उगवतीचे रंग
बात एक रात की
मराठीमध्ये लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे. जो कोणी या अनुभवातून जाईल त्यालाच त्यातला गहन अर्थ कळतो. म्हणतात ना ' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे .' काय एकेक म्हणी आठवताहेत आज ! आपल्या मराठी भाषेचा प्रभाव, दुसरं काय ! तर ते असो. झालं असं की काही दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेलो होतो. लग्न केल्याचा आणि घर बांधल्याचा असे दोन्ही अनुभव मी घेतले. त्याला बरीच वर्षे झाली. त्याबद्दल नाही बोलत मी. उगीच कशाला सांगायचे ते ! अहो, आपले अनुभव आपल्यापाशी असलेले बरे. नाहीतर कोण काय म्हणेल काही सांगता यायचे नाही. हां, तर मी काय सांगत होतो ? तर मी एका लग्नाला गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे ? आम्ही सगळेच जातोच की लग्नाला. तर मंडळी, मला काय म्हणायचे आधी नीट ऐकून तर घ्या.
माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलीचे लग्न ठरले होते. तुम्ही सगळे लग्नाला या असा त्याचा आणि वहिनींचा खूप आग्रह होता. म्हणून आम्ही दोघांनी या वेळी लग्नाला जायचे ठरवले. त्याप्रमाणे आरक्षण केले. आम्ही लग्नाच्या एक दिवस आधीच इच्छित ठिकाणी पोहोचलो. मी आधीपासून आमच्या हिला म्हणत होतो की आपण मंगल कार्यालयात मुक्काम करण्याऐवजी एखाद्या हॉटेलमध्ये राहू या म्हणजे झोप वगैरे व्यवस्थित होते. पण हिने नेहमीप्रमाणे माझे म्हणणे फेटाळून लावले. ती म्हणाली, ' अहो, त्या दिवशी भाऊजी सांगत होते ना आपल्याला ! तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी एक मोठे हॉटेलच लग्नासाठी घेतले आहे. लग्नासाठी. भरपूर खोल्या आणि राहण्याची छान व्यवस्था आहे. ' खरे तर मला लग्नघरी मुक्काम करणे म्हणजे एक दिव्यच वाटते पण तरीही सौ च्या आणि माझ्या मित्राच्या आग्रहानुसार मी विचार केला की ठीक आहे. बघू या. घेऊ या तो अनुभव सुद्धा.
आम्ही पोहोचलो तेव्हा कार्यालयात काही वऱ्हाडी मंडळींची फारशी वर्दळ नव्हती. मात्र सुखद आश्चर्य म्हणजे वराकडील मंडळी मात्र तेथे नुकतीच येऊन डेरेदाखल झाली होती. आम्ही कार्यालयात पोहोचलो तेव्हा सकाळी साधारण साडेदहा अकराची वेळ होती. उपस्थित मंडळींचा गरमागरम नाश्ता सुरु होता. कचोरी, सामोसे असा फर्मास मेनू होता. बाजूलाच चहा, कॉफीची सोय होती. मित्राने आणि वहिनींनी आम्हाला पाहताच आमचे स्वागत केले आणि नाश्त्याचा आग्रह केला. मला तसे कोणाला नाराज करणे आवडत नाही. त्यामुळे मी त्यांच्या आग्रहानुसार माझे पाय त्या नाश्त्याच्या काउंटरकडे वळवले. एक कचोरी आणि सामोसा खाऊन झाल्यावर मला जेवणाची आठवण झाली. थोड्या वेळाने जेवायचे पण आहे त्यामुळे मनाची समजूत घातली आणि नाश्ता आवरता घेतला. चहा, कॉफीचीही सोय असल्याने आपण ती घेतली नाही असे उगाच होऊ नये म्हणून एक छानपैकी चहा घेतला.
ते कार्यालय म्हणजे एक प्रशस्त हॉटेल होते. खाली लग्नासाठी, जेवणासाठी मोठा हॉल, बाहेर पुन्हा संध्याकाळी जेवणाचे स्टॉल लावता येतील अशी जागा आणि मंडप, आणि वरच्या दोन मजल्यांवर प्रशस्त अशा प्रकारची निवासव्यवस्था असलेल्या खोल्या होत्या. ही सगळी व्यवस्था पाहून ' दिल खुश ' झाले. तेवढ्यामित्राने एका रूमची चावीच आमच्या हाती सोपवली. आता आपण लग्नाला आलो आणि इथेच थांबलो ते फार बरे केले असे वाटू लागले होते. मग पहिल्या मजल्यावर आमची खोली असली तरी उदवाहिकेची ( मराठीत ' लिफ्ट ' म्हणतात बहुतेक ) सोय असल्याने जिना चढण्याचा त्रास कशाला घ्या असा प्रामाणिक विचार करून त्यातून वर गेलो. चावीने दरवाजा उघडला आणि तोंडातून उद्गार निघाले, ' वा, क्या बात हैं.' प्रशस्त रूम होती. रूममध्ये दोन डबलबेडची सोय होती. म्हणजे एकूण चार व्यक्ती व्यवस्थित झोपू शकणार होत्या तर ! शिवाय ए सी ( अर्थात थंडी असल्यामुळे त्याची गरज पडली नाही ), टीव्ही, कपाटे वगैरे सोय होती. हे सगळे पाहून अस्मादिक कमालीचे खुश झाले. आता रात्रीपर्यंत तेथे कोणी इतर येणार नव्हते. मग पुन्हा इथे थांबण्याचा निर्णय घेतला, तो फार चांगला ठरला असे पुन्हा वाटून गेले.
सकाळी लवकर उठल्याने आणि प्रवासाने कंटाळलो असल्याने जेवणाची वेळ होईतो छान आराम करावा असे वाटले. इतक्यात तर लगेच कोणी येणार नव्हते तेव्हा आता संध्याकाळ होईपर्यंत छानपैकी इथे आराम करता येईल असे मनाशी ठरवून कपडे बदलणार तोच आमच्या मित्राचा एक मित्र ( म्हणजे आमचाही मित्रच ! ), त्याचा मुलगा, सून, छोटा नातू वगैरे मंडळी अचानक हजर झाली. आता असे ठरले की या रूममध्ये फक्त स्त्रियांनी थांबावे आणि आम्हा पुरुष मंडळींसाठी एक वेगळी शेजारील रूम घ्यावी. झाले, मग काय मी माझी बॅग उचलली आणि शेजारच्या खोलीत गेलो. मला वाटले की आता आपण निवांत. कोणी आपल्या आरामात व्यत्यय आणणार नाही. असा विचार करून थोडं पडावं असा विचार केला तोच खाली जेवणाची तयारी झाली असा निरोप आला. लागोपाठ दोन तीन जण हा निरोप देण्यासाठी तत्परतेने खोलीत येऊन गेले. आता फारशी भूक नसली तरी जेवणासाठी जाणे भागच होते.
आता जेवण झाल्यावर मस्तपैकी आराम करू असा बेत मनाशी आखला आणि जेवणासाठी खाली गेलो.
भोजनासाठी विविध पदार्थांची रेलचेल होती. मात्र आपल्याला हवे ते आणि हवे तेवढेच घेऊन आणि हातात वाढलेले ताट घेऊन बसण्यासाठी खुर्चीचा शोध घेतला. अशा प्रसंगी ताटात वाढून घेणे आणि बसण्यासाठी सोयीस्कर जागा शोधणे ही कामे मला फार कठीण वाटतात. कारण हातात ताट घेऊन चालण्याची कसरत, त्यातून कोणाला आपला धक्का लागून ते सांडू नये याचीही काळजी घ्यावी लागते. एकदा अशाच एका प्रसंगी माझा लग्नासाठी आणलेला चांगला पोशाख अन्न अंगावर सांडल्याने खराब झाला आहे. ( अर्थात त्यात माझी चूक नव्हतीच. दुसराच येऊन मला धडकला होता. तर असो. काही लोकांना हे सगळे फार छान जमते. एवढया गर्दीत हातात ताट घेऊन उभ्या उभ्या सुद्धा ही मंडळी जेऊ शकतात. खरे तर अशी मंडळी प्रशंसेला पात्र आहेत. पण त्यांची बिचाऱ्यांची कोणी दखल घेत नाही. खरं तर यजमानांनी अशा व्यक्तींचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला पाहिजे. तर असो. सुदैवाने मला बसण्यापुरती एक रिकामी खुर्ची दिसली. एखादे वेळी अशी का होईना पण आपल्याला खुर्ची मिळाली याचा कोण आनंद मला त्यावेळी झाला !
आता विविध पाहुण्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली होती. काही नुकतेच येऊन जेवणात सामील झाले होते तर काही मंडळी आपापल्या बॅगा सावरत येत होती. यातील बरीच मंडळी बऱ्याच वर्षांनी भेटत असल्याने त्यांच्याशी बोलणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे जेवणानंतर आराम करण्याचा जो प्रामाणिक विचार माझ्या मनात आला होता, त्याला मी थोडा आवर घातला. मनात म्हटलं, ' जाऊ द्या यार, आराम काय आपण नेहमीच करतो. जरा सगळ्यांशी गप्पा मारू.' त्याप्रमाणेच झाले. थोड्या गप्पा टप्पा, बाहेर इकडे तिकडे चकाट्या पिटणे यात छान वेळ गेला. तोपर्यंत चार वाजले होते. आता सीमांत पूजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पुन्हा ड्रेस वगैरे घालून तयार झालो. साधारण सहा वाजेपर्यंत तोही कार्यक्रम आटोपला. नाश्ता, जेवण, चहा, सीमांत पूजन आदींच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जाताना पहिल्यांदाच पाहत होतो.
कार्यक्रम आटोपला. हिवाळा असल्याने अंधार लवकर पडायला सुरुवात झाली होती. दिवस मावळला होता आणि त्याबरोबरच आराम करण्याचा विचारही मावळला. आता रात्रीच छानपैकी झोप मिळेल असा पोक्त विचार करून जेवणाच्या वेळेपर्यंत सगळ्यांशी छान गप्पा झाल्या. रात्रीच्या जेवणाचे काउंटर्स बाहेरच्या बाजूला मंडपात लावले होते. पाणीपुरी, शेवपुरी, टोमॅटो सूप पासून तर मुख्य जेवणापर्यंतच्या सगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती. जो ज्याला जे आवडेल त्याच्यावर ताव मारत होता. पोटाचा विचार करण्यापेक्षा यजमानांनी इतके विविध पदार्थ ठेवले आहेत, त्यांचाही जरा विचार करावा, त्या पदार्थांनाही न्याय द्यावा असा प्रामाणिक विचार बहुतेक मंडळी करताना दिसत होती. मला त्यांच्या या न्यायप्रियतेचे कौतुक वाटले.
अशा रीतीने जेवणं वगैरे आटोपून रूममध्ये परत येईपर्यंत साडेनऊ दहा झाले. रूममध्ये दोन दोन डबलबेड असल्याने चार माणसांची सोय होतीच. चार जण येऊन दाखलही झाले होते. पण ऐनवेळी आणखी एक जण आल्यावर एका बेडवर तीन जण अशी तडजोड करण्यात आली. माझ्या बेडवर मात्र सुदैवाने आम्ही दोघेच जण होतो. आता निद्रादेवी प्रसन्न होण्यात कोणतीही अडचण नव्हती.शांत चित्ताने झोपी गेलो.केव्हातरी बारा साडेबाराच्या सुमारास एका आवाजाने जाग आली. आणि कोठे आहोत हे लक्षातच येईना.आजूबाजूला बघितले तर सगळी मंडळी शांतपणे निद्रादेवीच्या आधीन झालेली. जरा बाहेर डोकावून बघितले तर एक माता आपल्या लाडक्या बाळाला झोपविण्याच्या प्रयत्नात होती.आणि त्याला झोपायचे नव्हते.मग काय बाळांचे शेवटचे अस्त्र त्याने काढले होते आणि उच्च स्वरात ( रडून ) आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत होते.आणि आई झोपविण्याच्या प्रयत्नात.इतरांची झोप भंग पावेल या भीतीने ती माऊली बाळाला बाहेर घेऊन आली होती. बरे बाहेर बाळाला काय दिसणार? सगळा अंधार आणि जागा नवीन.
मनोमन जागरणाची तयारी करत बेड कडे परतलो. मग काय ' करवटे बदलते रहे सारी रात हम ...' अशी आमची अवस्था झाली. बरे यात चूक आमचीच ना! कारण आमची झोप खुट्ट वाजलं तरी डोळे व मन टक्क उघडणारी. अशी ही लग्नघरची रजनी कशी तरी संपली.
सकाळी सहा वाजताच, ' उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली ' या जाहिरातीप्रमाणे ' उठा उठा खाली चहा कॉफी आली. अंघोळीची वेळ झाली. ' यासारखी वाक्ये कानावर पडू लागली. आता उठणे क्रमप्राप्त होते. खाली गेलो तोवर सुरुवातीचा चहा संपला होता. कॉफी मात्र शिल्लक होती. पण माझ्यासारख्या चहाचे चाहते असणाऱ्या व्यक्तीला दिवसाची सुरुवात चक्क कॉफीने करावी हे न मानवण्यासारखे होते. त्यामुळे ' खाईन तर तुपाशी...' या म्हणीप्रमाणे दिवसाची सुरुवात करीन तर ती चहानेच असे ठरवले होते. आणि एकदा केलेले नियम मी पाळतो, त्यामुळे मी चहासाठी आणखी थोडा वेळ थांबलो. मग छानपैकी चहा आला.
रात्रीची अपुरी झोप, चहाची दीर्घ वेळ वाट पाहावी लागणे या सगळ्या गोष्टींची भरपाई मी डबल चहा घेऊन केली. यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी उरकायच्या होत्या. रूममध्ये माणसे पाच, बाथरूम एक असा प्रकार असल्याने मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील याचा अंदाज तुम्ही करू शकाल. सुज्ञास अधिक सांगणे नलगे. त्यातही पुन्हा गरम पाणी न येणे, चुकून भलताच नळ सुरु होऊन वरून शॉवरचे थंडगार पाणी अंगावर पडणे या गोष्टी घडल्या. अशा सगळ्या दिव्यातून पार पडून आम्ही लग्नाच्या वेळी छानपैकी हजर राहू शकलो याचा आनंद झाला. खरे तर मित्राने त्याच्या परीने सगळ्यांची व्यवस्था चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. पण जिथे मोठ्या संख्येने माणसे एकत्र येतात, तिथे अशी थोडीफार गैरसोय व्हायचीच. त्याला यजमान तरी काय करणार ? दुपारी लग्न लागल्यानंतर मित्राचा निरोप घेतला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०३/०८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा