मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग १३

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग १३

कवितेशी मैत्री

रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं सदैव जागृत असलेलं कवीमन. त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक आदी सर्व साहित्यप्रकारातून डोकावतं ते त्यांचं कवीहृदय. म्हणून मागच्या भागात मी रवींद्रनाथांना कवींद्रनाथ असं म्हटलं होतं. त्यांच्या कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळणी किंवा नादमय अशी रचना नव्हती. प्रसिद्ध आंग्ल कवी वर्डस्वर्थ याने कवितेची व्याख्या करताना ' Spontaneous overflow of powerful feelings ' असं म्हटलं आहे. पण रवींद्रनाथांची कविता यापेक्षाही खूप काही वैशिष्ट्ये धारण करणारी आहे. रवींद्रनाथ जीवनातील सत्य, सुंदर आणि शिव या त्रयीचे उपासक होते. त्यांनी निसर्गसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील अनुभव घेतला, तो अत्यंत रसरशीतपणे आणि जिवंत होऊन त्यांच्या काव्यात प्रकट झाला आहे. अशी कविता सर्वव्यापी होते. जागतिक स्तरावर काव्यातील उदात्त भावनांची अनुभूती देण्याचं सामर्थ्य अशा रचनांमध्ये प्रकटतं. ' गीतांजली ' हा त्यांचा काव्यसंग्रह नोबेल पुरस्कारप्राप्त ठरला तो याच सगळ्या काव्यगुणांमुळे. 

ज्या वयात मुलं लिहावाचायाला शिकतात, शाळेत जायची सुरुवात करतात, त्या वयात रवींद्रनाथांनी कवितेशी मैत्री केली. त्यांची आणि कवितेची लहानपणापासूनची जी गट्टी जमली, ती अगदी आयुष्याच्या अखेरीपर्यंत. अगदी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण मोजत असतानाही हा महाकवी कवितेची आराधना करीत होता. सात ऑगस्टला त्यांचे निधन झाले. त्या दिवशी आपल्या मृत्यूच्या केवळ अर्धा पाऊण तास आधी त्यांनी ' मृत्यूवर ' कविता केली आणि आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना ती लिहून घ्यायला सांगितली. 

पु ल देशपांडे यांनी आपल्या ' रवींद्रनाथ : तीन व्याख्याने या पुस्तकात गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे. तो लक्षात घेतला म्हणजे रवींद्रनाथांच्या कवितेतली ताकद लक्षात येते. गांधीजी तसे कवितेचे रसिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ते कवितेचे किंवा गीताचे रसिक किंवा जाणकार असूही शकतील. पण आपल्याला ते माहिती आहेत ते प्रामुख्याने स्वातंत्र्यासाठी शांततेच्या मार्गाने लढा देणारे, सत्याग्रहाचे शस्त्र उपासणारे गांधीजी. गांधीजींसारख्या नेत्यांना किंवा आपलं ध्येय ज्यांच्या दृष्टीसमोर कायम आहे अशा महापुरुषांना आपल्या जीवनातील गोष्टींचा अग्रक्रम ठरवावा लागतो. कशाला प्राधान्य द्यायचे आणि कशाला नाही हे ठरवावे लागते. त्यासाठी त्यांना बरेचदा वैयक्तिक सुखाचा त्याग करावा लागतो. तसाच काही विचार करून गांधीजींनी आपली काव्यरसिकता बाजूला ठेवलेली असू शकते. पण तरीही रवींद्रनाथांच्या काही कविता या त्यांच्या जीवनाच्या आधार झाल्या होत्या. 

गांधीजी १९३२ साली येरवडा येथील तुरुंगात उपोषण करीत होते. गांधीजींच्या मनाची अवस्था काहीशी निराश आणि नाजूक झाली होती. अशा त्यांच्या त्या मानसिक अवस्थेच्या काळात ७२ वर्षे वय असलेले रवींद्रनाथ त्यांना भेटायला आले. त्यावेळी गांधीजी मनामध्ये रवींद्रनाथांची कविताच आठवत होते. जणू त्या कवितेच्या शब्दांचा त्यांना आधार वाटत होता. आणि अशा त्या नाजूक क्षणी त्या महामानवाने या महाकवीला आपली ती कविता म्हणायला सांगितलं. आणि त्या महात्म्याच्या विनंतीवरून या महाकवीने चक्क ही कविता गाऊन दाखवली. त्या कवितेचे शब्द होते... 

जीबॉन जॉखॉन शुकाये जाय 

कोरुणाधाराय एशो ।।

शकल माधुरी लुकाये जाय गीतोसुधारशे एशो -

जीवन जेव्हा सुकुनी जाते, करुणाधारा होऊनि ये 

सकल माधुरी लोपुनि जाता, गीत सुधारस होऊनि ये ।

कर्माचे आकार होऊनि मत्त झाकिती सर्व दिशा 

हृदयप्रांती जीवननाथा, शान्त पाउले टाकित ये ।।

आपण ' जे न देखे रवी, ते देखे कवी ' असं म्हणतो. पण रवींद्रनाथांच्या बाबतीत तर अक्षरशः पाहणाराही 'रवी ' आणि लिहिणाराही रवी होता. त्यामुळे त्यांच्याबाबतीत बोलताना ' जे जे पाही रवी, ते ते लिही त्यांच्यातील कवी. ' हा रवी स्वयंप्रकाशित होता. त्याच्या प्रकाशात त्याची कविता उजळून निघाली आहे. त्यांच्या भक्तिगीतात ते आपल्याला धार्मिक वाटतात. ते धार्मिक होतेच पण कर्मकांडांचं अवडंबर पाळणारे नव्हते. त्यापासून त्यांची कविता मुक्त होती. त्यांची कविता कुठल्याही जातिबंधनात, धर्मबंधनात किंवा रुढीबंधनात अडकली नाही. त्यामुळे त्यांच्या कवितेवर अमुक एक अशा प्रकारची कविता असा कुठलाही शिक्का मारता येत नाही. हे त्यांच्या कवीतेचं वैशिष्ट्य आहे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्यांना ज्या ज्या अनुभवांनी समृद्ध केलं, ते भाव, ते अनुभव त्यांच्या कवितांतून प्रकटले. त्यांच्या कवितेत त्याप्रमाणे बदल होत गेले. कविता फुलत गेली, खुलत गेली, परिपक्व होत गेली. ' गीतांजली ' काव्यसंग्रहातील त्यांची ' चित्त जेथे हो भयशून्य ' ही अशीच एक प्रसिद्ध कविता आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता. त्यात ते म्हणतात- 

चित्त जेथे असेल भयशून्य आणि मस्तक असेल उन्नत
ज्ञान असेल मुक्त
किरकोळ सीमांच्या भिंतीत चिणून
जग नसेल झालेले विदीर्ण खंडित...
शब्द उमटतील सत्याच्या घनगर्भातून अन्
पूर्णत्वास पोहोचण्यासाठी अथक श्रमांचे बाहू यत्नात राहतील सतत.
विवेकाचा निवळशंख निर्झर नाही, जाणार हरवून
प्राण हरपलेल्या सवयींच्या ओसाड खडतर वाळवंटात.
तूच नेशील पुढेपुढे बुद्धीला...
उदारसंतत विचार आणि कृतीच्या मार्गावर.
हे पित्या, जाग येवो, माझ्या देशाला... स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात.

या कवितेत त्यांनी त्यावेळी जी अपेक्षा व्यक्त केली आहे, ती आजच्या परिस्थितीला देखील लागू पडते. किंबहुना दिवसेंदिवस अधिकच अशा गोष्टींची गरज आहे. ' भयशून्य चित्त , उन्नत मस्तक ' या सारख्या गोष्टी शिक्षणातून निर्माण व्हायला हव्यात. खरंच त्या तशा होतात का ? अब्राहम लिंकनने ' हेडमास्तरांस पत्र ' यात ज्या अपेक्षा त्या व्यक्त केल्या आहेत, त्यांच्याच जवळ जाणारी ही कविता आहे. रवींद्रनाथांच्या साहित्यासंबंधी आणखी पुढील भागात जाणून घेऊ या . 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

७/८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...