मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १२

  उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १२

अकरा जून २०२४. युरोपवारीहून सुखरूप परत आलो आणि या शुभ दिनी भारतभूमीवर पाऊल ठेवले. कधी काळी आपण युरोप प्रवासाला जाऊ आणि आतापर्यंत केवळ ऐकलेले वा सिनेमात किंवा टीव्हीवर पाहिलेली ठिकाणे आपण प्रत्यक्षात पाहू असे वाटले नव्हते. पण सुदैवाने हा योग आला होता.  मिलानहून रात्री दहा वाजता विमानात बसलेलो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दिल्ली विमानतळावर येणे अपेक्षित होते. पण आमचे विमान खराब हवामानामुळे दिल्लीला अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचले होते. दिल्लीहून आम्हाला पुढेच जे कनेक्टिंग फ्लाईट होते ते दहा वा. च्या सुमारास होते. त्यामुळे आमचे ते विमान मिस होते की काय अशी धाकधूक मनात होती. पण आम्ही जवळपास ३५ प्रवासी त्या विमानाने जाणारे असल्याचे कळल्यावर एअर इंडियाने ते विमान अर्धा तास उशिरा सोडण्याचे ठरवले. दिल्ली विमानतळावर आमचे सामान कलेक्ट करणे, इमिग्रेशन आदी तपासण्यांना सामोरे जाणे यात आमची खूपच धावपळ झाली. इकडून तिकडे पळ, तिकडून आणखी दुसरीकडे अशी धावाधाव करावी लागली. मुंबईला जाणाऱ्या विमानात स्थानापन्न झालो आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. 

मुंबई विमानतळावर आम्ही उतरलो. कन्व्हेयर बेल्टवरून आमच्या बॅगा घेतल्या. सर्वानाच घराचे वेध लागले होते. पण आम्ही सगळे प्रवासी एवढे दहा दिवस झाले एकत्र होतो. जणू एका कुटुंबाचा भाग झालो होतो. त्यामुळे आता पुन्हा कधी भेटणार अशी हुरहुरही लागली होती. जाता जाता सगळ्यांनी पुन्हा एकत्र फोटो काढले. एकमेकांचे नंबर्स तर घेतलेच होते. सगळ्यांनी आमचे टूर मॅनेजर राहुल देसाई यांचे मनःपूर्वक आभार मानले कारण त्यांच्यामुळेच ही युरोपवारी सुखरूप पार पडली होती. 

विमानतळावर माझी बांद्रे येथे राहणारी बहीण सौ. विभाताई देशपांडे खास आमच्या भेटीसाठी आणि स्वागतासाठी हजर होती. आमच्या पुढील प्रवासासाठी लागणार नाश्ता ती सोबत घेऊन आली होती. माझ्या मुलाने पुण्याहून आमच्यासाठी कॅब बुक केली होती. त्यातून घराकडील प्रवास सुरु झाला. घरी आलो तर आमच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. आमच्या स्वागताची माझा मुलगा लक्ष्मीकांत, सुनबाई राधिका आणि माझी कन्या सौ सारिका आणि नातू चि. स्वराज आमच्या स्वागताला तयार होते. त्यांनी आमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सौ सारिका आणि राधिकाने आम्हाला ओवाळले. गोड तोंड करायचे म्हणून पेढा भरवला. या सगळ्या स्वागताने आम्ही अक्षरशः भारावून गेलो आणि युरोप ट्रीपचा आनंद द्विगुणित झाला. 

ट्रीपहून परत आलो तरी प्रवासातील काही आठवणी मनात रुंजी घालत होत्या. जे जे काही पाहिले आणि अनुभवले ते ते सांगावे या भावनेतूनच एक हृद्य हकीगत सांगणार आहे. ही एका भारतीय व्यक्तीची अत्यंत प्रेरणादायी अशी सत्यकथा आहे. काही कारणास्तव फक्त नाव बदलले आहे. 

या कथेचा नायक आहे रामप्रसाद. हा रामप्रसाद मूळ राजस्थानचा. आईवडील अशिक्षित. परिस्थिती अत्यंत हलाखीची. रामप्रसादही घरच्या परिस्थितीमुळे फार काही शिकू शकला नाही. लिहिता वाचता येत होते म्हणूनच काय तो साक्षर आहे असे म्हणायचे. पण शिकलेला नसला तरी रामप्रसाद हरहुन्नरी होता. अंगात काम होते, कष्ट करण्याची तयारी होती. फारसा शिकलेला नसला तरी व्यवहारचातुर्य मात्र जवळ होते. रामप्रसादाच्या हाताला चव होती. तो उत्तम स्वयंपाक करायचा. मग स्वयंपाकाची छोटी मोठी कामे घ्यायला लागला. घरखर्चासाठी आईवडिलांना हातभार लावू लागला. 

रामप्रसादच्या ओळखीचे कोणीतरी इटलीत जाऊन अशाच प्रकारची कामे करीत होते. त्यांनी रामप्रसादलाही तिकडे उत्तम संधी आहे असे सांगून बोलावून घेतले. रामप्रसाद जाणार तरी कसा ? जवळ पैसा नाही, पासपोर्ट, व्हिसा नाही, इटालियन भाषा तर सोडाच पण इंग्रजीचा देखील गंध नाही. पण तो हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याने मित्रमंडळी, नातेवाईक आदींकडून परतीच्या बोलीवर मिळतील तसे पैसे जमा केले. पासपोर्ट, व्हिसा काढला आणि मुंबईला आला. मुंबईहून थेट इटलीतील मिलान या ठिकाणी पोहोचला. ही गोष्ट असेल १०-१२ वर्षांपूर्वीची. मिलान मध्ये एका हॉटेलात तो शेफ म्हणून कामाला लागला. दिवसाचे १२-१४ कष्ट करून अतिशय हलाखीत तो जगत होता. 

पुढे पिसामधील एका रेस्टॉरंटमध्ये अधिक पैसे मिळतील असे त्याला कळल्यावरून तो मिलानमधील काम सोडून पिसामध्ये दाखल झाला. मिलानपेक्षा येथील वातावरण चांगले होते. त्याच्या जोडीला हॉटेलमध्ये आणखी दोन तीन जेवण वगैरे बनवणारी मुले होती. ती मंडळी इटालियन फूड बनवायची. पिसामध्ये अनेक भारतीय पर्यटनासाठी येत असत. त्यांना भारतीय पद्धतीचे जेवण हवे असायचे. रामप्रसाद त्यासाठी तयारच होता. त्याने इटालियन जेवण कसे बनवायचे हे तर शिकून घेतलेच पण भारतीय पद्धतीचे त्याचे जेवण पर्यटकांना आणि ग्राहकांना खूपच आवडू लागले. याच दरम्यान हॉटेलमधील इतर इटालियन शेफ मुलांनी त्याच्याकडूनच भारतीय पद्धतीचे जेवण कसे बनवायचे हे शिकून घेतले. 

आता रामप्रसादच्या जीवनात आणखी एक महत्वाचे वळण आले. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका इटालियन मुलीशी त्याचे प्रेमाचे धागे जुळले. राजस्थानातून एकटा आलेल्या रामप्रसादवर माया करणारे असे कुणीतरी मिळाले. पण हॉटेलमालकाला ही कुणकुण लागली. हॉटेलमधील इतर इटालियन मुलेही भारतीय पद्धतीचे जेवण बनवायला शिकलीच होती. आता त्याला रामप्रसादची गरज नव्हती. रामप्रसादला त्याने आता तुझी जरुरी नाही असे सांगून घालवून दिले. आताच कुठे स्थिरस्थावर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या रामप्रसादला पुन्हा रस्त्यावर यावे लागले. त्याचे ज्या मुलीवर प्रेम बसले होते, तिच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण लग्न करण्याचा दोघांचा निश्चय पक्का होता. दोघांचे विचार जुळत होते आणि दोघेही एकमेकांना अनुरूप होते. त्यामुळे लवकरच त्यांचे शुभमंगल झाले. आता तर नोकरीची जास्त गरज होती कारण त्याच्यावर त्याची आणि पत्नीची अशी दुहेरी जबाबदारी होती. पण त्याने हार मानली नाही. 

हॉटेलमधील येणारे बरेच भारतीय पर्यटक रामप्रसादला ओळखत होते. दरवर्षी विविध भारतीय पर्यटन कंपन्या हजारो पर्यटकांना घेऊन इटलीत येतच होत्या. त्यांनी रामप्रसादला स्वतःचेच हॉटेल सुरु करायला सांगितले. मात्र तेवढा पैसा त्याच्याजवळ नव्हता. एका पिकनिक स्पॉटमधील मोकळ्या जागेत तात्पुरती व्यवस्था त्याने केली आणि भारतीय पद्धतीचे जेवण देणे सुरु केले. या दरम्यान एक बंद पडलेले हॉटेल त्याने भाड्याने घेतले आणि त्याचे नूतनीकरण केले. त्यासाठी बराच पैसा लावला. शिवाय हॉटेलमालकाला दरमहा भाडे देऊ लागला. आता पर्यटकांची छान सोय झाली. रामप्रसादचे हॉटेल चांगले चालू लागले. बायकोची चांगली साथ होती. पण रामप्रसादची ही प्रगती आधीच्या इटालियन मालकाला पाहावली नाही. त्याने त्या हॉटेलमालकाशी संपर्क साधला. रामप्रसाद दरमहा जेवढे भाडे देतो त्यापेक्षा जास्त भाडे मी देतो असे सांगून त्याला ती जागा खाली करायला लावली. बिचारा रामप्रसाद पुन्हा रस्त्यावर आला. पण तो खचून गेला नाही. पुन्हा आपल्याला काय करता येईल यासाठीचे प्रयत्न त्याने सुरूच ठेवले. 

एका ठिकाणी एक बंद पडलेले गॅरेज आहे असे त्याला कळले. त्याच्या संबंधितांनी त्याला ही माहिती कळवली. ती जागा अगदी पडीक आणि घाणेरडी होती. ही जागा आपल्याला विकत घेता येईल का असा तपास त्याने केला. इटलीमध्ये आणि तेही कायम पर्यटकांची गर्दी असलेल्या पिसामध्ये जागा घेणे ही सोपी गोष्ट नाही. जागेचे दर तिथे खूपच जास्त आहेत. त्यात एक भारतीय माणूस ही जागा विकत घेऊ पाहतो म्हणून स्थानिकांनी बरेच अडवणूक केली. पण रामप्रसादचा निर्धार पक्का होता. त्याने बरीच जमवाजमव केली. जवळ होते नव्हते ते सारे विकून टाकले. ते गॅरेज विकत घेतले. आता त्याची दुरुस्ती करून त्या ठिकाणी हॉटेल निर्माण करायचे होते. पुन्हा तो जिद्दीला पेटला. नातेवाईकांकडून, बँकेकडून कर्ज घेतले. मोडकळीस आलेल्या घाणेरड्या जागेचा आता कायापालट झाला होता. तिथे हॉटेल उभे राहिले होते. खूप सुंदर आणि अत्याधुनिक नसेल पण स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वाटेल अशा जागेत त्या गॅरेजचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले. रामप्रसाद पुन्हा उत्साहाने कामाला लागला. हॉटेल चांगले चालू लागले. उत्तम भारतीय पदार्थ आणि इटालियन पास्ता,पिझ्झा वगैरे पदार्थ रामप्रसादच्या हॉटेलात मिळायला लागले. त्याच्या व्यवसायात त्याच्या सहधर्मचारिणीची सुरेख साथ होती. अशातच त्याला एक गोड बातमी मिळाली. तो लवकरच बाबा होणार होता. एका शुभदिनी त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. रामप्रसादाच्या नशिबात चांगल्या दिवसांची सुरुवात झाली. छोट्या बाळाचे हसणे पाहून तो आपले श्रम विसरून जात होता.

पण हाय रे दैवा ! रामप्रसादाच्या भाग्याला पुन्हा दृष्ट लागली. २०१९ कोरोना महामारीची सुरुवात झाली आणि लवकरच ती जगभर पसरली. सारे जनजीवन जणू ठप्प झाले. पर्यटन व्यवसाय थांबला. पर्यटनावर ज्यांचे व्यवसाय अवलंबून होते, ते सारे व्यावसायिक आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडले. रामप्रसादला आपले हॉटेल तर बंद करावे लागलेच पण रोजचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न पडला. लोकांकडून उसने घेतलेले पैसे, बँकेचे कर्ज कसे फेडावे याचा मोठाच मानसिक ताण आला. थोडी निराशा जरूर आली. पण संकटाचे दिवस कायम थोडेच राहतात ? हळूहळू कोरोनाने माघार घेतली. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. आर्थिक संकटात सापडलेले व्यवसाय हळूहळू सावरू लागले. रामप्रसादाला पर्यटकांनी, पर्यटन करणाऱ्या कंपन्यांनी धीर दिला. मदतीचा हात दिला. पर्यटनस्थळे पुन्हा गर्दीने फुलू लागली. रामप्रसाद पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागला. इटलीत, पिसामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली. रामप्रसादचे हॉटेल पुन्हा चैतन्यमय झाले. पर्यटकांना आता त्यांचे आवडते स्वादिष्ट खाद्यपदार्थ मिळू लागले. रामप्रसादचा गोड छोकरा आता तेथील शाळेत जातो. रामप्रसादलाही आता कामापुरती इटालियन भाषा येते. सोबत त्याची गोड इटालियन पत्नी मदतीला आहेच ! रामप्रसाद आता पूर्वीसारखे खूप काबाडकष्ट करत नाही. त्याच्या हाताखाली माणसे आहेत. आपल्या उमद्या स्वभावाने त्याने अनेक माणसे जोडली आहेत. तो फक्त आता हॉटेलवर लक्ष ठेवतो आणि व्यवसाय कसा वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतो. आज त्याला सुखाचे दिवस आले आहेत. अपार कष्ट आणि अभूतपूर्व जिद्दीची रामप्रसादची ही कहाणी प्रेरणादायी आहे. भारतीय माणसाला अभिमान वाटावा अशी आहे.  कोणाचाही पाठिंबा नसणारी एक भारतीय व्यक्ती केवळ आपल्या परिश्रमांच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर इटलीसारख्या देशात स्वतःचे हॉटेल सुरु करू शकली होती याचा एक भारतीय म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटला. 

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२९/०८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...