्तरेला आल्प्स पर्वतांची रांग आहे तर दक्षिण कडेला एका बाजूने भूमध्य समुद्र आणि दुसऱ्या बाजूने अडियोट्रिक समद्र यांची साथ लाभली आहे. त्यामुळे उत्तरेला हिमाच्छादित पर्वत आणि दक्षिणेला सुंदर समुद्रकिनारे अशी निसर्गाची देणगी इटलीला लाभली आहे. फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया इ देशांची सीमा इटलीला लागून आहे. इटलीची राजधानी रोम शहर त्याचप्रमाणे नेपल्स, कॅप्री, फ्लॉरेन्स, मिलान, पिसा, व्हेनिस इ .ठिकाणे पर्यटकांची आकर्षणे ठरली आहेत. जगभरातून पर्यटक ही ठिकाणे पाहण्यासाठी इटलीला येतात. धार्मिक स्थळांची यात्रा करणारे लोक इटलीमधील व्हॅटिकन सिटी या ठिकाणाला भेट देतात. आमच्या सहलीच्या ठिकाणांमध्ये मात्र इटलीतील व्हेनिस आणि पिसा ही दोनच ठिकाणे होती आणि इटलीतीलच मिलान या ठिकाणाहून आमचे परतीचे विमान निघणार होते.
९जून २०२४ हा आमच्या सहलीचा आठवा दिवस होता. आम्ही सकाळी लवकर तयार होऊन बस मध्ये बसलो आणि व्हेनिस शहराची सफर करण्यासाठी निघालो. कालव्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर यापूर्वी केवळ चित्रपटात पाहिले होते पण आता ते प्रत्यक्ष बघण्याचा योग आला होता. व्हेनिस हे शहर सिटी ऑफ लाईट, सिटी ऑफ वॉटर, सिटी ऑफ ब्रिजेस अशा विविध नावांनी सुद्धा ओळखले जाते. ११७ लहान लहान बेटं आणि १५० कालव्यांनी व्हेनिस शहर तयार झालं आहे. या शहरात विविध कालवे आहेत आणि शहरातील विविध लहान लहान बेटे ४०० विविध पुलांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. म्हणूनच हे शहर म्हणजे सिटी ऑफ वॉटर आणि सिटी ऑफ ब्रिजेस असे म्हटले जाते. या शहरात आपल्याला कार, बस, टॅक्सी, रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहनांचा वापर केलेला दिसत नाही किंबहुना तो करता येणंच शक्य नाही अशी इथली परिस्थिती आहे. सगळी वाहतूक पारंपारिक होड्यांमधून म्हणजेच ज्याला आपण गोंडोला म्हणतो त्यातून होते. स्थानिक लोक क्रूज, मोटर लाँचेस, वेपरेटो, वॉटर बसेस इत्यादींचा वापर करतात.
आपल्यासारख्या बाहेरून आलेल्या पर्यटकांना कदाचित या गोष्टींचे आकर्षण वाटेल पण याच गोष्टी व्हेनिसच्या प्रगतीत अडथळा ठरल्या आहेत. व्हेनिसच्या दृष्टीने जणू काळ थांबला आहे. या शहराची औद्योगिक किंवा सांस्कृतिक प्रगती त्यामुळे होत नाही. दरवर्षी येथील हजारो तरुण नोकरी धंद्याच्या शोधासाठी बाहेर पडत आहेत. साधारणपणे ३०/४० वर्षांपूर्वी येथील लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास होती. आता ती केवळ ४०/५० हजारावर येऊन पोहोचले आहे.
ज्याला ग्रँड कॅनॉल म्हटले जाते तो म्हणजे समुद्राचे बॅकवॉटर आहे. येथील छोट्या छोट्या बेटांवर जाण्यासाठी कालवे आहेत. त्यातून गोंडोला किंवा होड्यांमधून आपल्याला प्रवास करावा लागतो. अशाच गोंडोलामधून आम्ही जलप्रवास केला. येथील पारंपारिक नावाडी त्या मोठ्या कौशल्याने वल्हवतात. त्यांची घरे आणि दुकाने देखील त्या बेटांवरच आहेत. पण या कालव्यांमधील पाणी मात्र स्वच्छ नाही त्याला एक प्रकारची दुर्गंधी आहे. कारण हे वाहते पाणी नाही त्याचप्रमाणे हे लोक इथे वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे त्यांचे सांडपाणी देखील या पाण्यातच सोडले जाते.
येथील नौकेत बसल्यावर आम्हाला अमिताभ बच्चनच्या ' द ग्रेट गॅम्बलर ' या चित्रपटातील ' दो लब्जो की है दिल की कहानी...' हे गाणं आठवलं. तशाच प्रकारचे अगदी रम्य वातावरण इथे होतं. ( क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/८/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा