मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग सहा

  उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग सहा 

ॲन इव्हिनिंग इन पॅरिस असं म्हणण्यापेक्षा टू इव्हिनिंग्स इन पॅरिस आम्ही घालवल्या. खरंतर वेळेअभावी पॅरिसमधील काही महत्वाची ठिकाणे पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यात प्रामुख्याने लुव्र म्युझियमचा समावेश होता. त्या ठिकाणी जगप्रसिद्ध असलेले मोनालिसाचे चित्र आहे. असो. इतक्या कमी वेळात सर्व ठिकाणे पाहणे शक्य नव्हते. पण जे पाहिले तेही खूप होते आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहणारे होते. पॅरिसमधील नयनरम्य आठवणी डोळ्यात आणि मनात साठवीत आम्हाला आता पुढच्या प्रवासाचे वेध लागले होते. आमचे टूर मॅनेजर राहुल यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाची माहिती दिली. त्यानुसार आम्हाला सहा जूनच्या सकाळी आठ वाजता तयार होऊन बसमध्ये बसायचे होते. कुठं जाणार होतो बरं आम्ही दुसऱ्या दिवशी ? तर आमचे आणि सर्वांचे ड्रीम डेस्टिनेशन असलेले स्वित्झर्लंड ! खरोखरच आयुष्यात कधी स्वित्झर्लंडला जायला मिळेल अशी कल्पनाही केली नव्हती. पण म्हणतात ना सत्य कधी कधी कल्पेनेपेक्षाही अद्भुत असू शकतं. आणि तीच गोष्ट प्रत्यक्षात येणार होती. आम्ही तसे दिवसभराच्या प्रवासाने थकलो होतोच. विश्रांतीची गरज होती. सामानाची सगळी बांधाबांध करून सकाळी निघायची तयारी करून ठेवली. उद्याच्या प्रवासाची स्वप्ने डोळ्यात होती. ॲन इव्हिनिंग इन पॅरिस चित्रपटातलं ' रातके हमसफर थक के घर को चले..' गाणं आठवत होतं. ' झुमती आ रही सुबह ' का इंतजार था. 

सकाळी साडेसातला मस्त नाश्ता झाला. विविध फळे, ज्यूस, चहा, कॉफी,दूध, विविध ब्रेडचे पदार्थ, कॉर्नफेक्स आदी गोष्टींची नाश्त्याला रेलचेल असायची. ब्रेडच्या स्लाइस बेक करता येत होत्या. त्यावर बटर, जॅम इ.  उपलब्ध होते. आपल्याकडील दह्यासारखंच तिकडे सगळीकडे योगर्ट छान मिळतं. तेही दररोज मुबलक उपलब्ध होतं. अशी दररोज खाण्याची, जेवणाची चंगळ होती. प्रत्येकाने हवा तसा नाश्ता घेतला. 

आपल्याकडे आपण प्रवासात घेतो तशा पाण्याच्या बाटल्या युरोपात विकत घेण्याची गरज पडत नाही. तुमच्याकडे पाण्यासाठीची रिकामी बाटली असली म्हणजे झालं. युरोपमधील अगदी बाथरूममधील पाणी जरी घेतलं तरी ते आपल्याकडील आर ओ च्या पिण्याच्या पाण्याइतकं शुद्ध असतं. पाण्याची एवढी मुबलक उपलब्धी युरोपमध्ये असताना साहेबांच्या वागण्याची एक पद्धत मात्र जरा विचित्रच वाटली.  टॉयलेटमध्ये आपल्याकडे असतो तसा पाण्याचा जेट स्प्रे किंवा हॅन्ड स्प्रे तिकडील कमोडमध्ये नसतो. स्वच्छतेसाठी पेपरचा वापर करायचा. पुढे इटलीत गेल्यावर तर एक वेगळीच गमतीदार पद्धत दृष्टीस पडली. इटलीत बसण्यासाठीचा कमोड वेगळा आहे आणि त्याच्या शेजारी तसाच कमोड स्वच्छतेसाठी केलेला असतो. तिथे मात्र पाण्याची सोय असते. असो. हे थोडं विषयांतर झालं. 

बरोबर आठ वाजता बस निघाली. युरोपातील रस्ते तर सगळे सुंदर आणि गुळगुळीत. त्यात मर्सिडीझ बेन्झसारखी अत्याधुनिक बस. पोटातलं पाणीही हलत नाही. रस्त्यांवर कुठेही घाण, केरकचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदी गोष्टी आढळणार नाहीत. आपल्याकडे गाडी चालवताना रस्त्यात मध्येच भटकी कुत्री, गाईगुरे इ. येऊन प्रवासात जसा अडथळा आणतात किंवा अपघाताला कारणीभूत होतात, तसे अडथळे तिकडे येत नाहीत. आम्हाला एकदाही गायी, म्हशी, कुत्री आदी प्राणी रस्त्यात आढळले नाहीत. तेथील गाड्या हायवेवर वाहतुकीची शिस्त पाळतात. ट्रक, कार आपापल्या लेनमधूनच जातात. प्रत्येक ठिकाणी जी वेगमर्यादा दिलेली असती, ती काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण फार कमी असते. गाडी चालवताना कोणीही विनाकारण हॉर्न वाजवत नाही. ट्रॅफिक जॅम क्वचितच होतो. पण ट्रॅफिक जॅम झाला तरी कोणीही हॉर्न वाजवत नाही. किंवा मध्येच आपली गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत नाही. तिकडे हॉर्न वाजवणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला शिवी देण्यासारखीच वाईट गोष्ट समजली जाते. आपण रस्ता क्रॉस करत असलो तर गाड्या चक्क थांबून आपल्याला वाट करून देतात. आपल्याकडे तर आपण जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतो. आपल्याकडे चौकाचौकात जसे पोलीस दिसतात, तसे तिकडे दिसत नाहीत. सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची मात्र तुमच्या वाहनांवर नजर असते. आपल्याकडे 

आपण अत्याधुनिक वाहने घेतो पण नियमांचे आणि वेगमर्यादेचे पालन न झाल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. तिकडील वाहन चालकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी कठोर चाचण्यांचा सामना करावा लागतो. बस सारखे अवजड वाहन चालवण्याचा परवाना तीन ते चार वर्षानंतर मिळतो असे ऐकले. त्याचप्रमाणे ड्रायव्हरने किती वेळ गाडी चालवायची यासाठीचे नियम पण कठोर आहेत आणि ते कसोशीने पाळले जातात. ड्रायव्हरने दिवसा किंवा रात्री बारा तासांपेक्षा अधिक गाडी चालवण्याची परवानगी नाही. तसेच दर तीन चार तासांनी किमान अर्ध्या तासाचा ब्रेक ( विश्रांती ) घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अत्यल्प आहे. आपल्याकडे ड्रायव्हरवर अशी बंधने नाहीत. बऱ्याचदा दिवसभर गाडी चालवून दमलेला चालक रात्रीही गाडी चालवतो. मग डोळ्यावर एखाद्या क्षणी जरी झोप आली तरी ते अपघाताला निमंत्रण असते. युरोपमधील अनेक गोष्टींचे आपण अंधानुकरण करतो पण तिकडील अशा चांगल्या गोष्टी मात्र घेत नाहीत. 

आजचा आमचा प्रवास फ्रान्समधील पॅरिस ते स्वित्झर्लंडमधील झुरीच असा होता. हे जवळपास साडेपाचशे ते सहाशे किमी चे अंतर होते. पण आरामदायी बस आणि सुंदर रस्ते यामुळे प्रवासाचा शीण जराही जाणवला नाही. हवाहवासा वाटणारा हा प्रवास वाटला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते होती. शेतातील हिरवळ डोळे सुखावणारी होती. काही ठिकाणी शेतात पुष्ट गायी चरताना आढळल्या. रस्त्यावर तर माणसे नव्हतीच पण शेतातही काम करणारी माणसे अभावानेच आढळली.   

दुपारी साडेअकराच्या सुमारास आम्ही जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. आता आम्ही कुठे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो नव्हतो. तर एका निसर्गरम्य ठिकाणी थांबलो. आजूबाजूला शेते, सुंदर वृक्ष, त्या वृक्षांखाली येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जेवणासाठी लाकडी बाक आणि टेबल ठेवलेले होते. निरनिराळ्या वृक्षांखाली असे बाक आणि टेबल विखरून ठेवले होते. त्यामुळे एका संपूर्ण बसमधील प्रवासी जरी जेवणासाठी बसले तरी काही अडचण येत नव्हती. तसेच रस्त्याने आपल्या खाजगी कारने जाणारे प्रवासी देखील येथे थांबून वनभोजनाचा आनंद घेत होते. सगळे वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक होते. आम्हाला या ठिकाणी डबाबंद पण ताजे जेवण देण्यात आले. त्याचा आनंद सर्वांनी घेतला. रस्त्याच्या समोरच्या बाजूला एक मोठा मॉल होता. त्याठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था होती. सगळे फ्रेश होऊन पुन्हा आपापल्या जागी बसमध्ये स्थानापन्न झाले. जेवणासाठी प्रवासात अशाही प्रकारची सुंदर व्यवस्था असू शकते हे पाहून खूप नवल आणि आनंद वाटला. 

लवकरच आम्ही स्वित्झर्लंडच्या हद्दीत प्रवेश केला. निसर्गरम्य रस्त्यांवरून बस धावत होती. अत्यंत प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण होते. हिरवीगार वनराई, पाईन वृक्ष, मनमोहक फुले आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावे खूपच सुंदर वाटत होती. या अशा छोट्या आणि निसर्गरम्य गावात राहणाऱ्या लोकांचा क्षणभर हेवा वाटला. दुपारी तीनच्या सुमारास आमच्या मुक्कामाला पोहोचू शकलो. झुरिचमधील हॉटेल स्वीसेव्हर मध्ये आमचा मुक्काम होता. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये पाऊल ठेवलं होतं. या मनोहर स्वप्नवत असलेल्या देशाबद्दल आणखी जाणून घेऊया पुढील भागात. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

६/८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...