मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग सात

  उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग सात 

पॅरिस ते झुरिच हा आमचा बसने केलेला प्रवास जरी लांब पल्ल्याचा होता तरी युरोपमधील सुंदर रस्ते, आरामदायी बस, नयनरम्य असा भवतीचा निसर्ग आणि आल्हाददायक वातावरण यामुळे प्रवासाचा फारसा शीण जाणवला नाही. बसमध्ये एकमेकांशी गप्पागोष्टी, मधून मधून आमचे गाईड राहुल यांचं विविध प्रकारची माहिती देणं यामुळे वेळ छान गेला. दुपारी तीनसाडेतीनच्या सुमारास आम्ही आमचं ड्रीम डेस्टिनेशन आणि जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेली स्वित्झर्लंडमध्ये पाऊल ठेवलं होतं. 

निसर्गाचा वरदहस्त लाभलेला देश म्हणजे स्वित्झर्लंड. तसा हा देश छोटासाच पण आपलं वेगळेपण राखून आहे. हा देश युद्धाच्या भानगडीत पडला नाही. तटस्थेतेचं धोरण हे त्याचं आजवरचं वैशिष्ट्य. पण त्यामुळेच त्याचं निसर्गसौंदर्य जपलं गेलं आहे. निसर्गानं सौंदर्याची मुक्त उधळण या देशावर केली आहे. पण या देशातील लोकांच्या राष्ट्रप्रेमामुळे, वैज्ञानिक प्रगतीमुळे हा देश उद्योगधंदे आणि निर्यातीत आघाडीवर आहे. जर्मन, फ्रेंच आणि इटालियन असे विविध वंशाचे लोक इथे एकदिलाने नांदतात. इथली भाषा प्रामुख्याने जर्मन आहे. पण जर्मनीत बोलल्या जाणाऱ्या जर्मन भाषेपेक्षा इथली जर्मन भाषा थोडी वेगळी आहे. शिवाय फ्रेंच, इटालियन या भाषा देखील बोलल्या जातात. जगभर प्रसिद्ध असलेली सेवाभावी संस्था ' रेडक्रॉस ' इथेच सुरु झाली. स्विस बँक हे या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. सुरक्षितता, गुप्तता या सारख्या गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोक इथे आपला पैसा ठेवणं पसंत करतात. अतिश्रीमंत आणि गैरमार्गाने पैसे कमावलेल्या लोकांबरोबरच सर्वसामान्य माणसेही इथे खाते उघडू शकतात. आपल्या खात्यात जमा केलेल्या पैशांवर स्विस बँक कर आकारत नाही. या देशात जवळपास साडेचारशे स्विस बँका कार्यरत आहेत. 

हा देश आल्पसच्या निसर्गरम्य कुशीत विसावला आहे. आल्प्समधील निसर्गरम्य वातावरण, तेथील बर्फाच्छादित शिखरे, स्फटिकासमान पारदर्शक आणि स्वच्छ असलेली सरोवरे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. बॉलिवूडच्या कलाकारांचे आवडते ठिकाण म्हणजे हा देश. अनेक भारतीय चित्रपटांना स्वित्झर्लंडची निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभली आहे. हिरवीगार कुरणे डोळ्यांचं पारणं फेडतात. धष्टपुष्ट गायीचे कळप आपल्याला ठिकठिकाणी चरताना दिसतात. त्यामुळे येथे चीज, दूधदुभते आदींची कमी नाही. उत्तम दर्जाच्या चॉकलेट्ससाठी हा देश प्रसिद्ध आहे. डोंगरउतारावर द्राक्षांचे मळे आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाच्या वाईनची निर्मिती देखील होते. 

या देशातील लोकांना उत्कृष्टतेचा ध्यास आहे. येथे निर्माण झालेली कोणतीही वस्तू असो, ती उत्तम दर्जाचीच असली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. स्विस घड्याळे उत्कृष्ट घड्याळे म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. रोलेक्स, टोमर, रॅडो, ओमेगा या कंपन्यांची घड्याळे उत्कृष्ट दर्जाची असून ती वर्षानुवर्षे विनातक्रार काम देतात. ही ओरिजिनल घड्याळे थोडी महाग नक्कीच आहेत पण त्यांच्या उत्कृष्ट दर्जाशी कुठेही तडजोड केली जात नाही. 

या देशातील झुरिच, बर्न, जिनिव्हा, बाझेल ही शहरे प्रसिद्ध आहेत. बर्न ही स्वित्झर्लंडची राजधानी आहे. झुरिच हे या देशातील मोठे शहर आहे. झुरिच सरोवराच्या काठावर हे वसलेले आहे. या सरोवरात हंस पक्षी विहार करताना आढळतात. निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. जागोजागी फुलांचे नयनरम्य ताटवे फुललेले आहेत. याच सुंदर शहरात आम्ही येऊन पोहोचलो होतो. इथे मोठ्या प्रमाणावर जगभरातून पर्यटक येत असल्यामुळे परकीय चलन मिळते, उद्योगधंद्यांच्या वाढीला हातभार लागतो. त्यामुळे पर्यटकांचा आदर करणारे हे शहर आहे. झुरिच शहरात तशी फारशी प्रेक्षणीय ठिकाणे फारशी नाहीत. येथील आर्ट गॅलरी मात्र प्रसिद्ध आहे. पण आम्हाला तिथे जाण्यासाठी वेळ नव्हता.  आजूबाजूची ठिकाणे पाहण्यासाठी लोक या शहरात येऊन मुक्काम करतात. त्यामुळे इथल्या हॉटेल्सचे दर जास्त आहेत. 

अशा या झुरिच शहरातीलच हॉटेल स्वीसेव्हरमध्ये आमचा मुक्काम होता. हॉटेल प्रशस्त होते. लवकरच आम्हाला देण्यात आलेल्या रूममध्ये आम्ही पोहोचलो. रूम अतिशय उत्तम होत्या. फ्रेश होऊन आम्ही खाली आलो. हॉटेलभोवतीचं वातावरण अतिशय आकर्षक होतं. हॉटेलभोवती असणारी विविध झाडे, फुलझाडे, दूरवर दिसणारे डोंगर मन प्रसन्न करीत होते. तेथील विविध प्रकारच्या वनस्पतींचे, फुलांचे प्रकार मनमोहक होते. प्रत्येकजण आपापल्या कॅमेऱ्यात ते मोहक दृश्य टिपण्यात गर्क होता. तसेच थोडे पुढे चालत आम्ही हायवे लगत पोहोचलो. हायवेवरून अतिशय वेगाने गाड्या जा-ये करीत होत्या. पण कोणत्याही गाडीच्या हॉर्नचा आवाज नव्हता. 

संध्याकाळचे साधारण सात वाजले असावेत. पण आपल्याकडे तीनचार वाजता असतो, तसा लख्ख उजेड होता. पश्चिमेचं आकाश तर विविध रंगानी जणू उजळून निघालं होतं. लाल, गुलाबी, तांबूस, पिवळसर रंगांचा मोठा कॅनव्हासच आभाळाच्या रूपाने आमच्यासमोर होता. भोवताली डोंगर आणि निसर्गाची मनमोहक पार्श्वभूमी होती. विविध रंगरूपातील ती संध्याकाळ आम्ही आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली. परमेश्वर म्हणा किंवा निसर्ग म्हणा हा अजब चित्रकार आहे. युरोपात कुठेही गेलं तरी निसर्ग विविध रूपाने आपल्यासमोर येतो. कॅलिडोस्कोप थोडासा फिरवला की दिसणारं चित्र बदलतं. पण चित्र कोणतंही असो, ते सुखद आणि नयनरम्य असतंच. या सुंदर संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर मला सायंकाळच्या वेळेची अनेक गाणी आठवू लागली. अरुण दाते यांनी गायिलेलं ' रंगांचा उघडूनिया पंखा सांज कुणी ही केली' किंवा सांज ये गोकुळी सावळी सावळी, वो शाम कुछ अजीब थी. ये शाम रंगीन हो गयी हैं.. 

ही सुखद सांज तनामनात साठवून आम्ही हॉटेलमध्ये परतलो. सगळ्यांनी रात्रीचं डिनर घेतलं. सकाळी आठ वाजता तयार होऊन आम्हाला एंगेलबर्ग आणि माउंट टिटलिस या ठिकाणी जायचं होतं. तेथील बर्फाच्छादित शिखरे आम्हाला आकर्षित करीत होती. दिवसभराच्या प्रवासाने दमलेलो आम्ही उद्याची सुखद स्वप्ने डोळ्यात साठवीत निद्राधीन झालो. सकाळी अंघोळी वगैरे आटोपून आम्ही साडेसातला नाश्त्यासाठी हजर होतो. नाश्त्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. विविध प्रकारचे ज्यूस, फळे, पावाचे पदार्थ, कॉर्नफ्लेक्स, चहा, कॉफी इ. ज्याला जे हवे ते त्याने घेतलं आणि तृप्त मनाने सगळे बसमध्ये आपापल्या जागी स्थानापन्न झाले. 

स्वित्झर्लंडमधील बसचा प्रवास डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. हिरवीगार वनराई, विविध रंगी फुले, अंगाखांद्यावर झाडांचा अंगरखा परिधान करून आकर्षक दिसणारे डोंगर आणि मधून मधून दिसणारे आरसपानी सरोवर हे सगळं सगळं किती नजरेत साठवून घेऊ आणि किती नको असं झालं होतं. थंडी नव्हती पण सुखद गारवा मन प्रसन्न करीत होता. भोवतालचा निसर्ग आणि आल्हाददायक हवामान यांचं एक अनोखं मिश्रण होऊन तनामनाला सुखावत होतं. हा सगळा प्रवास करताना एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहिली नाही. ती ही की या लोकांनी निसर्ग आणि पर्यावरण जीवापाड जपलं आहे. कुठेही त्याची हानी होऊ दिली नाही. 

रस्त्याने जाताना डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्या छोट्या गावांचं दर्शन होत होतं. निसर्गरम्य परिसरात वसलेली ही गावं, त्यांच्या जवळपास वाहणारी स्वच्छ, सुंदर नदी किंवा आकाश ज्यामध्ये प्रतिबिंबित झालं आहे अशी सरोवरे पाहून तिथे राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटला. 

असा निसर्ग तर आपल्याकडेही आहेच. निसर्गाने भारताला जेवढी विविधता आणि सौंदर्य दिलं तेवढं खरं तर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात नाही. पण इतर देशांसारखी आपण आपल्या निसर्गाची, पर्यावरणाची काळजी किती घेतो असा विचार मनात येतो. उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश हे आपल्याकडील किती निसर्गरम्य प्रदेश आहेत ! पण त्यातील जंगलांची हानी होते आहे, पर्यावरणाचे नुकसान होते आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासींची, जंगलवासीयांची उपजीविकेची साधनं हिरावून घेतली जात आहेत. बेसुमार जंगलतोड होते आहे. त्यातूनच ' चिपको आंदोलन ' यासारखी आंदोलने उभी राहत आहेत. स्थानिकांना लढा द्यावा लागत आहे. निसर्गरम्य असलेली खेडी आधुनिकतेच्या वरवंट्याखाली रगडली जाताहेत. त्यालाच कदाचित ' प्रगती ' असं गोंडस नाव आपण दिलं आहे. युरोपातील हे सगळं वातावरण पाहताना आपल्या देशातील वातावरण आणि परिस्थिती साहजिकच डोळ्यासमोर येते. 

एंगेलबर्ग या ठिकाणी हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. आल्प्समधील पर्वतशिखरांनी वेढलेले हे ठिकाण पर्यटक आणि गिर्यारोहकांच्या गर्दीने कायम फुललेलं असतं. इथूनच आम्ही माउंट टिटलिसला जाणार होतो. ( क्रमशः )

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१०/८/२०२४ 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...