मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग अकरा

  उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग अकरा 

आज तारीख होती १० जून २०२४. आमच्या युरोपवारीचा शेवटचा दिवस. सकाळी आम्ही पिसा येथील झुकत्या मनोऱ्याला भेट देणार होतो आणि दुपारून मिलान या इटलीतील मोठ्या व्यापारी शहरात पोहोचून तेथून आमचे परतीचे विमान पकडणार होतो. त्यामुळे आमचे सामान वगैरे रात्रीच आवरून आणि बांधाबांध करून ठेवले होते.  पहाटे लवकर उठून आणि अंघोळी वगैरे आटोपून आम्ही तयार झालो. आमच्या बॅग्स बसमध्ये ठेवून सकाळी सहालाच पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. पाडोवा ते पिसा हे जवळपास २९५किमीचे अंतर आहे. साधारणपणे साडेनऊ दहाच्या सुमारास आम्ही पिसा येथे पोहोचलो. बसमध्येच नाश्ता झाला होता. 

एके काळी पिसा जागतिक व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले असे बंदर होते. इटलीतील फ्लॉरेन्स या शहराचा संपूर्ण व्यापार पिसामधूनच चालत होता. त्यामुळे पिसाची भरभराट झाली. त्या काळात इटलीतील फ्लॉरेन्स, व्हेनिस, पिसा इ. शहरांची सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगती झाली. एकापेक्षा एक अशा सुंदर वास्तू बांधण्यात आल्या. सुंदर राजवाडे, कॅथेड्रल्स, चर्चेस, बेल टॉवर्स बांधले गेले. चित्रकला, वास्तुशास्त्र, शिल्पकला आदींची भरभराट झाली. त्या काळातील वैभवाच्या खुणा पिसा आजही आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहे. पण पिसाची ही व्यापारातील प्रगतीच त्याचा घात करणारी ठरली. या वैभवाकडे आणि महत्वाचे बंदर असलेल्या पिसाकडे आक्रमकांनी आपला मोर्चा वळवला. १२८४ साली जिनोआ येथील आरमाराने आक्रमण करून पिसाच्या आरमाराचा निःपात केला. पिसाची संपत्ती, वैभव लुटण्यात आले. तिथूनच पिसाच्या वैभवाला जी उतरती कळा लागली, ती कायमचीच ! आज पिसा म्हणजे गतकाळातील आपल्या आठवणी उराशी जपणारे एक चैतन्य हरवलेले शहर वाटते. ' रम्य तो भूतकाळ ' असेच तेथील नागरिक मनात म्हणत असावेत. आपल्याकडील कुतुबमिनार, चारमिनार सुद्धा या पिसा येथील मनोऱ्यापेक्षा काही कमी प्रेक्षणीय नाहीत. पण येथे आजतरी  झुकत्या मनोऱ्याशिवाय पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासारखे दुसरे काहीही नाही. आज इटलीला आणि पिसाला परकीय चलन मिळवून देण्यात आणि तेथील व्यापाराला हातभार लावण्यात या मनोऱ्याचा सिंहाचा वाटा आहे. 

पिसा येथील मनोऱ्याची एक गंमत आहे. लांबून तो एखाद्या झोकांड्या खात चालणाऱ्या दारूडया माणसासारखा झुकलेला दिसतो. त्याच्या बांधकामाच्या वेळी त्याचा पाया खचला. पाया खचल्याने तो कलला. एखाद्या गोष्टीचा पाया चुकला की पुढचे सर्वच चुकते. पण हा खचलेला पायाच पिसाच्या मनोऱ्याचे आकर्षण ठरला. ११७३ साली त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. पांढऱ्याशुभ्र संगमरवराचा वापर त्यासाठी करण्यात आला. १८५ फूट उंची आणि आठ मजली बांधकाम करायचे असे ठरवले गेले होते. पण पहिले तीन मजले पूर्ण झाल्यानंतर तो एका बाजूला खचतो आहे हे लक्षात आले. पुढे त्याची दुरुस्ती करण्याचे, पायात सिमेंट वगैरे भरण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले पण या मनोऱ्याने त्या प्रयत्नांना दाद दिली नाही. बरे हा मनोरा सरळ असता, तर पर्यटक तो पाहायला आलेच नसते. तो झुकला म्हणूनच तो जागतिक पर्यटनस्थळ ठरला. पण तो दिवसेंदिवस अधिकाधिक झुकतो आहे असा संशोधकांचा निष्कर्ष आहे. आधी त्याचा कलणे १४ फुटापर्यंत होते. आता ते १७-१८ फुटांपर्यंत झाले आहे. गमतीने असे म्हणावे लागते की पर्यटकांसमोर हा मनोरा झुकतो आहे. पण याचे झुकणे आणखी वाढत गेले तर एक दिवस... कुछ भी हो सकता हैं असे म्हणावे लागेल. असे म्हणतात की प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओने याच टॉवरवरून वेगवेगळ्या वजनाच्या ( वस्तुमानाच्या ) वस्तू खाली टाकल्या. त्या सर्व एकाच वेळी जमिनीवर पडतात असे त्याला आढळून आले. 

आम्ही गेलो तेव्हा या ठिकाणी पर्यटकांची भरपूर गर्दी होती. काही लोक या मनोऱ्यात प्रवेश करून वरच्या गॅलरीपर्यंत पोहोचले होते. पूर्वी काही काळासाठी मनोऱ्याच्या सुरक्षिततेसाठी पर्यटकांना वर जाऊ दिले जात नव्हते. आता मात्र पर्यटक वरच्या मजल्यापर्यंत जाऊन मनोरा पाहू शकतात. या मनोऱ्यातील प्रत्येक मजल्याच्या भोवती सुंदर कमानी आहे. त्यात उभे राहून बाहेरील परिसराचे विलोभनीय दर्शन घडते. मनोऱ्याचे एकूणच  बांधकाम फार सुंदर आहे. मनोऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपले स्वतःचे फोटो काढणाऱ्यांची तर कमी नव्हती. हा मनोऱ्याचा जो परिसर किंवा चौक आहे त्याला मिरॅकल स्क्वेअर म्हटले जाते. या परिसरातच आणखी तीन ऐतिहासिक आणि जवळपास आठशे नऊशे वर्षे जुन्या असलेल्या इमारती आहेत. त्याही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र येथे एक गोष्ट समान आढळते. हा मनोरा असो की कॅथेड्रल किंवा बॅप्टिस्टरी या सगळ्याच इमारतींना एक प्रकारचा झुकाव आहे. फक्त हा झुकाव मनोऱ्याइतका जास्त नसल्यामुळे तो फारसा लक्षात येत नाही. 

अशीच एक इमारत म्हणजे डोमो किंवा कॅथेड्रल. गोलाकार आकाराच्या या कॅथेड्रलची बांधणी सुद्धा अतिशय आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे. हे देखील झुकत्या मनोऱ्याप्रमाणे पांढऱ्या शुभ्र मार्बल मध्ये बांधले असून त्याला ७० खांब आहेत. हे अतिशय विशाल असे चर्च आहे. त्याचे भव्य प्रवेशद्वार ब्रॉन्झ या धातूपासून बनवले आहे. या चर्चमध्ये देखील गॅलिलिओने एक प्रयोग केला होता. त्याने एकदा या चर्चमधला दिवा हेलकावे घेताना पाहिला. त्यातूनच त्याचा एक सिद्धांत पुढे आला. दिवा किंवा कोणतीही वस्तू असो, तिचा हेलकावा किंवा झोका छोटा असो की मोठा, लंबकाचे वजन जास्त असो की कमी, त्याला एका आंदोलनासाठी लागणार वेळ हा सारखाच असतो असा निष्कर्ष त्याने काढला. मात्र दोरीची लांबी जशी असेल त्यानुसार हा वेळ बदलतो. गॅलिलिओच्या या ' गतीच्या नियमाचा ' उपयोग करून लंबकाचे घड्याळ बनवण्यात आले. गॅलिलीओचा हा दिवा आजही तेथील कॅथेड्रलमध्ये आहे. 

या कॅथेड्रलच्या जवळच बॅप्टिस्टरी आहे. ख्रिश्चन धर्मियांचे बाप्तिस्मा विधीचे हे एक पवित्र ठिकाण आहे. याचीही बांधणी शुभ्र अशा संगमरवरात करण्यात आली आहे. यात लाल ठिपक्यांच्या ग्रॅनाइटचाही वापर करण्यात आला आहे. सेंट जॉन यांना समर्पित असलेली ही इटलीतील सर्वात मोठी बॅप्टिस्टरी मानली जाते. या बॅप्टिस्टरीच्या शेजारीच सेमीट्री आहे. ही देखील भव्य आहे. याठिकाणी मान्यवर व्यक्तींचे दफन केले जात असे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ही स्मशानभूमी आहे. असे सांगितले जाते की ही सेमीट्री बांधण्यासाठीची पवित्र अशी माती खास जेरुसलेमहून आणण्यात आली आहे. हे पिसामधील मिरॅकल स्क्वेअर पाहण्यात बराच वेळ सहज निघून गेला. 

येथून बाहेर पडल्यावर छोटया छोट्या दुकानांची एक रांग होती. पोपटी हिरव्या रंगाची ही दुकाने आकर्षक पद्धतीने मांडली होती. पिसा टॉवर आणि परिसर पाहून झाल्यावर पर्यटकांचा मोर्चा या दुकानांकडे वळत होता. या दुकानांमध्ये आठवण म्हणून नेण्यासाठी विविध वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या. येथेही आपल्याला खरेदी करताना भाव करावा लागतो. विविध प्रकारचे कपडे, टी शर्ट्स, की चेन्स, हस्तकलेच्या विविध वस्तू येथे मिळतात. 

पिसा येथील या मिरॅकल चौकाच्या जवळच पाठीमागे एक राजस्थान म्हणून हॉटेल आहे. तिथे आपले भारतीय पद्धतीचे सुंदर जेवण मिळते. या हॉटेलचा मालक सुनील म्हणून एक राजस्थानातून आलेला युवक. मोठ्या कष्टातून पुढे आलेला. आम्ही येणार म्हणून त्याला सांगून ठेवले होते. त्याला त्याचा कोण आनंद झाला ! त्याने आमच्यासाठी स्वागत म्हणून खास इटालियन पिझ्झा आणि पास्ता बनवला होता. अतिशय सुंदर, रुचकर आणि गरमागरम जेवण घेऊन आम्ही तृप्त झालो. या सुनीलची रोमहर्षक कथा पुढील भागात सांगण्याचा विचार आहे. 

आम्ही लवकरच पिसाला गुडबाय केला आणि मिलानला जाण्यासाठी सज्ज झालो. इटालियन लोक याला मिलानो म्हणतात. इटलीतील लोम्बार्डी प्रांतातील रोमच्या खालोखाल हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर म्हणजे जागतिक फॅशनचे माहेरघर. स्त्रियांच्या हॅट बनवणाऱ्याला इंग्रजीत मिलिनर म्हटले जाते. याच शहराच्या नावावरून हा शब्द निर्माण झाला असे म्हटले जाते. हे एक मोठे व्यापारी केंद्र देखील आहे. येथे अनेक उत्तम संग्रहालये आहेत. येथील अँब्रोझियाना पॅलेसमध्ये विविध नामवंत चित्रकारांची चित्रे आहेत. त्यात बोटीचेली, टिशन, रॅफेल आणि लिओनार्दो द विन्ची यांच्या चित्राचा समावेश आहे. येथील लिओनार्दो द विंचीचे ' द लास्ट सपर ' हे चित्र प्रसिद्ध आहे आणि ते पाहण्यासाठी आवर्जून लोक तेथे जातात. काळाच्या ओघात आता हे चित्र मात्र अस्पष्ट होत चालले आहे. मिलान येथून आम्हाला रात्री परतीचे विमान होते. तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही दिल्लीला पोहोचणार होतो. रात्री दहा वाजता विमानतळावरील तपासणीचे सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही एअर इंडियाच्या विमानात बसलो आणि विमानाने भारताच्या दिशेने झेप घेतली. आता मातृभूमीची ओढ लागली होती. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२७/८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...